
मुंबई | Mumbai
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) काल (दि.६) रोजी एका कार्यक्रमात बोलताना सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख करत बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई फुलेंऐवजी सावित्रीबाई होळकर असे म्हटले होते. त्यानंतर संबंधित कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावर भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी आक्षेप घेत अजित पवारांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. यानंतर आता अजित पवारांनी त्या विधानाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे...
यावेळी ते म्हणाले की, बोलण्याच्या ओघात कधी-कधी माणसाकडून चूकभूल होते. परंतु, माध्यमांमध्ये याचा मोठा गवगवा केला जातो. मी सावित्रीबाई फुले यांना चुकून सावित्रीबाई होळकर म्हणालो, यामध्ये मी असा काय मोठा गुन्हा (Crime) केला होता. ज्यामुळे अनेकांचे आकाश पाताळ एक झालं. खरं तर, मी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असून माझ्याकडून अशी चूक व्हायला नको होती. परंतु बोलण्याच्या ओघात चूक झाली, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, मी आहिल्याबाई होळकरांनाही (Ahilyabai Holkar) तसंच बोललो आणि सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख फुले म्हणण्याऐवजी होळकर असा केला. माझी चूक लक्षात आल्यानंतर मी लगेच दिलगीरीही व्यक्त केली. जिथे आपल्याकडून चूक होते, तिथे दिलगीरी व्यक्त करून पुढे जायचं असतं, असे पवार यांनी म्हटले आहे.