नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभाग सक्षम करण्यासाठी अग्निशमनच्या ताफ्यात नवीन 5 मल्टीपर्पझ फायर वाहने घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात येत असुन तो लवकरच प्रशासनाकडुन महासभेत पाठविण्यात येणार आहे. या नवीन अग्निशमन वाहनांमुळे आगीच्या ठिकाणी पोहचल्यानंतर आगीच्या स्वरुपावरुन वाहनातील उपलब्ध सामुग्रीचा वापर करून आग विझविली जाणार असल्याने जीवीत व वित्त हानी टळणार आहे.

नाशिक महापालिका अग्निशमन विभागाकडे सध्या लहान मोठी 28 फायर बंब असुन यापैकी मोठी अग्निशमन बंब 15 वर्षापेक्षा जुने झाली आहे. या जुन्या वाहनातून केवळ पाण्याचा वापर केला जातो. अशा वाहनातून रासायनिकाला आग लागल्यास डीसीपी, फोम किंवा कार्बन डाय ऑक्सीईड याचे सिलेंडर जोडून फवारणी करावी लागते.

विविध प्रकाराच्या पदार्थाना आग लागल्यानंतर त्या प्रकारे आग प्रतिबंधक मटेरियल वापरावे लागत असल्याने पाण्याच्या बंबाबरोबर इतर प्रकारचे बंब याठिकाणी आणले जाते. यामुळे आग विझविण्यासाठी काही वेळ जात असल्याने वित्त हानीची शक्यता असते. यामुळेच आता महापालिका 5 नवीन मल्टीपर्पझ वाहने खरेदी करणार आहे.

या बहुउद्देशिय वाहनात 4 हजार लिटर पाणी, 500 लिटर फोम, कार्बन डाय ऑक्सीईड सिलेंडर यासह अत्याधुनिक सामुग्री यात असणार आहे. यामुळे आगीच्या ठिकाणी पोहचल्यानंतर स्थिती पाहुन तात्काळ आग विझविण्यासाठी लागणार्या सामुग्रीचा वापर केला जाऊन आगीवर नियंत्रण मिळविता येणार आहे.

यामुळे जिवीत व वित्त हानी वाचण्यास मोठी मदत होणार आहे. राज्यातील मुंबई, पुणे अशा महापालिकांकडुन अशाप्रकारे मल्टी पर्पझ अग्निशमन बंबाचा वापर केला जात आहे. याकरिता आता पर्पझ अग्निशमन बंबासंदर्भातील माहिती घेतली जात असुन यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला जात आहे.

सुरक्षा निधी घेण्यासंदर्भात माहिती घेणे सुरु

राज्य शाासनाकडुन नुकताच युनिफाईड डीसीपीआर जाहीर झाल्यानंतर शहरात उंच इमारतींना असलेली परवानगीची अट काढुन टाकण्यात आली आहे. यामुळे आता 100 फुटावरील इमारतींना केवळ अग्निशमन दलाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

म्हणुन पुढील वर्षातील बजेट मध्ये 70 मीटर वरील फायर लॅडर घेण्यासाठी तरतुद केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता शहरात उंच इमारतींना सुरक्षा निधी किती लावावा, यासंदर्भातील पुणे व इतर महापालिकेकडुन माहिती मागविली जात आहे.