बळकावलेले घर पुन्हा आई-वडिलांंकडे

बळकावलेले घर पुन्हा आई-वडिलांंकडे

नर्दयी पुत्राला प्रांताधिकार्‍यांचा दणका

नाशिक । प्रतिनिधी Nashik

चांगले उच्च शिक्षित सधन असूनही आई-वडिलांंना वृद्धापकाळात आधार न देता घराबाहेर काढणार्‍या इंदिरानगरमधील एका निर्दयी पुत्राला नाशिकचे प्रांताधिकारी जतीन रहमान यांनी दणका दिला असून, मुलालाच घर सोडण्यास सांगून राहते घर पुन्हा आई- वडिलांच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला आहे.

आई-वडिलांचा वृद्धापकाळात सांभाळ न करता वार्‍यावर सोडणार्‍या मुलांंना यामुळेच चपराक बसणार आहे.

याबाबतची माहिती अशी की, नाशिकच्या आयुर्विमा महामंडळातील निवृत्त ज्येष्ठ अधिकारी विजय बैरागी यांचे इंदिरानगरमध्ये अजिंक्य सोसायटीत घर आहे.त्या घराचे कर्जाचे हप्ते आजही बैरागी आपल्या पेन्शनमधून भरत आहेत. त्यांच्या पत्नी सुरेखा बैरागी ह्या त्यांच्याबरोबर राहतात. त्यात त्यांचा मुलगा विशाल बैरागी व सून वेदिका बैरागीही राहत होत्या.

मात्र, नंतर मुलाने व सुनेेने आई- वडिलांशी वाद घालत घर सोडण्यास भाग पाडले. सून व मुलगा पुण्यात निघून गेले. भरघोस पगार कमावू लागले. त्यानंतर त्यांना दोन मुलेही झाली.त्यानंंतरही वडिलांचा सांभाळ करण्याऐवजी ते वडिलांकडूनच पैसे घेऊन जाऊ लागले. त्यामुळे वृद्ध आई वडिलांनी प्रांंतांकडे तक्रार केली होती.

गेली दोन वर्ष त्यांनी त्रास सहन केला. त्यानंतर प्रांत जतीन रहमान यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळीही विशाल बैरागी म्हणाला की, वडील मोठ्या हुद्यावर कामाला होते. त्यांंना निवृत्तीच्या वेळी 50 लाख रुपये मिळाले. त्यांंची निफाडला बागायती शेती आहे. त्यांंना उदरनिर्वाह भत्त्याची काही गरज नाही. ते विनाकारण त्रास देत आहेत.

मात्र, रेहमान यांनी मुलाचे सर्व म्हणणे फेटाळून लावले असून घर पुन्हा आई- वडिलांंच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या घरातून निघून जाण्याचे आदेशही मुलाला दिले आहेत. इंदिरानगर पोलिसांना त्याबाबत लक्ष ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. विजय बैरागी यांच्यातर्फे अ‍ॅड मनीषा मंडलिक यांनी काम पाहिले.

माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायद्याअंतर्गत मुलांवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे माता-पित्याचा सांभाळ न करणार्‍या पाल्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. यापुढे आई-वडिलांचा सांभाळ न केल्यास अशा मुलांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com