
मुंबई | Mumbai
गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आज अजित पवारांनी स्वत: माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली.
तर दुसरीकडे आज सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू असून अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या वावड्या असल्याचे म्हटले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजही शरद पवार या नावाशी बांधलेला आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये ४० आमदार फुटले, ५० फुटले, अशा ज्या बातम्या येत आहेत त्यात अंतिम सत्य नसल्याचे राऊतांनी म्हटले होते. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संजय राऊत यांना चांगलेच फटकारले आहे.
यावेळी पवार म्हणाले की, तुमच्या पक्षाचे काय बोलायचे आहे ते बोला, तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहे, त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करून ते असे झाले, तसे झाले, आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी ठाम आहोत. आमचे वकिलपत्र घेण्याचे कुणी कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडावी, आमची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आमच्याकडे प्रवक्ते आहेत, असे म्हणत मविआच्या बैठकीत आपण याबाबत बोलणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच (NCP) आहोत. मात्र अशा बातम्यांमुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार होतो. अशा बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला.