कांदा गडगडला; लासलगावी १३०० रुपयांची घसरण

कांदा गडगडला; लासलगावी १३०० रुपयांची घसरण

लासलगाव। हारुण शेख

परदेशातून आयात केलेला कांदा मुंबईत दाखल होत आहे. तसेच नवीन लाल कांद्याची आवक वाढत असल्याने लासलगाव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. सर्वसाधारण बाजारभावात 1300 रुपयांची तर कमाल बाजार भावात 891 रुपयांची प्रतिक्विंटल मागे अचानक एका दिवसात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. परदेशातील कांदा चवीने भारतीयांच्या तोंडाशी उतरला नसेल मात्र परदेशी कांदा मुंबई येथे आला असून नवीन लाल कांद्याची आवक देशांतर्गत ठिकाणी बाजार समित्यांमध्ये येण्यास सुरुवात झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याचे व्यापारी वर्ग सांगत आहेत.

आज लासलगाव बाजार समितीत 833 वाहनातून 9220 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्याला कमीत कमी 1001 रु., जास्तीत जास्त 5300 रु. तर सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कांदा बाजारभावात 891 ते 1300 रुपयापर्यंत घसरण झाल्याचे लासलगाव बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले. सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने कुटुंब कसे चालवावे आणि झालेला खर्च कसा काढावा असा प्रश्न आता कांदा उत्पादकांसमोर उभा राहिला आहे.

तसेच केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या निर्बंधांमुळे कांद्याच्या भावात घसरण होत आहे. कांद्याला भाव मिळणे गरजेचे असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी माणिक आव्हाड यांनी सांगितले. सद्यस्थितीत उन्हाळ कांद्याची रोपे टाकण्यास सुरुवात झाली असून याबरोबरच द्राक्षमशागतीची कामे वेगात सुरू झाली आहे.

द्राक्षबागेसाठी दररोज मजूर वर्गाची मोठी गरज पडते. छाटणी, पेस्ट, डिपिंग, थिनिंग, औषध फवारणी, पोषके आदी कामे वेळोवेळी करावी लागतात. त्यात औषधांचा खर्च व मजूरीचा खर्च वाढतो. ही सर्व कामे शेतकरी कांदा पीकाच्या भरवशावर करतो.

मात्र आता कांद्याचे भाव कोसळू लागल्याने द्राक्षबाग मशागतीसाठी पैसा कोठुक उभा करायचा असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे. त्यातच दिपावलीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com