
नाशिक | प्रतिनिधी Nashik
चहा टपरीचे नाशिक महानगरपालिका होकर्स झोन मध्ये बायोमेट्रिक नोंदणी करून देऊन व पावती सुरू करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महापालिकेच्या पश्चिम विभागातील जाहिरात व परवाना विभागाच्या लिपिक तथा प्रभारी कार्यालय अधीक्षकासह शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदाराचा चहा टपरीचा व्यवसाय असून त्याला त्याच्या टपरीची बायोमेट्रिक नोंदणी महापालिकेच्या हॉकर्स झोन मध्ये करून पावती सुरु करण्याच्या मोबदल्यात महापालिकेच्या पश्चिम विभागाचे जाहिरात व परवाना विभागाचे लिपिक तथा प्रभारी कार्यालय अधीक्षक राजू उत्तम वाघ (48) यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
मात्र तडजोडी अंती १८०० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करून वाघ याच्या सांगण्यावरून त्याच कार्यालयातील शिपाई प्रवीण अर्जुन इंगळे (42) याने राजीव गांधी भवन या कार्यालयाच्या मुख्य गेट जवळील पार्किंग मध्ये सदर लाच पंचांसमोर स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे,वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल,अंमलदार किरण अहिरराव,राजेंद्र गीते,संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने यशस्वीरित्या केली.