नाशिक । प्रतिनिधी Nashik

महानगरपालिकेत अनेक गैरव्यवहार झाल्याचे अनेकदा उघडकीस आले असून यात अलिकडचे टीडीआर घोटाळ्याचा समावेश आहे. नाशिककर करदात्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम सुरु असल्याचे समोर आले आहे.

भ्रष्टाचाराच्या मालिकांत लोकप्रतिनिधी, अधिकारी व कधी बांधकाम व्यावसायिकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहे. शहरात गाजत असलेल्या तीन टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी प्रतम महापौरांनी चौकशी समिती गठीत करीत नाशिककरांना आश्वस्त केले आहे. यामुळे सत्ताधारी भाजपने पारदर्शक कारभार म्हणुन ही घोषणा केली असुन भविष्यात हा चौकशीचा फार्स ठरु नये अशी अपेक्षा नाशिककरांची आहे.

नाशिक महापालिकेवर लोकप्रतिनिधीपेक्षा अधिकारीच अधिकार गाजवतात, नगरसेवकांना जुमानत नाही, तर कधी बांधकाम व्यावसायिक हेच नगररचना विभाग चालवितात असे गंभीर आरोप नगरसेवक करतात, महापालिकेच्या तिजोरीची लुट अधिकारी व ठेकेदार करीत आहे, असे गंभीर आरोप आजपर्यत महासभा व स्थायी समिती सभेत करण्यात आले आहे. या आरोपानंतर आजपर्यत अनेक चौकशी समिती गठीत करण्यात आल्या. यात मागील पंचवार्षिक काळात अनेक चौकश्या समिती गठीत करण्याचा विक्रम झाला.

मात्र समिती सदस्यांचे अहवाल महासभेसमोर आणि नाशिककरांसमोर आलेच नाही. चौकशी समितीतील नगरसेवकांना देखील चौकशी समितीचा विसर पडतो. यात अनेकदा मॅनेज शब्दाचा आधार घेऊन चौकश्या गुंडाळल्या गेल्या आहे. अनेक अधिकारी स्वेच्छा निवृत्तीने आणि सेवानिवृत्तीने बाहेर गेल्यानंतरही चौकश्या समितीचा निष्कर्ष बाहेर आलेला नाही. अशाप्रकारचा कारभार नाशिक महापालिकेत गेल्या काही वर्षात सुरू आहे. यातील मोजके गैरव्यवहाराच्या विरोधात न्यायालयात यचिका दाखल झाल्या आहे. एकुणच अलिकडच्या काळातील कारभारावर तीव्र आक्षेप थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यापर्यत जाऊन पोहचला आहे.

अशाच पार्श्वभूमीवर महापालिकेत अलिकडच्या काळात टीडीआर घोटाळे झाल्याचे समोर आले असून यातील एक घोटाळा 100 कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा आहे. नगररचना विभागाकडे कायम संशयाने पाहिले जात असून याठिकाणी मर्जीतील अधिकारी आणल्यानंतर सर्वकाही करता येते, अशी चर्चा लपून राहिलेली नाही. शहराला आकार देण्याबरोबर शहराचे आरोग्य सदृढ करण्याचे काम नगररचना विभागावर असतांना याठिकाणी सध्या सुरु असलेल्या कारभारावर गंभीर आरोप होत असतांना सत्ताधारी याकडे आजपर्यत दुर्लक्ष करीत होते.

आता मात्र महापौर सतिश कुलकर्णी यांनी यांनी टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीची हिम्मत दाखविण्याचे काम केले आहे. त्यांचा हा धाडसी निर्णय स्वागतार्ह असाच आहे. करदात्याकडून महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार्या पैशाची लुट होऊ नये आणि विश्वस्त म्हणुन याठिकाणी पारदर्शक कारभार करण्याची जबाबदारी आता सत्ताधारी भाजपने घेतली आहे.

मागील पंचवार्षिक काळात झालेल्या अनेक चौकश्याचा फार्स ठरला, असे आताच्या चौकशीत होऊ नये. महापौरांनी गठीत केलेल्या चौकशी समिती निम्मे अधिकारी व निम्मे लोकप्रतिनिधी असल्याने पुढच्या काळात चांगली चौकशी होऊन यातील दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा नाशिककरांची आहे. भविष्यात असे धाडस पुढचे अधिकारी करणार नाही, यानुसार कडक कारवाई होणे गरजेचे आहे.