Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बदली; कैलास जाधव नवे आयुक्त

नाशिक मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बदली; कैलास जाधव नवे आयुक्त

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महापालिका आयुक्तांची बदली झाली असून त्यांच्या जागी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाधव यांनी त्वरित आपला कार्यभार सोडून नाशिक मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारावा असे आदेश अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढले आहेत.

- Advertisement -

नाशिक शहरातील वाढता करोना प्रादुर्भाव व मृत्यु दर कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे आणि स्मार्ट सिटी अंतर्गत कामांना चालना देऊन नाशिकचे नाव देशात पोहचविणारे तसेच करोना काळात चांगली कामगिरी करणार्‍या मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची आज बदली करण्यात आली आहे.

आयुक्त गमे यांच्या जागेवर महाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाधव यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणुन काम केलेले असल्याने त्यांना नाशिक शहराची माहिती आहे.

आयुक्त गमे यांच्या बदलीनंतर चर्चेनंतर चांगले अधिकारी नाशिकला टिकत नसल्याची चर्चा पुन्हा एकदा नाशिकमध्ये सुरु झाली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात आलेले तात्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या कामातून वेगळा ठसा उमटविल्यानंतर 2 वर्षाचा कलावधी पुर्ण न होताच त्यांची बदली झाली होती.

त्यानंतर अभिषेक कृष्णा व तुकाराम मुंढे यांनी देखील आपला कालावधी पुर्ण केला नाही. तुकाराम मुंढे यांच्या वादळी कारकीर्दीनंतर नाशिक महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी राधाकृष्ण गमे यांच्याकडे आली होती.

गमे मितभाषी आयुक्त महापालिकेला लाभले होते. प्रशासन आणि जनता यामध्ये त्यांनी चांगला समन्वय ठेवून हुशारीने कारभार हाकला होता. त्यांनी आपल्या 2 वर्षात चांगली कामगीरी केली आहे. करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी तात्काळ उपाय योजना करतांना महापालिका रुग्णालये व खाजगी रुग्णालयात चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देण्यासाठी आयुक्त गमे यांच्याकडुन चांगल्या प्रकारे काम करण्यात आले आहे.

तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 या केंद्राच्या अभियांनात नाशिक शहराचा देशात अकराव्या तर राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या रॅकींगमध्ये नाशिक शहर हे देशात पंधरावे आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर आले आहे. अशाप्रकारे मोठे काम आयुक्त गमे यांनी केले होते.

नाशिकमधील करोनाचा वाढता आकडा नव्या आयुक्तांसमोर मोठे आव्हान राहणार आहे. त्यांच्याकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा नाशिककरांना आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या