
मुंबई | Mumbai
काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्यासह काही बडे नेते बाहेर पडल्यामुळे राष्ट्र्वादीत मोठी फुट पडली आहे. त्यानंतर आता पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटात निवडणूक आयोगामध्ये लढाई सुरु आहे. अशातच आता निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार उद्या म्हणजेच शुक्रवारी दुपारी ३ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाकडे (Election Commission) संघटन कुणाचे याबाबत म्हणणे मांडले जाणार आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांना निवडणूक आयोगासमोर हजर राहावे लागणार आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) फुटीनंतर निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडत पक्षावर दावा केला आहे. यासंदर्भातील माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. यानंतर आता दोन्ही गटाच्या नेत्यांना निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहावे लागणार आहे.
तर दुसरीकडे शरद पवार हे निवडणूक आयोगासमोर उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात असून त्यांच्या गटाच्या वतीने वकिल अभिषेक मनू सिंघवी हे युक्तीवाद करणार आहेत. तसेच शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे ८ ते ९ हजार शपथपत्र (Affidavit) दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आज शरद पवार यांनी दिल्लीत (Delhi) विस्तारीत कार्यसमितीची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत जर निवडणूक चिन्ह गोठवले गेले, जर आपल्या विरोधात काही निर्णय आला तर पुढची रणनीती काय असेल यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यापूर्वी शरद पवार गटातर्फे (Sharad Pawar Group) ९ हजार शपथपत्र आयोगाकडे सादर करण्यात आली होती. तर अजित पवार गटातर्फे ५ हजार शपथपत्रे दाखल करण्यात आली आहेत. तसेच शरद पवार गटाचा दावा आहे की, अजित पवार गटापेक्षा शपथपत्रांची संख्या जास्त आहे. तसेच अजित पवार गटातर्फे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात त्रुटी आढळल्याचे शरद पवार गटाचे म्हणणे आहे. तर राज्यातील एक शिक्षणचालकांनी ९८ जणांची शपथपत्रे भरून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिली होती. त्यापैकी एक शपथपत्र देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी झाला असून त्याच्या नावाने शपथपत्र देण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे.