आता निलेश राणेंवरही गुन्हा दाखल…; काय आहे प्रकरण?

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना दुहेरी धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांचा मुलगा आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर संतोश परब हल्ला प्रकरणी अटकेची टांगती तलवार असतानाच आता त्यांचा दुसरा मुलगा आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

सध्या संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे जामिनासाठी न्यायालयात फेऱ्या मारत आहेत. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मंगळवारी नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळाला होता. यानंतर नितेश राणे गाडीत बसून न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडत असताना पोलिसांनी त्यांची गाडी रोखून धरली होती. त्यावेळी नितेश यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे कमालीचे आक्रमक झाले होते.

निलेश राणे पोलीस अधिकाऱ्यांशी वरच्या पट्टीत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला १० दिवस अटकेपासून संरक्षण दिले असताना पोलीस आमची गाडी अडवूच कशी शकतात, असा जाब निलेश राणे यांनी पोलिसांनी विचारला. बराचवेळ हा वाद सुरु होता. तेव्हा निलेश राणे तावातावाने पोलिसांशी बोलत होते. दरम्यान न्यायालयाच्या आवारात हुज्जत घातल्या प्रकरणी निलेश राणे यांच्यासह भाजपच्या अन्य पाच जणांवर ओरोस पोलीस स्थानकात रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त जमाव केल्याप्रकरणी आणि जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांशी हुज्जत घातली सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हे दाखल करण्यात आलेत.

दरम्यान कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदूर्गच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांनी पत्रात म्हटलं आहे की, जिल्ह्यात जमावबंदी आदेश असतानाही निलेश राणे यांनी सत्र न्यायालयाच्या बाहेर बंदोबस्तासाठी तैनात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वत: व त्यांच्या २५ च्या आसपास समर्थकांनी अरेरावी व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तरी याबाबत सखोल चौकशी करुन निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *