Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यास्वार्थ नाही; तालुका विकासासाठी निर्णय : आ. भुसे

स्वार्थ नाही; तालुका विकासासाठी निर्णय : आ. भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मालेगाव ( Malegaon ) शहरासह तालुक्याच्या विकासासाठी तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत या दृष्टीकोनातूनच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्वार्थ अथवा दबावातून हे झालेेले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता कृषीमंत्री पदापर्यंत पोहचू शकला आहे. शिवसेनाप्रमुख आपले दैवत असल्याने शिवसैनिक म्हणूनच आपण काम करीत राहणार असल्याची माहिती आ. दादा भुसे यांनी येथे बोलतांना दिली.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडी सरकार पायउतार होवून शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले आहे. या सत्तांतर नाट्यात एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले कृषिमंत्री दादा भुसे हे काल मालेगाव शहरात दाखल झाले.

शिंदे गटात सामील होण्याची भुमिका विषद करण्यासाठी बालाजी लॉन्स प्रांगणात भुसे समर्थक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना आ. भुसे यांनी व्यक्तीगत पातळीवर अथवा स्वार्थ किंवा दबावामुळे हा निर्णय घेतला नसून फक्त शहर व तालुक्याच्या प्रलंबित विकासकामांची पुर्तता व्हावी यासाठी घेतला असल्याचे स्पष्ट केले.

सामान्य कार्यकर्ता ते कृषीमंत्री पदापर्यंतची आपली वाटचाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आशीर्वाद व विश्वासामुळेच होवू शकले असल्याचे स्पष्ट करीत आ. भुसे पुढे म्हणाले, बंडखोरीच्या या निर्णयाचे आपण समर्थन अथवा विरोधही करणार नाही. यश अपयश हा विषय नाही. व्यक्तीगत पातळीवर हा निर्णय घेतांना दु:ख, वेदना झाल्या, कोणाच्या चुका झाल्या, कुणी काय निर्णय घेतला पाहिजे याबाबत आपण काहीच बोलणार नाही. 55 आमदारांपैकी 40 आमदार अशी भुमिका घेतात तेव्हा ती कुणाच्याही दबावामुळे घेतलेली नाही हे लक्षात घ्या.

40 आमदार एका बाजुला झाल्याने नाइलाजास्तव आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला व तो देखील फक्त मालेगाव शहर-तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सुटावेत, विकासकामे व्हावीत या दृष्टीकोनातूनच घेतला आहे. यामागे आपला वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नसल्याचे आ. भुसे यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यात मोठ्या संख्येने भुसे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणा देत समर्थकांनी मेळावा दणाणून सोडला होता. या मेळाव्यास माजी उपमहापौर नीलेश आहेर, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, सखाराम घोडके, कृउबा माजी सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, विनोद वाघ, महिला आघाडीप्रमुख संगीता चव्हाण, छाया शेवाळे, मनिषा आहेर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यास शिवसेनेचे पदाधिकारी अ‍ॅड. संजय दुसाने, उपजिल्हाप्रमुख श्रीरामा मिस्तरी, महानगरप्रमुख राजाराम जाधव, प्रमोद शुक्ला आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र उपस्थित नव्हते.

- Advertisment -

ताज्या बातम्या