Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याMIM चा प्रस्ताव शरद पवारांनी एका वाक्यात धुडकावला, म्हणाले...

MIM चा प्रस्ताव शरद पवारांनी एका वाक्यात धुडकावला, म्हणाले…

मुंबई | Mumbai

एमआयएमने (MIM) महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) सहभागी होण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे हा प्रस्ताव कधीच मान्य होऊ शकणार नसल्याचं शिवसेनेने (Shivsena) म्हटलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आता MIM चा प्रस्ताव सरळसरळ धुडकावून लावला आहे.

- Advertisement -

‘कोणी कोणत्या पक्षासोबत जायचे हे ते स्वत: सांगू शकतात. मात्र ज्यांच्यासोबत जायचे आहे, त्या पक्षांनी तर प्रस्तावावर होय म्हटले पाहिजे. हा एक राजकीय निर्णय आहे. हा प्रस्ताव महाराष्ट्रापुरता केला असल्यास तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अशाप्रकारच्या राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला देत नाही. राज्यामध्ये अशाप्रकारचा निर्णय आपण घेऊ शकतो हे जोपर्यंत पक्षाची राष्ट्रीय समितीन स्पष्ट करत नाही तोपर्यंत अशाप्रकारची भूमिका घेता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये अशाप्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही,’ असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान MIM चे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीसोबत येण्याचा प्रस्ताव दिला. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना भेटणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एमआयएमशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हणत प्रस्ताव धुडकावून लावला. तसंच एमआयएमही भाजपची बी टीम असल्याचं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या