
नागपूर | Nagpur
हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter Session) शेवटच्या दिवशी देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधीमंडळात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर झालेल्या सत्ताबदलानंतर हे पहिलेच हिवाळी अधिवेशन होते. शेवटच्या दिवशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाने केलेल्या प्रत्येक आरोपाचा आपल्या शैलीत समाचार घेतला. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील विविध विषयांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले...
यावेळी ते म्हणाले की, बाहेर तुम्ही ज्यांना सोडून आलात, त्यांच्या वृत्तपत्रात काही बातम्या येणार. ते तुम्ही मनाला लावून घेणार. ते तुम्ही इथे सांगणार. आम्हाला काय देणं-घेणं आहे त्याचं. यशवंतराव चव्हाणांची शिकवण बघा. आचार्य अत्रे त्यांच्यावर किती टीका करायचे. तरी ते दिलदारपणे घ्यायचे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही त्यातून बाहेर या. तुम्हाला बहुमत मिळाले आहे. या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री झाले आहात. असल्या छोट्या गोष्टीत तुम्ही तुमचे मन जास्त रमवू नका. हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना टीका केली.
पुढे ते म्हणाले, महापुरुषांच्या अवमानाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकही शब्द काढला नाही. महापुरुषांचा अपमान होणार नाही यासाठी मंत्र्यांची हकालपट्टी करा, राज्यपाल (Governor) हटवा या मुद्द्यांवर न बोलता दुसरे विषय आणून सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाला बगल दिल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच तरुणांना वाटतंय मला काम कसं मिळणार आहे. महागाई कशी कमी होणार आहे. शेतकऱ्यांबाबत काय भूमिका घेतली जाणार आहे यात रस आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करत आहात,असेही त्यांनी म्हटले.
तसेच सभागृहात मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले. काही आमदारांना (MLA) वाय प्लस सुरक्षा दिली. यावर एका आमदारावर २० लाख खर्च येतो. ज्याला आवश्यकता त्याला सुरक्षा दिली पाहिजे. पण जे त्यांच्या बाजूचे आहे त्यांना सुरक्षा दिली, विरोधातील आमदारांची सुरक्षा काढली. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटी रुपये घेतल्याचे आरोप होते, उद्या यांच्यावर पोलीस (Police) कर्मचाऱ्याने २०० कोटी रुपये घेतल्याचे आरोप केले तर हे जेलमध्ये जातील का? एखाद्या व्यक्तीचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.