
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस (India Security Press )व करन्सी नोट प्रेस ( Currency Note Press)मजदूर संघाची मातृसंस्था असलेल्या हिंदू मजदूर हिंद मजदूर सभा या राष्ट्रीय कामगार संघटनेला 75 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त अमृत महोत्सवाचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीने संपूर्ण नाशिकरोड परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली असून परिसरात ठिकठिकाणी ध्वज लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण नाशिकरोड परिसर व प्रेस कामगार शरद पवार यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. यानिमित्त आज (दि.8)सायंकाळी साडेचार वाजता सिक्युरिटी प्रेसच्या युएस जिमखाना ग्राउंडवर खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला खा. हेमंत गोडसे, हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू, आयएसपी मजदूर संघाचे अध्यक्ष जयवंत भोसले, हिंद मजदूर सभेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शंकरराव साळवी, हिंद मजदूर सभेचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी संजय वडावकर हे उपस्थित राहणार आहे.
यानिमित्त खा. शरद पवार हे प्रेस कामगार नेते व सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे व इतर कामगार नेत्यांसोबत विविध विषयावर चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे या दौर्यादरम्यान खा. शरद पवार हे दोन्ही प्रेसची पाहणीसुद्धा करणार असल्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या गरुड झेप प्रगतीची या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा होणार आहे. या स्मरणिकेत हिंदू मजदूर सभेच्या 75 वर्षांच्या ठळक घडामोडी लिहिण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी आपल्या मनोगतातून अहवाल प्रसिद्ध केला असून मजदूर संघाने आतापर्यंत कामगारांसाठी जे विविध उपक्रम राबविले आहे, त्याचा लेखाजोखा मांडला आहे.
दरम्यान आज सायंकाळी साडेचार वाजता होणार्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, हिंद मजदूर सभेचे उपाध्यक्ष राजेश टाकेकर, अविनाश देवरुखकर, महाराष्ट्र हिंदू मजदूर सभेचे सदस्य कार्तिक डांगे, संदीप व्यवहारे यांनी केले आहेत.