Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याकाझीगढीवासियांच्या नशिबी नोटिसांचे कागदी घोडे

काझीगढीवासियांच्या नशिबी नोटिसांचे कागदी घोडे

नाशिक । फारूक पठाण Nashik

अनेक पावसाळे आले व गेले. मात्र जुने नाशिकच्या ( Old Nashik )नदीकिनारी असलेल्या धोकादायक काझीगढीचे ( Kazi Gadhi ) घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. मागील सुमारे 50 वर्षांपासून येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. मंत्र्यांपासून नगरसेवक, राजकीय पदाधिकार्‍यांपर्यंत सर्वांनी केवळ आश्वासने दिली मात्र काम अद्याप झालेले नाही.

- Advertisement -

आता पुन्हा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नगररचना विभागाने धोकादायक घरांना पुन्हा नोटिसा देऊन आपले सोपस्कार पार पाडले आहेत, मात्र त्यावर कायमचा तोडगा कोण काढणार याबाबत कोणीच बोलायला तयार नाही. माळीण गावासारखी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेली काझीगढी अतिशय धोकादायक स्थितीत आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात गढीची माती खचून ढासळण्याचे प्रकार घडत आहेत.गत काही वर्षांत अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर गढी ढासळण्याचे प्रकार घडले आहेत. गढीच्या संरक्षण भिंतीबाबत ( Protective Wall ) केवळ आश्वासन मिळत आले आहे. पहिल्या वेळेस 1971 मध्ये गढी ढासळण्याची घटना घडली होती. त्यावेळी राज्याच्या नगरविकासमंत्र्यांनी भेट देत पाहणी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत विविध पक्षांची सरकारे आली व गेली, अनेक नगरसेवक निवडून आले न् गेले. तरी अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1986, 2015, 2019 या वर्षीही गढीवरील माती ढासळली होती.

27.5 कोटींंचा आराखडा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी काजी गढीला संरक्षण भिंत व्हावी तसेच येथील नागरिकांना दिलासा मिळावा तसेच मोठी दुर्घटना होण्यापूर्वी त्याचे काम व्हावे, या उद्देशाने मागील काही वर्षापासून सतत पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत त्यांनी स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सुमारे 27.5 कोटी रुपयांचा आराखडा देखील तयार केला आहे. तसेच यानंतर शहर अभियंता तसेच महापालिका आयुक्तांनी हा विषय सिटीच्या बैठकीत उपस्थित केला होता. स्मार्ट सिटीला याबाबतचे पत्र देखील देण्यात आलेले आहे, मात्र समन्वयाअभावी अधिकार्‍यांनी पत्र मिळाले नसल्याचे सांगितले आहे. मात्र आपण याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला असून काजीगढीला संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी आहे, अशी माहिती माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी दिली.

127 जणांना नोटीस

महापालिकेच्या नगररचना विभागाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काजीगढी येथील धोकादायक ठिकाणी राहणार्‍या 127 जणांना रीतसर नोटिसा बजावल्या आहेत.नगररचना विभागाकडून फक्त नोटिसा बजावण्यात येतात. पुढील कारवाई बांधकाम विभाग तसेच पोलिस प्रशासनाची असते. यामुळे आपण नोटिसा बजावून त्याचा अहवाल या विभागांना दिल्याची माहिती महापालिका नगररचना विभागाचे अधीक्षक संजय अग्रवाल यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या