शेतीच्या पद्धतींचे मार्गदर्शन हवे!

शेतीच्या पद्धतींचे मार्गदर्शन हवे!

सटाणा | प्रतिनिधी Satana

माती परीक्षणाचे ( Soil Testing ) महत्व शेतकर्‍यांना ( Farmers ) आता समजले आहे. त्यामुळे त्याकडे शेतकर्‍यांचा कल हळूहळू वाढत आहे. अनेक शेतकरी अभ्यास करुन शेती करत आहेत. शेती फायद्याची कशी होते ते समजावून सांगत आहेत. हा चांगला बदल आहे.

शाश्वत शेतीसाठी मातीची गुणवत्ता महत्वपूर्ण आहे. माती परीक्षण का करतात? कारण मातीतून पिकांचे - वनस्पतींचे पोषण कसे होते, पिकांचे पोषण करण्यासाठी माती किती सक्षम आहे, याबाबतचे मूल्यमापन करण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. मातीची सुपीकता जोपासण्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होते. संशोधकांनी प्रत्येक पीकासाठी सुपीकतेचे मापदंड निश्चित केले आहेत. त्यात जमिनींच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांचा समावेश होतो. सर्व साधारणपणे सदर गुणधर्म टिकवण्यासाठी जमिनीची धुप था़ंबवणे, पिकांचा फेरपालट करणे, जमिनीला विश्रांती देणे गरजेचे असते. खते वापरताना माती पाणी परीक्षण करून त्या शिफारशीप्रमाणे सेंद्रीय खते द्यावीत. जमिनीचा सेंद्रीय कर्ब 1% पेक्षा जास्त रहाण्यासाठी लक्ष दिल्यास जमीन चिरकाळ सुपीक राहू शकते.

रामदास पाटील, संचालक शेतजमीन माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा व आर.बी. हर्बल अ‍ॅग्रो.

माती ही आई

शेतातील माती ही शेतकर्‍यांची आई असून, प्रत्येक शेतकर्‍याचे मातीवर आईसारखेच प्रेम असते. मातीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतामध्ये शेणखत व सेंद्रीय खतांचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळे जमिनीचा पोत सुधारणे शक्य असते. सातत्याने एकसारखे पीक घेण्याने जमिनीची सुपीकता कमी होते. म्हणून शेतकरी बांधवांनी पिकांमध्ये फेरबदल करणे आवश्यक आहे. मातीचे संगोपन शेतकर्‍यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.

पंडितराव ठोके, प्रगतिशील शेतकरी, टेंभे खालचे

सुपीकता खालावते

शेतामध्ये रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर होत असल्यामुळे जमिनीची सुपीकता खालावते. रासायनिक खतांच्या वापरामुळे पुढच्या पिढीला सुपीक जमीन उपलब्ध राहणार नसल्याची स्थिती निर्माण होत आहे. जमिनीला योग्य घटक देण्यासाठी मातीचे परीक्षण आवश्यक आहे. यामुळे शेतीसाठी होत असलेला अवांतर खर्च कमी करणे शक्य आहे.

नितीन आहिरे, प्रगतिशील शेतकरी, वायगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com