Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याचालत्या कारला आग; चालकाचा होरपळून मृत्यू

चालत्या कारला आग; चालकाचा होरपळून मृत्यू

पिंपळगाव बसवंत | Pimpalgoan

येथून जवळच असलेल्या साकोरा (मिग) फाट्यावर कारला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, निफाड तालुक्यातील साकोरा (मिग) येथील संजय चंद्रभान शिंदे (वय ५४) हे आपल्या सियाझ कंपनीच्या (क्रमांक एमएच-१५-एफएन-४१७७) कारमधून पिंपळगाव बसवंतच्या दिशेने सकाळी अकराच्या सुमारास खासगी कामानिमित्त निघाले होते.

शिंदे यांची कार साकोरा फाट्यावरून पिंपळगाव बसवंतकडे मार्गस्थ होताच गाडीने अचानक पेट घेतला. अचानक घडलेल्या या घटनेने शिंदे यांना काय करावे हे सुचेना. गाडीचे सर्व दरवाजे आणि काचा लाॅक असल्यामुळे गाडीबाहेर पडणे शिंदे यांना शक्य झाले नाही. बघता बघता संपूर्ण गाडीने पेट घेतला.

नागरिकांनी गाडीच्या पाठीमागील काच देखील फोडली. मात्र, आगीने इतके मोठे रौद्र रूप धारण केले की शिंदे यांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत अग्निशामक दलाचे प्रमुख सुनील मोरे पथकासह घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. तर, पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुरेश चौधरी, महामार्गच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कदम यांनी कर्मचार्यांसह धाव घेत मदतकार्य केले.

साकोरा (मिग) येथील विद्यमान सरपंच विमल शिंदे यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात आई, दोन, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या