प्रवासावेळी विशेष राजशिष्टाचार नको

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश
प्रवासावेळी विशेष राजशिष्टाचार नको

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी रस्ते प्रवासाच्या दरम्यान त्यांच्या ताफ्याला पोलिसांकडून देण्यात येणारा विशेष राजशिष्टाचार नाकारला आहे. मुख्यमंत्री प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते.

मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष राजशिष्टाचार नको, (The Chief Minister's convoy does not need special courtesy) असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले.

यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतूक रोखण्यात येते.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो.

अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रूग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या प्रवासाचा वाहनचालकांना नाहक त्रास नको, अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com