जागतिक मानसिक आरोग्य दिवसाच्या निमित्ताने...

जागतिक मानसिक आरोग्य दिवसाच्या निमित्ताने...

नाशिक । प्रतिनिधी

आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस! ‘मानसिक आरोग्य : मोठी गुंतवणूक - मोठा प्रसार’ ही यावर्षीची संकल्पना आहे. मानसिक आरोग्यासंदर्भात जागरुकता वाढावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. करोनाच्या या काळात लोक मानसिक अस्वास्थ्याला सामोरे जात आहेत.

लोकांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते प्रयत्न कोणते याविषयी मान्यवरांशी साधलेला संवाद.

त्रिसूत्रीचा वापर करावा

सध्याच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्यासाठी, मनोधैर्य वाढवण्यसाठी छंद जोपासावा, नातेवाईकांशी संपर्क साधावा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. आपल्याला व आपल्या कुटुंबाला असा आजार होऊ नये याकरिता काळजी घ्यावी, मास्क वापर, सामाजिक अंतर व सॅनिटायझरचा वापर किंवा साबण वापर या त्रिसूत्रीचा वापर करावा.

कैलास जाधव, आयुक्त, नाशिक महानगरपालिका.

सकारात्मक पुस्तके वाचतो

जिल्हा प्रशासनात विविध पदांवर काम करत असताना नैसर्गिक व इतर संकटात फिल्डवर जाऊन काम केले. पण करोना संकट हे सर्वार्थाने अवघड व मानवतेची परीक्षा घेणारे आहे. या कालावधीत फिल्डवर जाऊन काम करणे हे एक चॅलेंज होते. पण पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे हे आव्हान स्वीकारू शकलो. रोज सकाळी योगा व जीम करायचो. पॉझिटिव्ह लेक्चर व पुस्तके वाचायचो. संकट कसेही असो तुमचे मानसिक आरोग्य उत्तम असले पाहिजे. जेणे करून तुम्ही कोणत्याही बिकट परिस्थितीत काम करू शकता.

नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी

ध्यान धारणा करतो!

संकट कोणतेही असो मन खंबीर असणे गरजेचे आहे. करोना संकटकाळात गरजेनुसार फिल्डवर उतरून काम केले. मन:स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी व मनाला करोनाच्या निगेटिव्ह विचारांपासून दूर ठेवण्यासाठी रोज सकाळी मी ध्यान धारणा व योगासने केली. त्यामुळे काम करताना पॉझिटिव्ह एनर्जी नेहमी जाणवायची. नागरिकांनीही प्रत्येकाला ज्या गोष्टीतून पॉझिटिव्ह ऊर्जा मिळेल ते नेहमी करावे.

भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी

छंद जोपासा!

योग्य आहार, विहार आणि विचार आवश्यक आहे. अपेक्षा आणि तुलना टाळणे आवश्यक आहे. अपेक्षा आणि तुलना केल्याने तणाव वाढतो. स्वतः चा स्वीकार करा, आदर करा, प्रेम करा आणि स्वतःला माफ पण करता आले पाहिजे. स्वतःसाठी वेळ काढावा, छंद जोपासले पाहिजे. कुटुंबाला वेळ द्या. ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्यावर काम करा आणि जे बदलणे शक्य नाही त्याचा स्वीकार करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वांशी स्नेहाने वागावे.

डॉ.संदीप जेजुरकर, मानसोपचारतज्ञ, जिल्हा रुग्णालय

योगा करतो!

मानसिक ताणतणाव प्रत्येकाला आहेत. मात्र या ताणतणावाला वाढवणारी नकारात्मक ऊर्जा बाजूला काढणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे परिणाम मनावर आणि पर्यायाने शरीरावर होतात. त्यामुळे अशा विचारांना तातडीने रोखणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या दिवस कामांमध्ये ताणतणाव कमी करण्यासाठी योगा अवलंब करणे आवश्यक आहे.

विवेक पाटील, माजी अध्यक्ष, आयमा

निसर्ग सान्निध्यात रममाण होतो!

आजच्या परिस्थितीमध्ये माणसाला मन, शरीर व आत्मा यांचा ताळमेळ करून जगण्याची सवय करणे गरजेचे आहे. ते मिळवण्यासाठी पंचमहाभूतांचा वास असलेल्या निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होणे गरजेचे आहे. आपल्या परंपरेनुसार निसर्ग म्हणजेच आपण देव मानत आलो आहोत. त्यामुळे निसर्गाच्या वातावरणात वेळ घालवून मनाचा संयम वाढवणे ही काळाची गरज झाली आहे. संयमित जीवन जगण्यासाठी पंचमहाभूतांचा आधार महत्त्वाचा ठरणार आहे.

किरण चव्हाण, माजी अध्यक्ष, क्रेडाई

संयम पाळतो!

करोनामुळे कामगार, व्यापारी, उद्योजक व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या कालावधीत मानसिक स्वास्थ्य राखणे गरजेचे आहे. संयम पाळणे ही काळाची गरज आहे. बॅड पॅच निघून जाईल. येणार्‍या दोन-तीन महिन्यांमध्ये परिस्थितीत सुधारणा होईल. त्यामुळे व्यापारीवर्गाने व कामगारवर्ग यांनी मनावरील ताण घालवण्यासाठी संयमित राहण्याची गरज आहे.

गोरख चौधरी, अध्यक्ष, नाशिक जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन

आनंदी राहते!

करोना काळात प्रामुख्याने सर्व परिचारिकांनी धोका पत्करत मोठी सेवा केली. यामुळे त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय मोठ्या तणावात होते. त्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी आरोेग्य प्रशासन पाठीशी उभे राहिले. प्रत्येक परिचारिका व आरोग्य सेवकानेे मनातून करोनाची भीती काढून टाकावी, सकाळी योगा करावा, छंद जोपासावे, कुटुंबियांमध्ये आनंदात वेळ घालवावा, कामाच्या ठिकाणी एकमेकींशी मुक्तपणे बोलून मन मोकळे करावे.

शामा माहुलीकर, अधिपरिचारिका, सिव्हिल

‘डोस’ने मिळवा मानसिक आरोग्य

डोस (डीवोएसई) घ्या व मानसिक आरोग्य मिळवा. ‘डी’ म्हणजे डोपामाईन जे लक्ष्य पूर्ण केल्यानंतर आपणास मिळते, ‘ओ’ म्हणजे ऑक्सिटोसीन जे आपल्या प्रेमभावातून, प्रेम वाटण्यातून तयार होते, ‘एस’ म्हणजे सेरोटेनीन जे दुसर्‍याच्या सेवाभावातून तयार होते, ‘ई’ म्हणजे इंडॉरसीन जे व्यायाम, चांगल्या आरोग्यातून हे शरीरात तयार होते. लक्ष्य पूर्ण करणे, प्रेमळपणा, लोकांच्या कामास येणे व व्यायाम हे चार चांगल्या वर्तनाने (डोस) घेतल्यास यातून हे चार हार्मोन्स आपल्या शरीरात तयार होतात. यातून मानसिक आरोग्य संपन्न होते. प्रत्येक पोलीस सेवकच नव्हे तर प्रत्येक नागरिकाने या ‘डोस’द्वारे मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यावे.

दीपक पांडे, पोलीस आयुक्त, नाशिक

जे इतरांचे तेच माझे!

या करोनाच्या काळात सुरुवातीला काही कामे केली. खूप वाईट वाटले. पण जे इतरांचे झाले तेच माझे झाले अशी मी माझ्या मनाची समजूत घातली. आता कामे सुरू होत आहेत. मी माझे काम मन लावून आणि स्वच्छ करते. त्यामुळे माझीच कामे मला परत मिळत आहेत.

तुळसाबाई गामणे

धीर धरला आहे!

परिस्थिती गंभीर आहे. अजूनही दैनंदिन जीवन पूर्वपदावर आलेले नाही. माझ्या मुलाचा छोटासा व्यवसाय आहे. त्याच्यावर पण परिणाम झाला आहे. पण आम्ही सर्वांनी परिस्थितीचा स्वीकार केला आहे आणि ती लवकरच पूर्वपदावर येईल, असा धीर धरला आहे.

मानिनी अकलूजकर.

वाचन करतो

करोना संकट व लॉकडाऊनमुळे घरीच थांबावे लागत होते. कोणताही पर्याय नव्हता. मात्र मी या काळात महापुरुषांची पुस्तके वाचतो आहे. यातून माझे लक्ष पुस्तकावरच केंद्रित झाले. त्यामुळे मला मानसिक त्रास झाला नाही. पुस्तके वाचून जरा बोअर झालो तर जरा वेळ मोबाईलवर सर्फिंग करायचो. आता मी माझे नियोजन ठरवले आहे. मला या काळात कुटुंबानेही साथ दिली.

सागर गायकवाड, विद्यार्थी,

ऑनलाईन कोर्सेस करते

करोनामुळे सर्वच बंद होते. पण लॉकडाऊन लागल्यावर दोन महिने कसेबसे काढले. नंतर मात्र एकटे वाटायला लागले. मोबाईल पाहूनही कंटाळा आला होता. पण याकाळात भावानेे विविध प्रकारच्या आनलाईन कोर्सेसविषयी माहिती दिली. यातून मी बरेच काही शिकले. माझ्या ज्ञानात भर पडली. मी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला आहे. आता ट्रेस फ्री आहे. आता पूर्वीप्रमाणेच शेड्यूल बसवते आहे.

गायत्री पाटील, विद्यार्थिनी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com