...तरच गोदावरी मोकळा श्वास घेईल!

...तरच गोदावरी मोकळा श्वास घेईल!

नाशिक । अनिरुद्ध जोशी Nashik

नाशिककरांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात गोदावरी नदीचे ( Godavari River ) विशेष महत्व आहे. नाशिककर गोदावरीचे पूजन करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून गोदावरीवर झालेल्या मानवनिर्मित अतिक्रमणामुळे गोदावरी मोकळा श्वास घेऊ शकत नाही. तसेच गोदावरी नदीपात्र आणि गंगापूर धरण ( Gangapur Dam )परिसरातील मातीची पाणी साठवण्याची क्षमता आता पुर्वीपेक्षा खुपच कमी झाली आहे. त्यामुळे गोदावरीवरचे अतिक्रमण थांबवणे आवश्यक आहे.

नदीचा मूळ स्वभाव ओळखून ती खेळती राहण्यासाठी ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.नदी वाहता वाहता सभोवताची जमीन उपजाऊ आणि सुपीक बनवून देते. मात्र गेल्या 50 वर्षात गोदावरी नदीपत्रात कळत-नकळतपणे अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. गोदावरी नदीची सध्याची परिस्थिती पाहता नदीत मोठ्या प्रमाणावर कचरा आणि सांडपाण्याचे साम्राज्य झाल्याचे दिसून येते. नदीच्या काळसर झालेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील मासे, कासव अन्य जलचर मृत्युमुखी पडत आहेत. गोदावरीचे पाणी दुषित झाल्यामुळे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तसेच गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये पुराचे प्रमाण देखील वाढले आहे आणि भर उन्हाळ्यात मात्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. हवामान बदलामुळे उन्हाचा तडाखाही वाढतो आहे. माणसांनी गोदावरी नदीपात्रात निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे नदीचे वैभव कमी होत आहे. माणसाचा नदीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे.

जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाला जमिनीत मुरण्यासाठी माती मदत करत असते. त्यामुळे ग्राउंड वाटर लेव्हल वाढते. हे नैसर्गिक चक्र आहे. पण गंगापूर धरण आणि गोदावरी नदीपात्रालगत असलेली माती आता पूर्वीप्रमाणे जमिनीत पाणी साठवत नाही. परिणामी पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे या मातीचे परीक्षण करून उपाययोजना केल्या तर पुन्हा एकदा पावसाचे प्रमाण वाढेल. यामुळे नाशिकचे तापमान किमान तीन ते साडेतीन अंशांनी कमी होईल आणि नाशिकला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

नदीचे पंंचप्राण काढून घेऊ नका!

वाळू, माती, रेती हे नदीतील पंचप्राण असतात. गेल्या काही दिवसात गोदावरी नदीपात्रात गाळ उपसायच्या नावाखाली वाळू उपसा झाला. नदी पोखरण्याचे काम झाले. त्यामुळे आगामी काळात हे पंचप्राण हिरावून घेण्याचे काम होऊ नये एवढीच अपेक्षा.

देवांग जानी, गोदाप्रेमी.

कोणत्या गोदावरीचा वारसा सोपवतोय?

सध्या गोदावरीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे. पुराचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. आताच काळजी घेतली नाही तर आपण आपल्या पुढील पिढीसाठी कुठल्या प्रकारच्या गोदावरीचे निर्माण करतोय यावर विचार करणे गरजेचे आहे.

डॉ. शिल्पा डहाके, सह-संस्थापक, अर्बन डायलॉग

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com