मनपा निवडणूक : पाच माजी महापौर पुन्हा निवडणूक लढणार

jalgaon-digital
6 Min Read

नाशिक । फारूक पठाण Nashik

नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 Prepration of NMC Elections -2022 ची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदा नाशिक शहरात 11 नगरसेवकांची Corporators वाढ होणार असून नुकतीच महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून आरक्षण विरहित प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. तर निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी अनेक दिग्गज तयारीला लागले आहेत.

यामध्ये पाच माजी महापौरांचा former mayors देखील समावेश आहे. तर अनेक माजी उपमहापौर, स्थायी समिती सभापती देखील निवडणूक मैदानात दिसणार आहे.विद्यमान महापौर तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश कुलकर्णी हे 1997 पासून महापालिकेत त्यांच्या परिसराच्या नागरिकांचे नेतृत्व करीत आहेत. सर्वजाती धर्माचे लोक या भागात राहतात. तसेच काही मुस्लीम बहुल भाग देखील महापौर कुलकर्णी यांच्या प्रभागाला जोडला गेलेला असला तरी महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्यांच्या संपूर्ण प्रभागात व परिसरात भरपूर विकास कामे करून नागरिकांची मने जिंकली आहेत.

मात्र त्यांच्या वयाचा विचार केल्यावर त्यांची दुसरी पिढी म्हणजेच त्यांची मुलगी संध्या कुलकर्णी किंवा मुलगा वैभव कुलकर्णी निवडणुकीच्या मैदानात येणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र विद्यमान महापौर सतीश कुलकर्णी यांनी निवडणूक लढवायची की नाही याबाबत निर्णय घेतला नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने सतीश कुलकर्णी यांना महापौरपदाची संधी दिल्यानंतर कुलकर्णी यांनी त्यांच्या अनुभवाचा पूर्ण उपयोग करीत नाशिक शहराच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांच्याच काळात महापालिका बस सेवा सुरू झाली तर महापौर सतीश कुलकर्णी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नमामी गोदेला देखील केंद्र सरकारने 1823 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याप्रमाणे सतीश कुलकर्णी यांनी नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्क, आयटी हब व्हावे, यासाठी पुढाकार घेतला आहे.

त्याचप्रमाणे शहरातील सुमारे 22 भूखंड बीओटी तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. नाशिक शहराचा विकास करताना महापालिकेच्या उत्पन्नात देखील वाढ व्हावी तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळावे, या पद्धतीने सतीश कुलकर्णी यांनी काम केल्याचे दिसून येत आहे. मात्र 2022 च्या निवडणुकीत उमेदवार राहणार की नाही याबाबतचा निर्णय घेतला नसला तरी नागरिक त्यांना आग्रह करत असल्याचे समजते.

2017 मध्ये नाशिक महापालिकेत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान झाला होता तर एक हाती सत्ता नाशिककरांनी दिली होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या सभेत नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर मोठ्या गतीने वातावरण फिरुन भाजपच्या वतीने मतदारांनी कॉल दिला. यानंतर पंचवटी मधून 1997 पासून निवडून येणार्‍या पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी यांना भारतीय जनता पक्षाने महापौरपदाची संधी दिली. त्यांंनी दोन वेळा खुल्या म्हणजे पुरुष जागेवरून निवडणूक लढवून त्या निवडून आल्या आहेत तर तीन वेळा महिला राखीव गटातून निवडून आल्या आहेत. ्यांच्या काळात नाशिक शहरात विकास कामे झाली तर आता पुन्हा त्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे. त्या प्रभाग 2 मधून इच्छुक आहेत.

2012 मध्ये झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र निर्माण सेनाने चमत्कार घडवत 40 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले होते तर राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला महापौर हा नाशिकमध्ये विराजमान झाला होता. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पेशाने वकील असलेल्या यतीन वाघ यांना पक्षाचा पहिला महापौर केले. त्यानंतर दुसर्‍या वेळी पंचवटीमधून निवडून आलेले अशोक मुर्तडक यांना महापौरपदाची संधी देण्यात आली होती. वाघ हे दहा वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत तर अडीच वर्ष ते महापौर होते. त्याचप्रमाणे अशोक मुर्तडक हे 1997 पासून सलग निवडून येत आहे. सध्या हे दोन्ही माजी महापौर 2022 च्या निवडणुकीसाठी तयारी करीत आहे. यतीन वाघ हे प्रभाग क्रमांक 18 मधून तर अशोक मुर्तडक सहा किंवा पाच मधून उमेदवार राहणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले महापौर झालेले वाघ हे सध्या शिवसेना पक्षात आहे. मुर्तडक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे. दरम्यान, अशोक मुर्तडक यांचे चिरंजीव विशाल मुर्तडक देखील यंदा पहिल्यांदा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत.

शिवसेनेचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते विनायक पांडे पुन्हा महापालिका निवडणुकीच्या रणसंग्राममध्ये उतरणार आहेत. विनायक पांडे हे पंधरा वर्ष नगरसेवक होते तर 2017 साली त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. आता त्यांचा मुलगा ऋतुराज पांडे तसेच पांडे स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करीत आहेत. विनायक पांडे जुने नाशिक मधील प्रभाग एकोणावीस मधून आपले नशीब आजमावणार असल्याचे समजते. विनायक पांडे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याकडे पक्षाने अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या यापूर्वी दिल्या आहेत. शिवसेना महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख आदी पदांवर राहून शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार केलेला आहे. यामुळे यंदा पुन्हा ते निवडणुकीच्या मैदानात दिसणार आहेत.

यांची नजर विधानसभा, लोकसभेवर

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी मंत्री व माजी महापौर डॉ. शोभा बच्छाव महापालिका निवडणूक लढवणार नसून विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवण्याकडे त्यांचा कल आहे.त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार तथा माजी महापौर वसंत गिते हेदेखील स्वतः महापालिका निवडणुकीच्या मैदानात दिसणार नाही. मात्र ते विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करीत असल्याचे चित्र आहे.भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महापौर तथा माजी आमदार बाळासाहेब सानप हे देखील स्वत: यंदा महापालिका निवडणुकीच्या मैदानात राहणार नाही, तर त्यांचा मुलगा मच्छिंद्र सानप पुन्हा निवडणुकीच्या मैदानात दिसणार आहे. सानप हे पक्षाची सत्ता पुन्हा महापालिकेत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे माजी महापौर ज्येष्ठ नेते अशोक दिवे हे देखील महापालिका निवडणुकीत उमेदवार राहणार नाही तर त्यांचे दोन मुले नगरसेवक आहेत व पुढेही ते इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *