ShivJayanti : शिवजयंती निमित्त राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिली शपथ, म्हणाले…

मनसेकडून शिवाजी पार्क मैदानावर पुष्पवृष्टी
ShivJayanti : शिवजयंती निमित्त राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिली शपथ, म्हणाले…

मुंबई | Mumbai

१९ फेब्रुवारीला तारखेनुसार शिवजयंती साजरी केल्यानंतर महाराष्ट्रात आज तिथी नुसार शिव जयंती (Shiv Jayanti) साजरी केली जात आहे. ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन कृष्ण तृतीया दिवशी झाल्याचा उल्लेख असल्याने यंदा तिथीनुसार 21 मार्च दिवशी शिवजयंती साजरी केले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती (shiv jayanti) निमित्ताने आज दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने (mns) जयंतीचा मोठा सोहळा आयोजित केला होता. या दिमाखदार सोहळ्याला हजारो मनसैनिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी उपस्थित सर्व मनसैनिकांना शपथ दिली.

काय आहे शपथ?

शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्व जण इथे शिवतिर्थावर जमलो आहोत, आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शपथ घेतो की, स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी स्वराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं यासाठी सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करु.

हे सुराज्य स्थापन करताना जातीजातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान राहील, युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल, इथलं प्रत्येक मुल शाळेत जाऊन शिकत असेल, लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्यव्यवस्था मिळेल, इथली शहरं, गावं, तांडे, पाडे, सुंदर, सुकर आणि सुरक्षित असतील, भ्रष्टाचार नष्ट होईल, आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल,

कामगारांना न्याय मिळेल, यासाठी जे पडेल ते करु, छत्रपती शिवाजी महाराजांनी एका स्वाभिमानी, स्वाबलंबी, स्वराज्यचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू,आम्ही महाराजांचे मावळे आहोत, आम्ही महाराजांचे सैनिक आहोत, याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही, हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो, आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो.

दरम्यान शिवाजी पार्कावर मनसेने नयनरम्य सोहळ्याचे आयोजन केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com