
मुंबई | Mumbai
नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे समर्थन केल्यामुळे अमरावतीत उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या झाली. भाजप (BJP) नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. अमरावतीपाठोपाठ अहमदनगरच्या कर्जतमध्येदेखील एका तरुणाला मुस्लीम युवकांकडून धमकावण्यात आले. कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला...
मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. देशात शरिया कायदा लागू झालेला नाही, जर हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राणेंनी दिला आहे.
ते म्हणाले की, नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे पहिली हत्येची घटना उदयपुरमध्ये घडली. त्यानंतर अमरावतीत घडली. ४ ऑगस्टला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असाच प्रकार घडला. प्रतिक पवार नावाच्या एका युवकावर १० ते १५ मुस्लीम युवकांनी हल्ला केला.
नुपूर शर्माचा विषय बंद आहे, मात्र त्यानिमित्ताने वारंवार असे हल्ले होणार असतील, हिंदूंना टार्गेट केले जाणार असेल तर आमचाही हात कुणी बांधलेला नाही, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आमच्या देवी देवतांची विटंबना केली, तरी आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देतो, मात्र एकालाही जीवे मारल्याचे ऐकले आहे का? पण तुम्ही तशी पावले उचलत असाल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी उत्तर द्यावे लागेल, हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल, आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करु नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कर्जत येथील हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण जीवन मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची भेट घेऊन त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन नितेश राणे यांनी दिले आहे.