
मुंबई | Mumbai
मुंबई-गोवा महामार्गावर ( Mumbai-Goa Highway) शिवशाही एसटी बसचा (Shivshahi ST Bus) पनवेल जवळील कर्नाळा खिंडीमध्ये अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून २२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त शिवशाही बस पनवेलहून-महाडच्या दिशेने जात होती. त्यावेळी कर्नाळा खिंडीत बस चालकाचा ताबा सुटल्याने बस दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर उजव्या बाजूला वळून पलटी झाली. या बसमधून एकूण ३५ ते ४० प्रवासी प्रवास करत होते. यामधील एका प्रवाशाचा मृत्यू (Death) झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तर २२ प्रवासी जखमी झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन (Police and Administration) घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय पनवेल व एमजीएम रुग्णालय कामोठे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच या अपघातामुळे काहीवेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.