नाशिक । फारूक पठाण Nashik
मागील सुमारे सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या शिवसेना कोणाची या वादावर निवडणूक आयोगाने( Election Commission) निकाल देत शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष महापालिका निवडणुकांकडे लागले आहे. कारण पक्षाची लढाई जवळपास शिंदे गटाने जिंकली असून आता राज्यातील 18 महापालिकांसह मुंबई महापालिका निवडणूक लागणार असल्याचे देखील बोलले जात आहे.दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवणार असा दावा करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी राज्यातील इतिहासातील सर्वात मोठा बंड पुकारत शिवसेनेतील 40 आमदारांना फोडून भाजपसोबत थेट महाराष्ट्राची सत्ता हातात घेतली. तेव्हापासून खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा करीत होते. ही लढाई निवडणूक आयोगाकडे सुरू असताना शुक्रवारी याबाबतचा निर्णय आला व शिवसेना पक्ष नाव धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्यात आले. त्यामुळे अचानक राज्यात राजकीय भूकंप आल्यासारखे वातावरण झाले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना अत्यंत खोचक शब्दांचा वापर केला तसेच आयोगावर देखील टीका केली. त्याचप्रमाणे खा. संजय राऊत यांनी देखील आम्ही जनतेच्या न्यायालयातही जाणार असल्याचेही सांगितले.एकीकडे शिंदे गट राज्यभर जल्लोष करत असताना मात्र दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेतील नेते व पदाधिकारी शिवसैनिक नाराज व संतप्त दिसत आहे. अशा वातावरणात पुढे काय होणार? असा प्रश्न एकमेकांना विचारण्यात येत आहे. मात्र राज्यातील मुंबई ,नाशिक महापालिकेसह राज्यातील एकूण सुमारे 18 महापालिकांच्या निवडणुका मागील सुमारे एक वर्षापासून प्रलंबित आहेत.
या सर्व ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे. निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असल्यामुळे सत्ताधारी निवडणूक घेण्यास इच्छुक नसल्याचे देखील आरोप मध्यंतरी झाले. दरम्यान, आता शिवसेना पक्षाच्या नाव तसेच चिन्हाबाबत निकाल लागला असून आता तरी राज्यातील महापालिकांच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान नाराज, संतप्त असलेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील लोकांचा दावा आहे की पक्षाचे नाव तसेच चिन्ह गेले तरी जनता आमच्याबरोबर आहे. त्यामुळे निवडणुका घ्या, अशी त्यांची देखील मागणी आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका झाल्या तर त्याचे निकाल पाहणे अत्यंत औत्सुकतेचे ठरणार आहे.
आऊटगोइंग वाढणार?
मागील सहा महिन्यात नाशिक शहरातील शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत.दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण चिन्ह देखील शिंदे गटाला बहाल केल्यामुळे शिंदे गटात इनकमिंग वाढणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस मधील आउटगोइंग वाढणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. शिंदे यांचे नाशिकवर विशेष लक्ष आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात सामील होणारे पहिले माजी नगरसेवक ठरले होते. त्यांना पक्षाने नाशिक शहराची जबाबदारी दिली होती. त्यानंतर हळूहळू पक्षात गर्दी वाढली तर मध्यंतरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नाशिक मधील शिंदे गटात गर्दी वाढली,तर पक्षाला आणखी ऊर्जा मिळाली.त्याचप्रमाणे संजय राऊत यांचे खंदे समर्थक व सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत राहणारे नाशिक संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नाशिकच्या उद्धव ठाकरे गटाला अनेक हादरे बसले आहेत.आता पुन्हा मोठे भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.