कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी

कुलाबा-सिप्झ मेट्रोची यशस्वी चाचणी
कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

आम्हाला फलंदाजी करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे फक्त अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा (More runs in fewer balls)काढायच्या आहेत, अशी चौफेर फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी मंगळवारी केली. सरकारी काम आणि सहा महिने थांब असे आम्हाला काहीही करायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (Mumbai Metro Rail Corporation)वतीने कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर (एक्वा लाईन) मुंबई मेट्रो ३ (Mumbai Metro 3)च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ (Underground train trial begins) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारीपूत नगर, आरे कॉलनी येथे झाला.

यावेळी बोलताना शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टोले लगावले. मेट्रो ३ च्या प्रकल्पात अनेकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आता विघ्नहर्त्याचे आगमन होणार आहे, त्यामुळे अडथळे दूर होतील. आता विकास थांबणार नाही. वायूप्रदुषण दूर होऊन राजकीय प्रदूषणही बंद झाले आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

मेट्रो-३ प्रकल्पाच्या आरेतील कारशेडमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची टीका अनेकांनी केली. पण इकडे येऊन पाहिले तर या जागेच्या तिन्ही बाजूंनी रस्ते आहेत. त्यामुळे आपण जंगलात जाऊन झाडं तोडलेली नाहीत. लोकांचे व्यापक हित पाहून न्यायालयानेही मेट्रो कारशेडला परवानगी दिली आहे, असे शिंदे म्हणाले.

आम्हाला फलंदाजी करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत. तसा देवेंद्र फडणवीसांचा पाच वर्षांचा अनुभव आहे आणि मी त्यांच्यासोबत आहे. मी सभागृहातही सांगितले की, आधी एकच तुम्हाला जड जात होता, आता ‘एक से भले दो’ आहे.

आम्ही कुठेही राजकारण करणार नाही. परंतु, लोकांना जे पाहिजे ते आम्ही देणार आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. हे पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करणारे सरकार आहे. या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे आमचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना वाटते हे सरकार थोडं आधीच यायला हवं होतं. पण ठीक आहे योग जुळून येण्याच्या काही गोष्टी असतात. लोकांच्या मनातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे, असेही शिंदे म्हणाले.

मेट्रो तीनचा हा प्रकल्प ३३.५ किलोमीटर लांबीचा आहे. या भागात कनेक्टिव्हिटी नव्हती. १७ लाख प्रवासी यामाध्यमातून ये-जा करणार आहेत. साडेसहा लाख गाड्या ज्या आता रस्त्यावरून धावणार नाहीत. लाखो लीटर इंधनाची बचत होणार आहे. पर्यावरण तसेच वेळदेखील वाचणार आहे. मुंबई लोकलचा प्रवास करताना लोकांना अतिशय त्रास होतो. मात्र हा प्रवास आरामदायी होणार आहे, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

मेट्रोमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखणे आपले काम आहे. त्यावरून या प्रकल्पावर पर्यावरणाचा ऱ्हास केला असा आरोप होतो. मात्र, आपण इथे प्रकल्पाच्या तिन्ही बाजूने रस्ते आहेत. अगदी आपण जंगलात जाऊन झाडे तोडत आहोत किंवा वनसंपदा नष्ट करत आहोत, असा काहीच विषय नाही. या प्रकल्पाला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असल्याचे सांगत शिंदे यांनी आदित्य़ ठाकरे यांचा दावा फोल ठरवला.

मेट्रो धावण्यापासून कुणी रोखू शकत नाही : देवेंद्र फडणवीस

मेट्रोची चाचणी यशस्वी झाल्याने आणि आपण सिग्नल दिल्याने आता मेट्रो धावण्यापासून कुणी रोखू शकत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. फडणवीस यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर या प्रकल्पातील अडथळे दूर केले. आता कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत, निर्माण झाल्या तर त्या दूर करण्याचा आमचा मानस राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मेट्रो ३ हा प्रकल्प मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणार होता. मात्र, स्थगितीमुळे प्रकल्प रखडला. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नसता तर तर अजून चार वर्ष हा मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला नसता. २० हजार कोटीची गुंतवणूक वाया गेली असती. आणखी १५ ते २० हजार कोटी खर्च होऊन प्रकल्प पूर्ण केला असता तर त्याचा भार सर्वसामन्य मुंबईकरांवर पडला असता. खरेतर आरेतील कारशेडचा वाद हा पर्यावरणापेक्षा राजकीय जास्त होता, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली. या मेट्रो लाईन मुळे मुंबईतील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर आत्मीय समाधान लाभेल, असे त्यांनी सांगितले.

मुंबई मेट्रो लाईन ३ ची ठळक वैशिष्ट्ये

* मुंबई मेट्रो लाईन-३ च्या ट्रेन्स ८ डब्यांच्या असतील. मेट्रो गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील.

* रीनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल.

* एका गाडीतून अंदाजे २४०० प्रवासी प्रवास करू शकतील.

* ८५ किमी प्रतितास अशा प्रत्यक्षातील प्रचालन वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com