नवी दिल्ली

छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारीला साजरा केला जातो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, असा आदेश गृह विभागाने नुकताच काढला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे.

शिवजयंतीनिमित्त आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यावेळी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता अशा नियमांचे पालन करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तर यावेळी कोरोना, मलेरिया, डेंगी यासह अन्य आजारांविषयी जनजागृतीवर भर द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दहा व्यक्तींशिवाय अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. महाराजांच्या प्रतिमेस अथवा पुतळ्याला पुष्पहार घालताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे संबंधितांना बंधनकारक असेल, असेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. गृह विभागाने या आदेशाची प्रत सर्व जिल्हाधिकारी, महापौर, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविली आहे. आदेशानुसार नमूद बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश गृह विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी हा आदेश नुकताच काढला आहे.

काय आहे नियमावली

– छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करा.

– यंदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.

– सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.

– करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी.

– महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.

– फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.

– आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी