जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्ववत सुरु होणार

jalgaon-digital
2 Min Read

लासलगाव । वार्ताहर

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलावाचा तिढा आज अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादा भुसे आणि व्यापारीवर्ग यांच्यात झालेल्या बैठकीत सुटला.

केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर लावलेल्या मर्यादेमुळे गेल्या चार दिवसांपासून कांदा बाजारपेठ ठप्प होत्या. आज वर्षा निवासस्थानात झालेल्या बैठकीला शेतकरी हिताला मान देऊन उद्यापासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती व्यापारी नंदकुमार डागा यांनी दिली.या बैठकीस नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, उमराणा येथील व्यापारी उपस्थित होते.

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा लिलाव ठप्प असल्याने शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले होते. गेल्या चार दिवसांपासून कांदा बाजार बंद असल्याने याचा थेट परिणाम हा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दिसून येत होता. लासलगाव शहर व परिसरात कांदा गोणी शिवणारे आणि कांदा खळ्यात काम करणार्‍या साडेतीन ते चार हजार नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 40 ते 50 छोट्या – मोठ्या गावातील शेतकरी हे लिलावासाठी दाखल होतात. शेतमाल विक्रीतून आलेल्या पैशातून दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी शेतकरी येथे करत असतात. मात्र केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर निर्बंध लागल्याने व्यापारी वर्गाने बाजार समितीमध्ये लिलावात सहभागी होण्यास असमर्थता दर्शविली असल्याने ग्रामीण अर्थचक्र थांबलेले होते. दि 29 रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सन्मानजनक तोडगा निघाल्या निघाल्याने अखेर कांदा लिलाव सुरू होणार असल्याने शेतकर्‍यांसह छोटे व्यावसायिक कामगार यांच्यात आनंदाचे वातावरण होते.

या बैठकीस नंदकुमार डागा, नितीन जैन,मनोज जैन, ओमप्रकाश राका आदी व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *