
मुंबई | Mumbai
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांना (Lok Sabha Elections) एक वर्षाहून कमी कालावधी शिल्लक राहिला असून सर्वच राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांच्या दौऱ्यांवर भर देण्यात येत आहे. तर केंद्रातील भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक 'इंडिया' नावाच्या आघाडीअंतर्गत एकत्र आले आहेत.
अशातच आता देशात आत्ताच्या घडीला निवडणुका झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात? याचा 'इंडिया टीव्ही' आणि 'सीएनएक्स या वृत्तवाहिनीने केलेला सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकसभेच्या ४८ जागांचा देखील समावेश असून यामध्ये आज घडीला महाराष्ट्रात निवडणुका झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका हा भाजप आणि एनडीएला बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या सर्व्हेनुसार महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपला २० जागा मिळू शकतात. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ११ जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर काँग्रेसला ९, शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला २ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
तसेच मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला (BJP) ३२ टक्के, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १६ टक्के, काँग्रेस १६ टक्के, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १६ टक्के, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ७ टक्के आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५ टक्के आणि अन्य पक्षांना ११ टक्के मते मिळू शकतील, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, या सर्व्हेनुसार भाजपाच्या ३ जागा कमी होणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसतांना दिसत असून त्यांच्या १० जागा कमी होणार आहेत. तसेच अजित पवारांना २ जागांचा फायदा होणार असून काँग्रेसच्या तब्बल ८ जागा वाढणार आहेत. यशिवाय उद्धव ठाकरेंना ६ जागांचा फायदा होतांना दिसत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ४ ही जागा तशाच राहणार असल्याचे दिसत आहे.
कोणत्या विभागात कोणाला किती जागा मिळणार?
सर्व्हेनुसार आगामी लोकसभेत उत्तर महाराष्ट एनडीएला (NDA) ३ जागा आणि इंडियाला (INDIA) ३ जागा मिळतील तर विदर्भात दोन्ही आघाड्यांना पाच-पाच जागा मिळतील. तसेच मराठवाड्यात एनडीएला २ आणि इंडियाला तब्बल ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर मुंबईत एनडीएला ४ आणि इंडियाला दोन जागा मिळू शकतात. याशिवाय ठाणे आणि कोकण विभागात एनडीएला ५ आणि इंडियाला २ जागा मिळण्याची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रात एनडीएला ५ आणि इंडियाला ६ जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.