नवरात्रौत्सव विशेष : महिलांवरील अत्याचारांचा अंत कधी ?

नवरात्रौत्सव विशेष :  महिलांवरील अत्याचारांचा अंत कधी ?

जळगाव : jalgaon

आजच्या आधूनिक युगात महिला शक्ती पुरूषांसोबत काम करत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांबरोबर काम करत आहे. नोकरी व्यवसाय असो वा घरातील कामे त्या योग्य समन्वय साधत करत आहे. त्यामुळे एकीकडे या महिलांचा यशाचा आलेख उंचावत असतांना मात्र दुसरीकडे त्यांच्या अत्याचारांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. आतापर्यत युवती व महिलांवर होत असलेल्या अत्याचारांचा आलेख आता खाली घसरून चार ते पाच वर्षाच्या चिमुलींपर्यंत पोहचला आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक आहे. अत्याचार करणारा हा कोण आहे यावरून त्याच्यावर कायदेशीर कारवाईचे स्वरूप ठरणे हाही एक अत्याचाराच आहे. याबाबत जागर होत महिलांवरील अत्याचाराचा अंत व्हावा असा सूर आजच्या महिलांच्या प्रतिक्रियांतून व्यक्त होत आहे.

जयश्री अनिल पाटील
जयश्री अनिल पाटील

सुरक्षा आणि प्रोत्साहन हवे

नवरात्रीच्या या पावन पर्वावर माझ्या भगिनींना सुखी, समृद्ध आणि सुरक्षित ठेव हेच मी मागू इच्छिते कारण ज्या देशात रोज एक हुंडाबळी जातो, एका महिलेवर लैंगिक अत्याचार होतो, तीन मुलींपैकी एकीला हुंड्यासाठीचा छळ सहन करावा लागतो, तो देश आणि तो समाज स्त्रियांसाठी सुरक्षित आहे का? हाच प्रश्न मला आहे, उत्तर नकारार्थी येत असले तरी यासाठी सरकारी यंत्रणा नव्हे, तर आपली सामाजिक रचना आणि विविध प्रकारच्या रुढी-परंपरा, समाजाची बुरसट मानसिकताच जबाबदार आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये. वंशाचा दिवा म्हणून आजही मुुलाकडेच पाहिले जाते, मुलीला पोटातच ठार मारण्याचे कारस्थान केले जाते. मुुलगा किंवा मुुलगी होणं हा स्त्रीचा दोष नाही. पण, वैद्यक शास्त्राचं ज्ञान नसल्याने आपल्याकडे मुलीच्या जन्मासाठी स्त्रीलाच जबाबदार ठरवून तिच्यावर अत्याचार केले जातात. पुरोगामित्वाचा डांगोरा पिटणारे आम्ही सुधरायला तयार नाही. म्हणून माझ्या भगिनींची पीडा थांबव हीच प्रार्थना मी आदिशक्तीला हात जोडून करते.

जयश्री अनिल पाटील.माजी नगराध्यक्षा अमळनेर नगर परिषद.

योगिता वसंत ठाकूर
योगिता वसंत ठाकूर

अन्यायाला वाचा फोडण्याचा अधिकार हवा

नवरात्रौत्सव म्हणजे केवळ देवीची भक्ती, उपासना, पूजा-पाठ नव्हे तर सबंध मानव जातीला स्त्री शक्तीची जाणीव करून देण्याचा उत्सव. जेथे महिषासुर सारख्या राक्षसासमोर देव हतबल होतात. तेथे देवीला स्वतःची सारी शक्ती एकवटून महाकाली रूपात त्याचा नाश करावा लागला. आज कलियुगातही वेगळी परिस्थिती नाही. आजच्या स्त्रीलाही तिची विविध रूपे दाखवण्याची वेळ आली आहे. आज स्त्री जरी सर्वत्र क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतांना दिसत असली तरी, सर्वच स्त्रियांचे सक्षमीकरण झाले आहे, असे आपणास म्हणता येणार नाही. आजही दुर्गम भागासोेबत सुशिक्षित घरातही स्त्रियांवर अनेक जाचक बंधने आहेतच, का? त्या स्त्रियांमध्येही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद नाही असे मुळीच नाही, पण तिच्या या ताकदीला वाचा फोडण्याचा त्यांना अधिकार नाहीये. हे दुर्देवच!

योगिता वसंत ठाकूर (उपशिक्षिका) सु .भा .पाटील विद्यामंदिर पाचोरा

स्वीटी उमेश बेंडाळे
स्वीटी उमेश बेंडाळे

आधूनिक विचारांची आजची स्री

पूर्वीचा काळ असा होता जेथे पुरुषप्रधान संस्कृती होती. जिथे स्त्रियांचे मत दुय्यम मानले जात होते. परंतु या काळात अशाही काही स्त्रिया होत्या ज्यांनी त्यांच्या सशक्त विचारांनी समाजाला नवीन दिशा दिली. परंतु जसा काळ बदलला तस तसे स्त्रियांचे विचार देखील आधुनिक होत गेले. उच्च शिक्षण घेत महिलांनी स्वत:ला विविध कार्यक्षेत्रात स्वत: ला सिध्द केले आहे. मात्र एक खंत आहे की ग्रामिण भागात स्त्रीयांच्या शिक्षणासाठीच्या सुविधा अजुनही पोहचलेल्या नाहीत. पारिणामी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटूंबातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. असे असले तरी आज अनेक महिला उच्च पदावर काम करताना दिसत आहेत. आज स्रिया कुटुंबातील जबाबदारी सोबतच स्वतः नोकरी, व्यवसाय करून स्वतःचे अस्तित्व घडवत आहेत. राजकारण, समाजकारण, खेळ, शिक्षण, आरोग्य, कला, साहित्य, संशोधन शास्त्र, सुरक्षा यंत्रणा, देशातील शासनाधिकारी या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत.समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्त्रियांकडे अभिमानाने पहावे अशी आज त्यांची कामगिरी आहे. घरातील प्रत्येक नाती प्रेमाने जपत, ती धरते मायेची सावली प्रगतीच्या दिशेने उंच झेपावत, कालची लेक होते आजची माऊली.

सौ. स्वीटी उमेश बेंडाळे उपशिक्षिका जे. टी. महाजन. सेमी इंग्लिश मेडीयम स्कूल फैजपूर

डाँ.मनिषा महाजन
डाँ.मनिषा महाजन

स्व:विश्वास, स्व: अवलंब, स्व: कामगिरी वर भर असावा

खरं तर स्त्री शक्ती महिमा अपार आहे , बाळ जन्म देताना 206 हाड मोडण्याचा दुःख सहन करणारी माझी स्त्री ही, बाळ संगोपन करताना घरात असलेल्या आई, आजी किंवा बहीण ,सासू किंवा इतर व्यक्तीवर अवलंबून राहायला लागते, पण त्यात विसर पडतो की आपण स्वतः एक आई आहे,कधी कधी परिस्थिती याला जाबाबाबदर असते, पण वेळेत आपण हे शिकायला हवं. शहरात आपण मोलकरीण किंवा इतर दुसर्‍या व्यक्ती वर बालसंगोपनासाठी अवलंबून राहतो.त्यामुळं आपले बाळ हे हळु हळु बदलत असते आणि जी व्यक्ती त्या बाळाची काळजी घेते ती नंतर आपल्याला त्रासदायक ठरू शकते. हे आपल्याला ज्या क्षणाला लक्षात येते त्या क्षणाला मात्र आपली पायाखालची जमीन घसरलेली असते. म्हणून मैत्रिणीनो आपण स्व: बळावर कामगिरी करण्याच्या धावपळीत जास्त विश्वास आणि जास्त अवलंबून न राहता ,डोळस पणे पाहायला शिका, जेव्हा कधी एखादी शंका आलीच तर तीच त्याच वेळी निरसन करा, म्हणजे भविष्यात होणारे आघात आणि विश्वासघात कमी होऊ शकतील, हाच स्त्री शक्तीचा जागर असेल.

डाँ.मनिषा महाजन.वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंन्द्र किनगाव ता.यावल.

दिपाली सचिन सोनार
दिपाली सचिन सोनार

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः

सृष्टीच्या निर्माण आणि विकासामध्ये विभिन्न स्वरूपांत, विभिन्न माध्यमांनी आपल्या अतुलनीय शक्तीचे योगदान देणार्‍या सर्वच महिलांचा व त्यांच्या मातृशक्तीचा जागर म्हणजेच नवरात्र नवरात्रीच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर केवळ शब्दांपुरती, वर्तमानपत्रातील लेखांपूर्ती किंवा त्या नऊ दिवसांइतकाच मर्यादित न राहता स्त्रीची जी जी म्हणून काही रूप आणि नाती आहेत त्या त्या सर्वांना तितकाच सन्मान, योग्य ती वागणूक देणे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती या समाजात सुरक्षित आहे ही भावना तिच्या मनात निर्माण करणे, ही आज काळाची गरज आहे. कारण, स्त्री सुरक्षिततेची भावना जर मनात निर्माण झाली तरच स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण देखील कमी होण्यास निश्चित मदत होईल. कुठल्याही स्त्रीकडे बघताना दृष्टिकोन हा सकारात्मक व पवित्रच असला पाहिजे. मुलींना काय करावे आणि काय करू नये हे धडे देत असतानाच मुलांनी कसे वागावे व कसे वागू नये हे देखील पालकांनी जागरूकपणे मुलांना शिकविले पाहिजे. स्त्रियांनी पुरुषांची अर्धी जबाबदारी वाटून घेतली तेव्हा पुरुषांनी देखील स्त्रियांची अर्धी जबाबदारी वाटून घेण्यामध्ये काहीही गैर वाटून घेण्यासारखे नाही. प्रथा परंपरेनुसार पती-पत्नी संसार रथाची दोन चाके असतील तर या दोन्ही चाकांवर चा भार देखील समानच असला पाहिजे.

सौ. दिपाली सचिन सोनार शिक्षिका,

पोदार जिनिअस इंटरनॅशनल स्कूल, जामनेर.

सुनंदा खंडू सैंदाणे
सुनंदा खंडू सैंदाणे

हतबलतेला पंखातले बळ बनवते

स्री ही मनाने हळवी जरी वाटत असली तरी वेळ प्रसंगी खंबीरपणे प्राप्त परिस्थितीशी सामना करून पुढे जाते. प्रश्न न सोडवत बसता त्याचे ती उत्तर होते. लव्हाळ्या सारखी लवचिक व चिवट बनून परिस्थिती पेलते. स्पर्धा न करता स्वतःचीच स्पर्धक बनुन स्पर्धा पार पाडते. हतबलतेला पंखातले बळ बनवते. संसाराची धुरा सांभाळत स्वतःच एक छोटस जग फुलवते. मात्र मनात सारे साठवत ती अबोल अबोली होते. या अबोलीला एकच सांगणे आहे.

‘ओहोळ मनाचा खळखळ वाहू दे

थांबता होईल काळा डोह गे

साचले मनी तुझ्या अथांग जे

तिथेच तु ग सोडून दे

वाहते जल निर्मळ होत जाते

दुखर्‍या मनाला नवीन उभारी देते

आभाळ भरारी घेण्या बोलावते

उड पंखात साठव आभाळ ते.

उड पंखात साठव आभाळ ते.’

सुनंदा खंडू सैंदाणे, प्राथमिक शिक्षिका

शैला रणधीर
शैला रणधीर

स्री म्हणजे दुर्गेचे रूप

स्री ही दोन घराण्याला सांभाळणारी शक्ती असते. ती आई वडीलांकडे असतांना त्यांचा घराण्याचे व कुळाचे नाव रोशन करते. तर विवाह नंतर तीच स्री सासरी देखील घराण्याचे व कुळाचे नाव रोशन करून दोन कुळाचा उध्दार करणारी ही स्रीच असते. ती आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीवर जिवापाड प्रेम करते एवढेच नाही तर कुटुंबावर येणार्‍या संकटाला देखील तीची जबाबदारी समजून ती संकटातून योग्य मार्ग काढून कुटुंब सुखी करते. पतीच्या कामांमध्ये तर ती वेळोवेळी मदत करते संसाराची जबाबदारी सांभाळून मुला-मुलींना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करून उच्चशिक्षित बनवते. तसेच ती मुलगा आणि मुलगी यात भेदभाव न करता दोघांनाही समान समजते. संसारात अनेक प्रकारची सुख दुःख चढ उतार येत राहतात. परंतु ती मनातून खचून जात नाही. जर सर्व स्रीयांनी कोणतेही करत, काम न समजता ती आपली जबबदारी समजून श्रध्देने व मनापासून प्रयत्न केल्यास कोणत्याही कामात अथवा संकटात स्री अपयशी ठरणार नाही. उलट ती पुरुषांनाही आम्ही स्री ही काही कमी नाही हे दाखुन देईल. तरी सर्व स्रीयांनी संकटांना घाबरून न जाता त्या संकटावर मात करत मी विजयीच होईल असे जर सकारात्मक विचार ठेवले तर नक्कीच एक दिवस असा येईल की स्री म्हणजे दुर्गेचे रूप होय असे समाज मान्य करेल. प्रत्येक पुरुषाची खरी प्रेरणा म्हणजेच स्री शक्तीचा जागर होय.

सौ. शैला रणधीर. अध्यक्ष श्री क्षेत्र शिवशक्ती बहुउद्देशीय संस्था बहादरपूर. ता. पारोळा

 निर्मला कडू चौधरी
निर्मला कडू चौधरी

महिलांनी उद्योग नोकरीकडे वळावे

महिलांनी बँक व संस्थांच्या माध्यमातून छोटे-मोठे उद्योग उभारून तसेच छोटे-मोठे नोकर्‍या वेगवेगळ्या ठिकाणी मिळून स्वतःच्या कर्तुत्वावर कार्य केल्याने कुटुंबाचा प्रगतीसाठी सहकार्य होते व विकास साधता येतो त्याचबरोबर बचत गट निर्माण करून त्यातून महिलांनी उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करावा शहरात महिला मोठ्या प्रमाणात ब्युटी पार्लर, शिलाई व्यवसाय ,जनरल स्टोअर्स यासह वेगवेगळ्या व्यवसायात व्यस्त राहून उधोग करीत असतात तर काही वेगवेगळ्या कंपनीकडे रोजगार मिळवण्यासाठी नोकरी करतात त्यातून रोजगार मिळवून प्रगती करतात त्याचप्रमाणे ग्रामीण भागातूनही महिलांनी प्रगती होण्यासाठी व आपल्या परिवाराला मदत होण्यासाठी छोटे-मोठे उद्योग उभारून व नोकर्‍या करुन विकास साधावा व सर्व महिलांनी उद्योग नोकरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा व सर्व महिलांनी अभिमानाने ,स्वाभिमानाने राहुन यशस्वी व्हावे असा प्रयत्न महिलांनी केल्यास त्या प्रगती करू शकता.

सौ. निर्मला कडू चौधरी (गृहलक्ष्मी महिला पतसंस्था चेअरमन) निंभोरा बु॥ ता.रावेर

सिमा काशिनाथ पाटील
सिमा काशिनाथ पाटील

विधवा महिलांसाठीची वागणूक बदलण्याची गरज

नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. भारत हा नव दुर्गेची पुजा करणार्‍या संस्कृतीतील स्त्री शक्तीचा देश आहे. आपल्याकडे विधवा होणं म्हणजे जणू काही अपंगत्व येणं. समाजात अजूनही विधवांना स्वीकारलं जात नाही. विधवा स्त्री म्हणून जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो महिलांना. वैधव्य काय किंवा सवाष्ण काय ही मानसिकता बदलली पाहिजे. असंख्य विधवा स्त्रिया आपल्या समाजात त्रासदायक जीवन जगत आहेत. जोडीदाराचा मृत्यू ही नक्कीच दु:खद घटना आहे. पण तो त्या स्रीचा अपराध असल्यासारखी वागणूक तिला आयुष्यभर मिळते. त्यातुनही काही घरात, सार्वजनिक ठिकाणी, लग्न समारंभात, धार्मिक कार्यक्रमात विधवा स्त्रियांना जाणुन बुजुन सहभागी करत नाहीत. त्यावेळी त्यांच्या भावना खुप दुखवल्या जातात. तिने कसे राहावे, कसे वागावे असे बंधने त्यांच्यावर लादले जातात. नवर्‍याच्या मूत्यु नंतर अनेक अडचणींवर मात करून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून समाजामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या कितीतरी स्त्रीया आहेत. याबाबत जागर होणे गरजेचे. आपलं जीवन आनंदीत जगण्याचा प्रत्येकाला जन्मसिद्ध हक्क आहे.

सिमा काशिनाथ पाटील.शेंदुर्णी, ता.जामनेर

संगिता धनंजय पाटील
संगिता धनंजय पाटील

स्वत:च्या कार्यक्षेत्रात ठसा उमटवावा

आजकालची स्री पूर्वीच्या स्री पेक्षा स्वतंत्र आणि विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात, घरात, गल्लीत, गावात, व्यवसायात एक आदर्श व्यक्तीमत्व जपून स्वतः ची ओळख निर्माण करून आपल्याकडे पाहून इतरांना जगण्याची नवी ऊर्जा मिळेल. आवडता छंद जोपासून आनंदी, उत्साही पणा टिकवावा कारण स्री आनंदी तर सर्वत्र आनंदी आनंद असतो. एक स्री शिक्षिका म्हणून मुलांमुलींचे आरोग्य आणि शिक्षण यावर निश्चितच भर देऊन एक सक्षम महिला, भारताचा सुजाण नागरिक घडविण्यात, शिक्षिकांनी पुढाकार घ्यावा. स्वतःचे कार्यक्षेत्रच आपले व्रत समजून आपल्या कार्याचा ठसा उमटवावा. विज्ञानाच्या अभूतपूर्व अशा प्रगतीमुळे करीअरचे अनेक मार्ग उपलब्ध असले तरी त्यापर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे गरजेचे आहे. यासोबतच सामाजिक बंधनांचीही जाणिव विद्यार्थ्यांमध्ये रूजविणे गरजेचे आहे. एकत्रित शिक्षणपध्दतीमुळे मुले मुली एकाच वर्गात सोबत शिकत असल्याने त्यांच्यात बंधुत्वाची भावनाही रूजवावी. ग्रामिण भागात नसले तरी शहरी भागात शाळा महाविद्यालये आणि विद्यापीठांत रॅगिंगसारखे गैरप्रकार होत आहेत. अशा प्रकारांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठीही आणि असे प्रकार विद्यार्थ्यांनी करू नये याबाबतचा जागरही होणे गरजेचे आहे.

संगिता धनंजय पाटील. मुख्याध्यापिका जि. प. प्राथमिक शाळा, शिरसाड.

संगीता विपिन राणे
संगीता विपिन राणे

महिलांची सक्षमीकरणाकडे वाटचाल गौरवास्पद !

महिलांना राजकारणात 51 टक्के मिळालेले आरक्षण हा स्त्री शक्तीचा गौरवच आहे. कधी काळी राजकीय जीवनात महिला फक्त नावाला कार्यकारी मंडळात असायच्या. कारभार घरातील पुरुष मंडळी चालवत होती. आता मात्र युग बदलले आहे. महिलांना त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मिळालेल्या संधीतून त्यांच्या कार्याचा ठसा उमटवण्याची ताकद आहे. आज महिला केवळ चूल आणि मुल यातून कधीच्या बाहेर पडल्या आहे. अनेक महिला बचत गट,विविध उद्योग व्यवसाय, कुटुंबाला आर्थिक सहाय्य होण्याच्या उद्देशाने काम करत आहे. शहरी भागात महिला नोकरी करत असल्या तर ग्रामीण भागात महिला काही करत नाही, हे चित्र बदलले आहे. महिला अधिकाधिक रोजगार करत आहे. कुटुंबाला पुढे नेण्यासाठी,आर्थिक संपन्न होण्यासाठी त्यांची धडपड अतुलनीय आहे. त्यामुळे आता स्त्री सक्षमीकरण यानंतर महिलांना आत्मनिर्भर होण्याची हीच वेळ आहे. महिला त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारने देखील त्यांच्या मेहनतीला जोड देणे गरजेचे आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे नेटवर्क बनले आहे.घेतलेल्या कर्जातून व्यवसाय आणि रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे स्त्री शक्ती आता जोमाने काम करत आहे.

संगीता विपिन राणे,माजी उपसरपंच विवरे बुद्रुक ता.रावेर

भाग्यश्री गोपाल पाटील
भाग्यश्री गोपाल पाटील

स्त्रियांनीही सकारात्मक ऊर्जेसह बदलावे

बदलत्या काळानुसार स्त्रियांनी आपल्या विचारधारेत व दिनक्रमात बदल करणे आवश्यक आहे. त्यासोबतच बदलत्या काळानुसार कवी केशवसुतांनी सांगितल्याप्रमाणे ‘जूने जाऊ दया मरना लागुनी, जाळून अथवा पुरुणी टाका सावध ऐका पुढल्या हाका’ या प्रमाणे रूढ़ी परंपरेतील जे उत्तम आहे त्याचा अंगीकार करुन भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी नविन ज्ञान विज्ञान, तंत्रज्ञानाचा शोध आणि बोध स्रीया आणि मुलींनी घ्यावा. विज्ञान हा फक्त शालेय विषय न समजता वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या मुलांमध्ये निर्माण करावा व भविष्यातील पिढी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली घडेल यासाठी प्रयत्न करावा. यामुळे पुराणातील अंधश्रध्दांना मुठमाती मिळेल. समाजत असलेेली बुवाबाजी आणि ढोंगी व जादूने अमूक करतो असल्या प्रवृत्ती आपोआपच नष्ठ होतील. कारण अशा प्रवृत्तींना वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे थारा देणार नाही. त्यामुळे आपोआपच अशी प्रवृत्ती जोपासणारे ढोंगीपणा आणि फसवणूक करण्याचे सोडून कष्टाचा मार्ग स्विकारतील. हो मात्र एक खबरदारी येथे घेणे गरजेचे आहे. वैज्ञाननिष्ठ होत असतांना त्याच्या आहारी जाता काम नये. अन्यथा बुवाबाजीतून सुटलो आणि विज्ञानाने मारले असे होऊ नये. विज्ञानाचा गैरवापर होता कामा नये.

भाग्यश्री गोपाल पाटील, गोराडखेडा, ता. पाचोरा

ज्योती कैलास पाटील
ज्योती कैलास पाटील

शैक्षणिक योगदानात स्त्री शक्तीचा जागर

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारीया उक्तीप्रमाणे समस्त जगाच्या कल्याणाचे सारथ्य असलेल्या महिलांचे शिक्षण आणि शैक्षणिक समस्यांकडे व्यवस्थेने लक्ष पुरवायला हवे. तळागाळापर्यंत विशेषतः समाजाच्या गरिबीत निपचित पडलेल्या मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवण्याची आज प्रकर्षाने गरज आहे. शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धेसोबत काम करायलाही खूप वाव आहे. अशातच सर्व समावेशक महिलांचे योगदान मिळणे अपेक्षित आहे. महिलांच्या उच्च शिक्षणाकडेही समाजाने लक्ष पुरवायला पाहिजे. कारण उच्चशिक्षण घेणार्‍या महिलांचा टक्का हा पुरुषांच्या निम्माच आहे उच्चशिक्षित असूनही महिलेला खरंच पुरुषांच्या बरोबरीने तसाच यथार्थ सन्मान मिळतो का हाही प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे. शिकलेल्या महिलांनी समाजाच्या सर्वांगीण स्वास्थ्याकडे लक्ष पुरवून एकंदरीत समाजाचे स्वास्थ्य योग्य राखायला मदत होईल. शिक्षणात स्त्रियांचे योगदान योग्य प्रमाणात राहिल्यास समाजाचे स्वास्थ्य रहायला खूप चांगली मदत होईल असे या निमित्ताने वाटते.

ज्योती कैलास पाटील संचालिका पॅसिफिक कोचिंग जळगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com