धोकादायक इमारतींबाबत जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडून महापालिकेला सूचना

धोकादायक इमारतींबाबत जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडून महापालिकेला सूचना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

संभाव्य अतिवृष्टीचा ( Possibality of Heavy Rain )धोका लक्षात घेवून गोदावरी नदीच्या ( Godavari River ) पाण्याची पातळी वाढल्यास नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देवून त्यांना तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी पूर्व नियोजन करण्यात यावे. महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या इमारती, पडके वाडे, पुल यांचे तत्काळ ऑडिट करून संबंधितांना नोटीसा देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने (By District Disaster Control Authority) नाशिक व मालेगाव महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने कळविल्यानुसार, पावसाळ्याच्या काळात धोकादायक इमारती तत्काळ रिकामे करण्यासाठी अथवा दुरूस्त करण्याचे आदेश देण्यात यावेत. धरण क्षेत्रात अतिवृष्टीमुळे धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीस पूर येतो. त्यामुळे पंचवटी, रामकुंड या भागातील नदीच्या पाण्याची पातळी वाढते. यामुळे येथील पार्कींग झोनमध्ये पाणी शिरल्याने वाहने अडकतात किंवा वाहून जातात.

यावर उपाययोजना म्हणून योग्य ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत. तसेच संभाव्य पुर परिस्थितीत वाहने काढण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करून याठिकाणी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात यावीत. धरणातून पाण्याच्या विर्सगाबाबत माहिती मिळताच पूर क्षेत्रात आवश्यक बचाव साहित्य पोहचवण्याचे नियोजन करावे.

पूराच्या परिस्थितीत नदीतील पाणवेली पुलामध्ये अडकून पडतात, त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. यासाठी गोदापात्रातील पाणवेली मान्सून पूर्वीच काढून घेण्यात याव्यात. तसेच मान्सून स्थितीत मोठ्या प्रमाणावर वादळी वारे सुरू असतात, अशा परिस्थितीत रस्त्यांच्या बाजूला लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांच्या लोखंडी फ्रेम्स, झाडे, घरांची पत्रे उडतात. अशावेळी कोणतीही हानी होवू नये यासाठी आवश्यकत्या उपाययोजना करण्यात याव्यात.

रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे वाहने दबली जातात, अशा प्रसंगी मदत करण्यासाठी मनुष्यबळाची नियुक्ती करून कटरच्या साहय्याने पडलेली झाडे बाजूला करावीत. वार्डनिहाय शोध व बचावाची स्वतंत्र पथके साहित्यासह नियुक्त करण्यात यावीत. तसेच देवदूत रेस्क्यु वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करून ते वाहन मान्सून काळात जिल्हा नियंत्रण कक्षास उपलब्ध करून देण्यात यावे.

मान्सून काळात सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी त्यांच्याकडील मनुष्यबळ, मशनरी, विद्युत बॅकअप, औषधसाठा, रुग्णवाहिका या प्रकारची साधन सामुग्री तयार ठेवावी. त्याचप्रमाणे पूराच्या परिस्थितीत स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्यात येवून तेथे विद्युत अथवा जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी. संभाव्य पूरग्रस्त, शोध व बचाव कार्यात काम करत असलेल्या कर्मचार्‍यांसाठी तात्पुरता निवारा, भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबतही नियोजन करण्यात यावे. आपत्ती काळात प्रशासकीय यंत्रणांनी संपर्कात असणे महत्वाचे असल्याने अतिमहत्वाचे क्रमांक असलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपद्धती तयार करून जिल्हा नियंत्रण कक्षास सादर करण्यात यावा, अशा सूचना जिल्हा आपत्ती प्राधिकरणाने महानगरपालिका प्रशासनास दिल्या आहेत.

नंदिनी नदीवर स्वतंत्र झोन

नंदिनी नदीवर स्वतंत्र झोन तयार करून तेथे स्वतंत्र पथके नेमण्यात यावीत. तसेच 2016 व 2019 या वर्षातील पुराचा इतिहास लक्षात घेता, महानगरपालिकेच्या हद्दीतील धरणा खालच्या क्षेत्रात मदत कार्यासाठी झोन स्थापन करावेत. तसेच त्याठिकाणी बचाव कार्यासाठी पथके नियुक्त करावीत. अतिवृष्टीमुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने शहरातील काही भागात पाणी शिरते, यामुळे पुरासारखी आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते. पावसाळ्यातील या संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे.

काझीगढी बाबत अधिक सतर्कता

शहरी भागात अतिवृष्टी झाल्यास काझीगढी येथे दरड कोसळण्याची अधिक शक्यता असते. अशा परिस्थितीत तेथील नागरिकांशी मान्सून पूर्वीच चर्चा करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे त्या नागरिकांना स्थलांतरीत केलेल्या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्व तयारी व उपाययोजना करण्यात याव्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com