
लासलगाव। वार्ताहर Lasalgaon
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर नाफेडच्या सबएजन्सीद्वारे लाल कांद्याच्या खरेदीला सुरूवात झाली असून तीन दिवसांत केवळ 618 क्विंटल कांदा खरेदी करण्यात आला.
नाफेडने नेमलेल्या नाशिक येथील एजन्सीज (फेडरेशन) न्युट्रोव्ही अॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने येथील कृष्ण धारा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने नाफेडसाठी अल्प प्रमाणात खरेदी सुरू केली आहे.
गुरुवारी (दि.2) सहा ट्रॅक्टरमधून 168 क्विंटलची खरेदी 871.75 रुपये दराने करण्यात आली. तर शुक्रवारी (दि.3)150 क्विंटल कांद्याची 931.75 रुपये दराने तर शनिवारी (दि.4) 300 क्विंटल कांद्याची 937 रूपये दराने खरेदी करण्यात आली. शुक्रवारी खडकमाळेगाव येथील शेतकरी राजेश यशवंत शिंदे यांनी आपला 35 क्विंटल कांदा 931 रुपये दराने विकला. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी 1739 वाहनातून 35 हजार 502 क्विंटल कांद्याची आवक झाली असून, कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1051, तर सरासरी 751 रूपये दर होता.
या आहेत अटी
कांदा खरेदी करतांना शेतकर्यांवर अटी लादण्यात आल्या आहेत.या कंपन्या एका शेतकर्याकडून केवळ 156 क्विंटल आणि 45 ते 60 एमएम कांदा व सिंगल पत्ती असा दर्जा असलेला कांदा खरेदी करतात. यासाठी शेतकर्यांकडून आधार कार्ड, बँकेचे पासबुक व सातबारा उतार्यावर पिकपेरा याची नोंद बघितली जाते. खरेदीनंतर 18 ते20 दिवसात शेतकर्याच्या खात्यावर पैसे जमा केले जातात.
वाहतूक खर्चही निघेना
कांद्याच्या पिकातून यंदा दोन पैसे हाती येतील, या अपेक्षेने खडकमाळेगाव येथील शेतकरी योगेश शिंदे यांनी सात एकर क्षेत्रावर लाल कांद्याची लागवड केली होती. यापैकी अकरा ट्रॅक्टरमधून 300 क्विंटल कांदा हा पिंपळगाव बाजार समितीमध्ये साडेचारशे ते सहाशे रुपये दराने विक्री केला. या कांद्यातून उत्पादन खर्च तर दूरच परंतु शेतातून कांदा काढणी आणि वाहतुकीचा खर्चही निघाला नाही.
कागदपत्रांची पूर्तता करताना दमछाक
गेल्या दोन दिवसात लासलगाव येथील नाफेडच्या केंद्रावर चार ट्रॅक्टरमधून शंभर ते सव्वाशे क्विंटल कांदा विक्री केला असून, या कांद्याला 870 ते 337 रुपये दर मिळाला. बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या कांद्याचे रोख पैसे मिळतात. मात्र, नाफेडच्या केंद्रावर विक्री केलेल्या कांद्याचे पंधरा ते वीस दिवसांनी पैसे मिळणार आहे. परंतु, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दमछाक होत असल्याने नाफेडला बाजार समितीमध्ये कांदा खरेदीची परवानगी दिल्यास व्यापारी आणि एजन्सीमध्ये स्पर्धा होऊन यापेक्षाही दोन रुपये नक्कीच अधिक बाजारभाव मिळेल.