मनपात अनुकंपावरील भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

उमेदवारांच्या हरकतीसाठी 7 दिवसांची मुदत
मनपात अनुकंपावरील भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

नाशिक । प्रतिनिधी

महापालिकेत कार्यरत असतांना निधन झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंप तत्वावर नोकरी देण्यासंदर्भातील शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाकडून सुरु करण्यात आलेली प्रक्रिया अतिम टप्प्यात आली आहे. याकरिता यादीतील उमेदवाराच्या अर्जांवर हरकतीसाठी प्रशासनाकडून सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यामुळे आता अनुकंपावरील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार नाशिक मनपातील अनुकंपा नियुक्ती करण्याच्या दृष्टीने कर्मचारी निवड समितीने नमूद केलेल्या अभिप्रायाबाबत अर्जदारांपैकी कोणाची काही हरकत असल्यास 7 दिवसाच्या आत मनपाच्या मेलवर अथवा पोस्टाद्वारे पत्रव्यवहार करण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध संवर्गातील कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचे सेवेत असताना निधन झाले, अशा कर्मचार्‍यांच्या वारसांनी त्या त्या वेळी अर्ज करून अनुकंंपा तत्वावर नाशिक महापालिकेत नोकरी मिळण्याची मागणी अर्ज केला आहे.

राज्य शासनाच्या दिनांक 19 जानेवारी 2021 च्या पत्रानुसार अनुकंपा नियुक्ती योजनेअंतर्गत नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार नाशिक मनपाने कर्मचारी निवड समिती गठीत केलेली आहे.समितीने वेळोवेळी घेतलेल्या बैठकांमध्ये आलेल्या अर्ज व अनुषंगिक आवश्यक असलेली कागदपत्रे याची छाननी केलेली आहे.

कर्मचारी निवड समितीचे इतिवृत्त मनपाच्या nmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून इतिवृत्तात संबंधित अर्जदाराची नमूद करण्यात आलेली माहिती, तपशील किंवा कर्मचारी निवड समितीने नमूद केलेले अभिप्राय याबाबत अर्जदारांपैकी कोणाची हरकत असल्यास किंवा अर्जदारास आनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करावयाची असल्यास सदरची सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसाच्या आत dmc_gad@nmc.gov.in या ई-मेल आयडीवर ई- मेल द्वारे किंवा पोस्टाद्वारे सादर करण्यात यावी. मुदतीनंतर केलेल्या पत्र व्यवहाराचा विचार केला जाणार नाही असे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com