नाशकात कोम्बिंग ऑपरेशनची गरज

वाढत्या गुन्हेगारीने सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली
नाशकात कोम्बिंग ऑपरेशनची गरज

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

नाशिक शहरात ( Nashik City) गेल्या काही दिवसांपासून आपापसातील भांडणामुळे वाद निर्माण होऊन लाठ्या काठ्यांसह धारदार हत्यारे काढून हाणामारीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आयुक्तालयातर्फे 'मिशन ऑल आऊट मोहीम'( Mission All Out Campaign) राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच शहरात आपापसातील जुन्या भांडणामुळे धारदार हत्यारे हातात घेऊन हाणामारी किंवा दहशत माजविण्याचे प्रकार घडले होते. यामध्ये सातपूर येथील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याचे बॅनर फाडत असतांनाचे सीसीटीव्ही मधील चित्रीकरण सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. या प्रकारामुळे सातपूर परिसरात दहशतच माजविली गेली होती. शहरातील रेकॉर्डवरील, तडीपार किंवा हत्यारे बाळगणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे मिशन ऑलआऊट अंतर्गत कोंबीग ऑपरेशन राबविण्यात येत होते. यामुळे गुन्हेगारांवर मोठ्याप्रमाणावर वचक बसला होता. तसेच काही वेळा तडीपार देखील आढळून आले होते.

नाशिकचे सध्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळात देखील कोबिंग ऑपरेशन राबविल्यानंतर सराईतांचे धाबे दणाणले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या गुन्हेगारीच्या प्रकारांत संघटीत गुन्हेगारी किंवा दहशत निर्माण करण्याचा संबंधितांचा हेतू नसल्याचे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलतांना दिले होते. गेल्या काही काळात झालेल्या हाणामारीचे प्रकार किंवा खुनाच्या घटना ह्या आपापसातील जुन्या भांडणावरून घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. असे असले तरी सामान्य नागरिकांना सदरहू प्रकार हा दहशतीचा वाटत असल्याने पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा मिशन ऑलआऊट राबवून कोंबिंग ऑपरेशन करण्यात आल्यास सराईतांवर पोलिसांचा वचक कायम राहील.

नवीन उपायुक्तांसमोरील आव्हान

पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 1 व 2 व गुन्हे शाखेच्या उपायुक्तांच्या प्रशासकीय बदली झाली असून नव्याने येणार्‍या तिनही उपायुक्तांसमोर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. तसेच सराईतांच्या याद्या करून त्यांना स्थानबद्ध करायचे कि त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करायची हे मोठे आव्हान देखील त्यांच्यासमोर आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com