Nipah Virus : देशात पुन्हा व्हायरसची दहशत! केरळपासून कर्नाटकपर्यंत चिंता, धोका किती?

Nipah Virus : देशात पुन्हा व्हायरसची दहशत! केरळपासून कर्नाटकपर्यंत चिंता, धोका किती?

दिल्ली | Delhi

काही दिवसांपूर्वी केरळमध्ये निपाहसारख्या संसर्गामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने तिथे अलर्ट जारी करण्यात आला होता. दिवसेंदिवस तेथील परिस्थिती अधिक चिंताजनक होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.

कोझिकोड जिल्ह्यात प्राणघातक निपाह विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानं प्रशासनाने नऊ ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये कोविडसारखे कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. मेंदूला हानी पोहोचवणाऱ्या विषाणूमुळे, श्वसनाचा त्रास आणि एन्सेफलायटिसमुळे दोन मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या अधिकारी या लोकांच्या संपर्कात असलेल्या ‘हाय-रिस्क’ असलेल्या नागरिकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. निपाह विषाणूची लागण झालेल्या आणखी पाच रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका वृत्तवाहिनीने या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

दरम्यान, केरळमधील निपाह व्हायरसचा धोका लक्षात घेता कर्नाटक आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ज्यात केरळमधील व्हायरस प्रभावित भागात अनावश्यक प्रवास करणे टाळा असं आवाहन जनतेला केले आहे. केरळच्या सीमावर्ती जिल्ह्यात दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि म्हैसूर आणि कर्नाटक राज्य प्रवेश एन्ट्रीवर देखरेख वाढवण्यात आली आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, निपाह व्हायरस एक झुनोटिक व्हायरस आहे. म्हणजे प्राण्यांच्या माध्यमातून तो माणसात पसरतो. काहीवेळा तो खाण्यापिण्याद्वारे आणि व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो. मलेशियातील सुंगाई निपाह या गावात १९९९ मध्ये निपाहची पहिली घटना समोर आली होती. त्यामुळे या विषाणूला निपाह असे नाव देण्यात आले आहे. हा विषाणू वटवाघळांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरतो. त्याचबरोबर डुक्कर, कुत्रे, मांजर, घोडे आणि शक्यतो मेंढ्यांमधून देखील हा विषाणू पसरू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर तो इतरांनाही संक्रमित करू शकतो.

निपाह व्हायरसची लक्षणे कोणती?

जर एखाद्या व्यक्तीला निपाह विषाणूची लागण झाली तर त्याला जास्त ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यात अडचण, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणे दिसतात. त्याच वेळी, परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती २४ ते ४८ तासांच्या आत एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि कोमात जाऊ शकते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com