
लासलगाव । वार्ताहर Lasalaon
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने प्रथमच नाफेडमार्फत लाल कांद्याची खरेदी सुरू केली होती. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेरील नाफेडच्या शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांद्याची खरेदी बंद करण्यात आल्याने शुक्रवारी (दि. 24) जास्तीत जास्त 1141 रुपयांवर असलेले दर बुधवारी (दि. 29) 851 रुपयांपर्यंत खाली आले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 300 रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीसह राज्य तसेच देशांतर्गत बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक येण्यास सुरुवात झाल्याने मागणीच्या तुलनेत अधिक कांद्याची आवक झाली. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव 200 ते 400 रुपयांपर्यंत कोसळल्याने हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नाफेडमार्फत लाल कांद्याची प्रथमच खरेदी सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानुसार गेल्या आठवड्यातील शुक्रवारपर्यंत 12 हजार मॅट्रिक टन कांद्याची खरेदी साडेतीन हजार शेतकर्यांकडून करण्यात आली. मात्र अधिवेशन संपताच सुरू असलेली लाल कांद्याची खरेदीही बंद करण्यात आल्याने कांदा उत्पादकांचा भ्रमनिरास झाला.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (दि. 29) सकाळच्या सत्रात 400 वाहनांतून लाल कांद्याची, तर 300 वाहनांतून उन्हाळ कांद्याची अशी 14 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याला जास्तीत जास्त 851 रुपये, कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 650 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नव्याने येत असलेल्या उन्हाळ कांद्याच्या बाजारभावाची काहीशी अशी स्थिती आहे. लाल कांद्याला जास्तीत जास्त 990 रुपये, कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
गुरुवारी लाल कांद्याची 7,126 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 200, जास्तीत जास्त 1000 तर सरासरी 700 रुपये दर मिळाला. उन्हाळ कांद्याची 4,802 क्विंटल आवक झाली. दर कमीत कमी 400, जास्तीत जास्त 1100 तर सरासरी 920 रुपये प्रतिक्विंटल होते.