Thursday, April 25, 2024
Homeजळगावराष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवारांना दिली अप्रत्यक्षरित्या क्लिन चीट

राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवारांना दिली अप्रत्यक्षरित्या क्लिन चीट

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP Congress) अवस्था काय झाली आहे? जिल्ह्यातील पदाधिकारी व नेते यांचे दहा तोंडे दहा दिशेला आहेत. नेत्यांमध्येच (leaders) समन्वय (coordination) नसल्याने पक्ष रसातळाला (Party Abyss) गेला असल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रांताध्यक्ष आ. जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांच्यासमोर मांडल्या.

- Advertisement -

दरम्यान पक्षविरोधी भूमिका घेणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आ. जयंत पाटील हे जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. मंगळवारी शहरातील पक्ष कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत जिल्हा बैठक पार पडली. जिल्हा बैठकीत तालुकानिहाय पक्ष संघटनेचा आ. जयंत पाटील यांनी आढावा घेतला. या बैठकीला माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, सोपान पाटील, रोहन सोनवणे, अरविंद मानकरी महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महानगराध्यक्षा मंगला पाटील, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

गद्दारी करणार्‍यांवर कारवाई करा – पंकज महाजन

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यात पक्ष संघटनेच्या दृष्टीने मोठी वेगळी परिस्थीती निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे संजय पवार आणि माजी आ. दिलीप वाघ यांनी गद्दारी केली. या गद्दारांवर मात्र कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे नेत्यांना एक न्याय आणि कार्यकर्त्यांना वेगळा न्याय अशी भूमिका पक्षाची असेल तर कोण काम करणार आहे.

त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी नशिराबादचे पंकज महाजन यांनी केली. बैठकीत इतर तालुकाध्यक्षांनीही नेत्यांमध्ये समन्वय नसल्यानेच पक्ष रसातळाला गेल्याचे खापर फोडले. तसेच प्रदेशच्या नेत्यांकडून पक्षविरोधी भूमिका घेणार्‍यांचे सत्कार होत असतील याची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली पाहीजे अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केली.

नाथाभाऊंमुळे पक्षाची ताकद वाढली

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षाची ताकद निश्चीतपणे वाढली आहे. आ. खडसे यांनी अधिवेशनात राज्य सरकारची कोंडी करून अक्षरश: त्यांची लक्तरे फाडली. महत्वाच्या आणि विकासाच्या मुद्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित करून सरकारला निवेदन करायला भाग पाडले. असे बाहुबली नेेते आता राष्ट्रवादीत असल्याने पुढील होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचे चांगले परिणाम दिसतील, असा दावा प्रांताध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केला.

संजय पवार यांना दिली अप्रत्यक्षरित्या क्लिन चीट

जिल्हा बैठकीनंतर प्रांताध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले की, सहकाराच्या निवडणुकांमध्ये पक्षाचा संबंध नसतो. तसेच पक्षाध्यक्ष म्हणून मला त्यावर काही भाष्यही करता येणार नाही असे सांगून आ. जयंत पाटील यांनी संजय पवार यांना अप्रत्यक्षरित्या क्लिन चीटच दिली.

दरम्यान निवडणुकीनंतर पक्षविरोधी काही विधाने केली असतील तर पक्षीय पातळीवर त्याची नोंद घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांना अहवाल सादर केला जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या