मनपा अंगणवाडी विद्यार्थ्यांना लवकरच पोषण आहार

कुपोषित बालक शोधमोहीम सुरू
मनपा अंगणवाडी विद्यार्थ्यांना लवकरच पोषण आहार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC) माध्यमातून शहरात एकूण 354 अंगणवाड्या ( Aanganwadi ) सुरू आहे, मात्र यातील पटसंख्या तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहणारे विद्यार्थ्यांची संख्या यांची तपासणी केली जात असून महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, नाशिकरोड विभागाचे अधिकारी सुनील आव्हाड यांनी काही अंगणवाडींना अचानक भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. दरम्यान प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची संख्या मिळाल्यावर लवकरच सर्व अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मेनकर यांनी दिली.

त्याचप्रमाणे अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणी कुपोषित बालक नाही, याचा तपास करण्यासाठी दर दोन महिन्यांने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना सकस शालेय पोषण आहार देण्याकडेही लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

नाशिक शहरात अनेक ठिकाणी अंगणवाडीत प्रवेश घेतलेले बालकांमध्ये कुपोषित बालके आढळून येत असल्याचे मागील अहवालावरून लक्षात आले आहे.

त्यामुळे सध्या मागील दोन वर्षांचे अहवाल तपासणीचे काम सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर आता अंगणवाड्या या पूर्ण क्षमतेने सुरु झालेल्या असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांची दर दोन महिन्यांने एकदा आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीतून कुपोषित बालकांचा शोध घेण्यात येणार आहे. सध्या विद्यार्थी संख्या उपलब्ध नसल्याने शालेय पोषण आहार सुरु करण्यात आलेला नाही. पटावर असलेले आणि नियमित येणार्या विद्यार्थ्यांंची संख्या उपलब्ध झाल्यानंतर लगेचच शालेय पोषण आहार सुरु करण्यात येणार आहे.

नाशिकरोडला तीन अंगणवाड्या बांधणार

नाशिकरोड विभागातील 9 अंगणवाड्यांची आज अचानक पाहणी करण्यात आली. यावेळी तीन अंगणवाड्यांना महापालिकेची जागा नसल्याने त्या नव्याने उभारण्यासाठी महिला बालकल्याण विभागाचा निधी वापरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी सांगितले.

नाशिक शहरात एकूण 354 अंगणवाड्या कार्यरत आहे. त्यापैकी नाशिकरोड विभागात 65 अंगणवाड्या आहेत. अरिंगळे मळा, एकलहरा रोड, विठ्ठल मंदिर अरिंगळे मळा व म्हसोबानगर येथे असलेल्या तीन अंगणवाड्यांना महापालिकेची जागा नसल्याचे दिसुन आले.

महापालिकेची जागा नसल्याने या अंगणवाड्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येवू शकत नाही. तरीही लगतच्या काही लेआऊटमधील खुल्या जागांवर नव्याने अंगणवाडी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. अंगणवाड्यांमध्ये सुमारे 70 ते 80 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळून आली आहे. याठिकाणी असलेल्या या शाळांना अनेक समस्या असून काही ठिकाणी शौचालयाची सुविधा नाही, रस्ते नसल्याने चिखलातून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर खोले मळ्यात असलेल्या एका अंगणवाडीच्या जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाल्याने याठिकाणी पार्टीशनची व्यवस्था करून ही अंगणवाडी सुरु करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com