
मुंबई | Mumbai
दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघर (Kharghar) येथे 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे १३ अनुयायांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. अशातच आता या दुर्घटनेप्रकरणी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे...
अजित पवारांनी पत्रात म्हटले की, ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्याचा सोहळा दि. १६ एप्रिल २०२३ रोजी खारघर (नवी मुंबई) येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्यभरातून सुमारे २० लाख अनुयायी उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान अनेक अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाला. तब्बल ७ तास लाखांहून अनुयायी उन्हात होते. अनेकांना चक्कर आली, अनेकांना उलट्यांचा त्रास झाला. या दुर्दैवी घटनेत १३ निष्पाप अनुयायांचा नाहक बळी गेला. घटनेच्या दिवशीच मी स्वतः नवी मुंबईतील एम.जी. एम. रुग्णालयात जाऊन रुग्णांची आणि डॉक्टरांची भेट घेतली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता,'' असे अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
तसेच पुढे पत्रात त्यांनी म्हटले की, शासनाच्या नियोजन शून्य आयोजनामुळे निष्पाप अनुयायांचा बळी गेला आहे. या घटनेला आणि मृत्यूला पूर्णपणे सरकारच जबाबदार आहे. या दुर्घटनेबद्दल मी सरकारचा जाहीर निषेध करतो. त्याचप्रमाणे ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. त्यामुळे या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत द्यावी.'' अशी मागणी अजित पवारांनी पत्राद्वारे केली आहे.