Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआयकरच्या छाप्यांमुळे लासलगावात कांदा लिलाव बंद

आयकरच्या छाप्यांमुळे लासलगावात कांदा लिलाव बंद

लासलगाव प्रतिनिधी

आयकर विभागाने बुधवारी लासलगाव येथील ९ कांदा व्यापाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यांमुळे कांदा लिलाव गुरुवारी बंद झाला. लासलगाव बाजार समितीत होणाऱ्या कांदा लिलावात सहभागी होणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. परिणामी कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यासाठी लासलगाव बाजार समितीने प्रयत्न करावे या मागणीचे निवेदन सभापती सुवर्णा जगताप यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने येथील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे टाकल्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद केली असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. साठवणूक केलेला कांदा दिवसेंदिवस खराब होत असल्याने हे मोठे संकट आधीच शेतकऱ्यांपुढे आलेले आहे.कांदा व्यापाऱ्यांनी तातडीने लिलाव सुरू करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचा रास्ता रोको,रेल रोको सारखे आंदोलन करण्यात येईल असा इशारा हंसराज वडघुले यांनी दिला आहे

काल येथील बाजार समितीत ५० वाहनातून अंदाजे ५०० क्विंटल कांदा शेतकऱ्यांनी लिलावासाठी आणला होता. परंतु कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रियेत भाग न घेतल्यामुळे कुठलेही लिलाव होऊ शकले नाही परिणामी शेतकऱ्यांनी हा सर्व कांदा विंचूर उपबाजार येथे विक्री साठी नेला असल्याची माहिती मिळाली आहे.

येथील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.मागील वर्षी कांद्याला ११ हजार रु प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला होता परंतु या वर्षी तशी परिस्थिती नाही,आता ४५०० रु प्रति क्विंटल असा भाव मिळत असतांना देखील आयकर विभागाकडून कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकून बाजार भाव नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.नैसर्गिक रित्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो काही कांद्याला बाजारभाव मिळत आहे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जयदत्त होळकर, संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

लवकरच बाजार समिती प्रशासन व कांदा व्यापाऱ्यांमध्ये बैठक घेऊन हे लिलाव पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे थेट परिणाम हा कांद्याचा बाजार भावावर होतो.कांदा उत्पादकांना याचा थेट फटका बसत असल्याने याबाबत केंद्र सरकारजवळ पाठपुरावा केला जाणार आहे.कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कांदा लिलाव सुरू करावे.

सुवर्णा जगताप, सभापती लासलगाव बाजार समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या