Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामहाशिवरात्री निमित्त साधूंचे आज पर्वस्नान

महाशिवरात्री निमित्त साधूंचे आज पर्वस्नान

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

महाशिवरात्रीनिमित्त ( Mahashivratri )आज (दि.18) पहाटे साधूंची पर्वस्नान मिरवणूक निघणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त विविध मुहूर्त, शिवजयंती तसेच सोमवारी सोमवती अमावस्येमुळे त्र्यंबकेश्वरला भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने प्रशासन, पोलीस आणि देवस्थान विश्वस्तांकडून नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.17) विजया एकादशी होती. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला 25 हजार भाविकांनी हजेरी लावली.

- Advertisement -

महाशिवरात्र पर्वकाळात त्र्यंबकनगरीत वाहनांची गर्दी होणार नाही यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येणार आहे. 300 पोलीस, होमगार्ड यांंचा बंदोबस्त राहील, असे नियोजन होत आहे. नगरपालिकेने स्वच्छतेवर भर दिला आहे, असे प्रशासक व मुख्याधिकारी संजय जाधव यांंनी सांगितले. त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थ, पालखी मिरवणूकमार्ग या ठिकाणी बंदोबस्त राहील, असे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृहात भाविकांना महाशिवरात्रीच्या दिवशी प्रवेश देण्यात येणार नाही, असे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने कळवले आहे. महाशिवरात्रीचा मुख्य सोहळा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखाली होणार आहे. उत्सवाला पुरोहित संघ, तुंगार ट्रस्ट यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. मंदिरात मोफत दर्शन तसेच देणगी दर्शन सुविधा उपलब्ध असून या सुविधा भाविकांसाठी ऐच्छिक असल्याचे सांगण्यात आले. तसेच रांंग नियोजन झाले आहे.

येथील प्रसिद्ध जुने महादेव मंदिरातही भाविक दर्शन घेतील. येथील अहिल्या-गोदा संंगम घाटावर जुने महादेव मंदिर असून अष्टकोशल महंत देवराजपुरी मार्गदर्शन करणार आहेत. पहाटे तीन वाजता साधूंचे महाशिवरात्र पर्वस्नान दर्शन पर्वणी मिरवणूक काढण्यात येणार आहे, असे महंत धनंजयगिरी महाराज यांनी कळवले आहे.

महाशिवरात्री पर्वनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर विद्युत रोषणाई केल्याने उजळून निघाले आहे. मध्यरात्री महापूजा आणि सकाळी पालखी मिरवणूक निघेल. मंदिरात दर्शनासाठी सुमारे तीन लाख शिवभक्तांची रीघ लागण्याची शक्यता असल्याने मंदिरात सर्व नियोजन पूर्ण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या