Friday, April 26, 2024
Homeजळगावनवरात्रोत्सव विशेष : विधवांच्या समस्यावर जागर व्हावा

नवरात्रोत्सव विशेष : विधवांच्या समस्यावर जागर व्हावा

जळगाव : jalgaon

गेल्या अनेक वर्षापासून समाजात (society) विधवा, परितक्त्या (Widows) महिलांचा प्रश्न (question of women) एैरणीवर आलेला आहे. काक स्पर्श चित्रपटातून या प्रश्नांना वाचा फोडण्यासह जागृती निर्माण (Creating awareness) करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. काक स्पर्श चित्रपटाच्या नायिकेबाबत सर्वांनाच सहानुभूती वाटत असली तरी मात्र प्रत्यक्षात तशी कृती होतांना दिसत नसले तरी अपवादही आहेत. विधवा किंवा परीतक्त्या यांचे पुर्नविवाह (remarriage) होतांना दिसत असले तरी ते प्रमाण कमी आहे. यासह महिलांनीच प्रथमत: महिलांना सन्मान (Women first honor women) द्यावा आणि नंतरच समाजाकडून अपेक्षा (Expectations from society) करावी असाही मतप्रवाह (opinion stream) आजच्या नवरात्रोत्सवाच्या (Navratri special) विशेष भागात घेतलेल्या महिलांच्या प्रतिक्रीयातून (reaction of women) दिसून आला.

- Advertisement -

शक्तीने शक्तीचा सन्मान करावा

स्त्रीशक्ती हेच ते विशेषण. हे विशेषण कधी पुरुष या शब्दापुढे कुणी लावलाय? नाही. का ? तर यामागच कारण असे की स्त्री ही शक्तीच रूप आहे म्हणजेच महादेवी, पार्वती, आदिमाया, लक्ष्मी इ. असे कितीतरी नावं आहेत आपली. मलाही गर्व आहे स्त्री असल्याचा. हा सन्मान,अभिमान देव काळापासून मिळालाय स्त्रीला. एकाच घरात 2 स्त्रिया सुखाने का नाही नांदू शकत ? मग ते सासू सून असो की जावा जावा. स्त्री ने स्त्री चा आदर, शक्ती ने शक्ती चा आदर, नारी ने नारी चा हाच सन्मान आणि आदर कायम ठेवावा हीच मनापासून इच्छा आहे. स्त्रीयांचा पुरूषांनी सन्मान करण्याची अपेक्षा ठेवत असतांना हीच अपेक्षा खुद्द स्त्री कडून का नाही? खरे तर सगळ्यात पहिले स्त्री ने स्त्रीत्वाचा आदर करायला हवा. आई आणि मुलीचे नाते तर आहेच मुळात गोडाईचे. पण जेव्हा सासू आई रुपात आणि सून मुली रुपात एकमेकांना स्वीकारतील तेव्हा ते नात सर्वात सुंदर आणि आदर्श बनेल यात शंकाच नाही.

रुचिता पाटील.

स्वावलंबनावर भर द्यावा

नवरात्रोत्सवानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर सर्वत्र सुरु होतो. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात देखील महिला अग्रस्थानी राहिल्या आहेत. स्त्रियांनी संरक्षण क्षेत्र, अंतराळवीर इत्यादी क्षेत्रात पण आपले स्थान निर्मा केले आहे. आजूबाजूच्या गरजू स्त्रियांना देखील हातभार लावून त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा. आत्मविश्वास कमी असणार्‍या महिलांमध्येे आत्मविश्वास निर्माण करून जीवन जगण्यास प्रवृत्त करावे. घरगुती उद्योग करण्यावर भर देत स्वावलंबी व्हावे. नोकरी करत असताना घरातील जबाबदार्‍या पण सांभाळण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करून सर्व जबाबदार्‍या या चांगल्या पद्धतीने सांभाळल्या जाऊ शकतात. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशामध्ये सर्वोच्च राष्ट्रपती पदी तसेच महत्त्वाच्या स्थानांवर सुद्धा महिला आहेत. म्हणून कुठलेही क्षेत्र हे अवघड नसते फक्त आपण जिद्दीने त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करणे आवश्यक असते.

दीपाली विजय पाटील, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, माध्यमिक विभाग,जि.प. जळगाव

स्त्रियांच्या आदराचे भान सर्वांनाच असावे !

प्रत्येक स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. मग ती गृहिणी असो, नोकरी करणारी असो, धुणे भांडी करणारी असो, कॉलेजमध्ये जाणारी मुलगी असो, चित्रपट कलाकार असो, बार डान्सर असो किंवा इतर कुठलाही व्यवसाय करणारी असो तिला स्वतःचे जीवन सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे . एका स्त्रीला आधी दुसर्‍या स्त्रीला समजून घेण्याची गरज आहे तरच समाज तीला समजून घेईल.पण शोकांतिका ही आहे की आज स्वतःला आधुनिक म्हणवून घेणारी स्त्री दुसर्‍या स्त्रीला सन्मान द्यायला कमी पडते. स्वतःच्या कर्तुत्वाचा अभिमान बाळगत असताना इतर स्त्रिया कशा माझ्यापेक्षा कमी आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न का करावा ? एखाद्या स्त्रीला प्रगतीची संधी मिळत असेल आणि ती या पुरुषप्रधान व्यवस्थेला जुमानत नसेल तर तिला आधार व विश्वास द्यायचा सोडून ती अशी ती तशी असे तिचे खच्चीकरण करणे कितपत योग्य आहे? खरं तर पुरुषी मानसिकतेतून तीला पाहणे योग्य नाही. तीला एका विशिष्ट साच्यात न बसवता एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तीचा व तीच्या मतांचा आदर करणं एव्हढच अभिप्रेत आहे. निदान आपल्या भोवतालच्या स्त्रियांचा अनादर होणार नाही याची काळजी घेतली तरी खरा स्त्रीवाद आपण रुजवू शकतो.

प्रा.डॉ. गीता पाटील, वरिष्ठ कॉलेज ,बोदवड

स्री आदिमायेचं रूप तर वृध्दाश्रम का वाढताहेत?

आजच्या स्री मध्ये सर्व देवीचे रूप आहेत ,प्रसंगी ती कोणतही रूप धारण करू शकते मग सर्वांना सामावून घेणारी आमची आदिमाया जी चांगल्या वाईट भक्तांना सांभाळून घेत असते तशी आजची स्री का वागत नाही?आपले आई वडील म्हणजे खूप चांगले आणि सासू सासरे कोण?त्यांना सांभाळण्याची जबाबदारी कोणाची?नोकरी करतांना मुलांना पाळणा घरात ठेवलेलं चालेल पण सासू सासर्‍यांजवळ नको,किती खराब मानसिकता होत चालली आहे!वाईट वाटत आजूबाजूला जेव्हा लोक कुत्री घेवून फिरतात ,त्याच्या साठी स्पेशल रूम असते स्पेशल जेवण असत आणि आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात,म्हणून खर तर म्हातारं पण सुखात जाण्यासाठी चांगल्या मुलापेक्षा चांगल्या सुनेची जास्त गरज असते,नाही पटत विचार , पण चुकांकडे दुर्लक्ष करून चालायचं असत आणि ही शिकवण खर तर आईनेच द्यावी प्रत्येक मुलीला,कारण नवरा काय आकाशातून पडत नसतो त्याला ही तितक्याच प्रेमाने सासू सासर्‍यांनी वाढवलेलं असतं मग हा विचार कधी व्हावा की आपण जे वागतोय ते आपली मुलं पण बघताय, वृद्धाश्रमाची संख्या कमी करा,पाळणा घराची संख्या आपोआप कमी होईल आणि तोच खर्‍या अर्थाने देवीचा, आदिमाये चा सन्मान असेल.

सौ.क्षमा दत्तात्रय साळी, उपशिक्षिका, जि.प.शाळा, खडकेसिम. ता. एरंडोल

शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ समजून घेऊन आपल्या कुटुंबासह गावातील परिसरातील महिलांना लक्षात आणून लाभ मिळवून द्यावा. त्याचबरोबर पुरुषाप्रमाणे सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक ,सहकार, धार्मिक या क्षेत्रातील कार्यात सहभागी होऊन महिलांनी कार्य केले पाहिजे व शासनाच्या योजनेची माहिती तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यासह महिला सामाजिक संघटना व सर्व वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून वाचन करून समजून घेऊन कार्य करावे जेणेकरून महिलांना लाभ घेता येऊन त्यांचा विकास होण्यास मदत होईल हीच सर्व महिलांकडून आशा आहेत. तसेच आपल्या परिवारातील मुलींना उच्च शिक्षण देण्यात अग्रक्रम देऊन मुलीची शैक्षणिक प्रगती साधावी. मुलीचे पुढील भविष्य उज्वल होण्यासाठी प्रयत्न करावा.ग्रामिण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याची माहिती ग्रामपंचायत, पंचायत समिती येथे उपलब्ध असते. त्याची माहिती घेतली तर मुलींच्या शिक्षणासाठीचा आर्थिक भार कमी होईल. मुलींनी अभ्यास करून मेरीट मिळविले तर उच्च शिक्षणासाठी त्यांचा शासकीय कॉलेजमध्ये नंबर लागु शकतो.

सौ. ज्योती प्रल्हाद बोंडे (माजी.पं स. सभापती) निंभोरा बु॥ ता रावेर

स्त्रीशक्तीचा सन्मान करायला विसरू नका

नवरात्र आली की उत्साहाची लाट जनमानसात चैतन्याच अमृत जल घेऊन येताना, चांदणं रातीच्या गर्भात तेजाचे बीज रूजवत दसर्‍याची सोनसळी पहाट घेऊन येते. आता होम हवन, आरत्या, रास गरबा, व्रत वैखल्य, नैवेद्याचा व प्रसादाचा घमघमाट, अगरबत्तीचा सुगंध, फुलांची आरास यांनी नऊ दिवस नऊ रंगात रंगून जातील. तितकाच रोजच्या धावपळीतून कोरड्या झालेल्या मनाला थोडासा तजेला मिळेल.

नऊ दिवस आदिशक्तीची उपासना करा. हे करत असताना तुमच्या कुटुंबातील, परिसरातील महिला वर्गाचाही तितकाच आदर करा. एकवेळ स्वर्गातल्या देवीला नमस्कार करायला विसलात तरी चालेल परंतु, पृथ्वीवरील स्त्रीशक्तीचा सन्मान करायला मात्र विसरू नका. कारण स्वर्गातली देवी तुम्हाला आत्मीक बळ देत असली तरी पृथ्वीवरील स्त्रीरूपी देवी त्या आत्मीक बळाला चैतन्य देण्याचे काम करत असते. स्त्री जर चार दिवस माहेरी गेली तर पुरूषमंडळींचे जेवणापासून तर घरातील स्वच्छतेसह घराकडे लक्ष देण्याबाबत कितीतरी प्रश्न उपस्थित होतात. मात्र हीच स्त्री घरात असली की घराला घरपण आणि चैतन्याचा खळखळाट राहत असतो. म्हणूनच जमिनीवरील स्त्री रूपी देवीचा सन्मान करण्याबाबत जागर व्हावा.

सौ.स्वप्ना विक्रांत पाटील. सदस्या- अमळनेर महिला मंच, अमळनेर

स्त्री शक्तीने स्वावलंबी होण्याचा जागर

नवरात्र म्हणजे स्री शक्तीची ऊपासना,नवरात्र म्हणजे स्री मध्ये असलेल्या अद्भुत अशा शक्तीचा जागर. स्रीयांचा जागर व्हायचा असेल तर स्री शक्तीचा जागर,ही संकल्पना समजुन घेतली पाहिजे. आपल्या देशातील अनेक समाज-सुधारकांना स्री शक्तीचा जागर समजला आणि त्यासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली. त्यांच्या मार्गाने जाण्याचे धाडस काही मोजकीच मंडळी करीत आहे. आजही आपल्या प्रगत समाजातील बहुतांश लोकं पारंपारिक विचारसरणीला प्राधान्य देणारी आहेत. बहुतांश स्रीयांना स्री शक्तीचा जागर कळलेला आहे का, ही तपासण्याची गोष्ट आहे, कारण त्यांची वर्तवणूक दुहेरी असते.आज स्रीया ह्या अबला राहिलेल्या नाहीत, त्या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत,असे म्हटले जाते. खरच तसे आहे का ? स्री शक्तीचा जागर करायचा असेल तर तीचे मनोबल, आत्मबल वाढवले पाहीजे. तिला स्वत:बद्दल च्या कायद्यांची अधिकारांची जाणीव करुन दिली पाहीजे, तिला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन, तिचा सर्वांगीण विकास होऊन ती कुणाच्याही आधाराच्या कुबड्या न घेता, खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. यासोबतच तीला समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले तरच स्री शक्तीचा जागर होईल.

तेजश्री विसपुते रांजणी ता जामनेर

विधवांच्या समस्यावर जागर व्हावा

विधवांच्या समस्या हा एक दुर्लक्षित विषय कितीतरी पिढ्या चालत आलेला आहे. पण 2022 ला हा कायदा महाराष्ट्रात येऊ घातला आहे हे निश्चितच मनाला दिलासा देणारे आहे. आताच्या काळात पुर्वी प्रमाणे केशवपन किंवा विधवा अंधारात, वेगळ्या खोलीत आयुष्य घालवत नसल्या तरी त्या कश्या जगतात, त्यांना सरळ जीवनात येणार्‍या अडचणी, अनिष्ठ रुढी परंपराचा कसा सामना करावा लागतो, कुटुंबासाठी, समाजात कश्या प्रकारे तोंड देतात ह्याचा विचार सर्व समाजसामोर येणे आवश्यक आहे व त्यांचेवर होत असलेल्या कुचंबणा, अवहेलना जगासमोर आणण्यासाठी या कायद्याची खूप मदत होणार आहे. आधीच भावनिक दृष्ट्या झालेला आघात अतिशय दुःखदायक असतो या प्रसंगात तीच्यावर मंगळसूत्र तोडणे, कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे जोडवी काढून घेणे हे करीत असताना त्या विधवा महिलेचे आंक्रदन हे आजही घडत आहे. आता या कायद्यामुळे निश्चितच भरपूर बदल होईल. बर्‍याच वेळा महिलाच महिलांना दुःख देतात, पण आता तसे होणार नाही. विधवा सुध्दा सन्मानाने समाजात वावरतील. हळदीकुंकू, इतर शुभ प्रसंगात किंवा पुजेसाठी विधवांना मागे ठेवले जाते. पण यापुढे चित्र नक्की बदलेल.

सौ. आरती सारंग चौधरी समुपदेशक, भुसावळ

स्त्रियांमध्ये आत्मविश्वासाचा जागर

नवरात्री चे नऊ दिवस हे , चांगल्याचा वाईटावर विजय म्हणुन आपण साजरा करत असतो. नवरात्रीत, आई दुर्गा ने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे. स्त्री ही आजकाल कोणत्याच क्षेत्रात मागे नाही ती वेळे नुसार या कलीयुगात कोणतेही रूप धारण करू शकते. फक्त गोष्ट असते ती आपल्यातील आत्मविष्वास जागवण्याची. जे स्त्रीयांचा अपमान करतात, त्यांना कमी लेखतात त्यांना हे समजवण्याची गरज आहे, की ज्या देवीची तें पूजा करतात त्या सुद्धा एक स्त्री आहेत. हे ही नसेल समजत तरं देवळातली देवी सुद्धा प्रसंन्न होणार नाही. कारण देवळातल्या देवीचेच एक रूप स्त्री आहे. ज्या घरात स्त्री आनंदाने राहत असते त्या घरात लक्ष्मी, सरस्वतीचा निवास असतो. ते घर आणि त्यातील सदस्य हे आनंदी आणि आरोग्यमयी असतात. जीथे स्त्रीयांना आदराने वागविले जात नाही तेथे विविध समस्या आढळून येतात. कारण स्त्री आणि पुरूष ही एका रथाची चाके आहेत. म्हणून दोन्ही चाके जेथे समानतेने चालतील तेथे प्रगती होते. मी ह्या नवरात्रीत हीच मनोकामना करते की आई दुर्गा सर्वांना सद्धबुध्दी देवो. ’यत्र यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवता । यत्रतास्तु न पुज्यन्ते सर्वास्तित्राफलाः क्रिया।

पूजा हेमलता प्रताप पाटील, वरणगाव

सासर-माहेर प्रकाशित करणार्‍या पणतीचा सन्मान करावा

स्त्री हे संयम, शांतता, वात्सल्य, नम्रतेच प्रतिक आहे. आज विविध क्षेत्रात महिला प्रभावीपणे काम करत आहे.एक मुलगी जेव्हा माहेराहून सासरी येते, त्यावेळी तिच्यासाठी सासर हे स्वर्गच असतो. त्या घराला घरपण देण्यासाठी तिचे प्रयत्न असतात.सासरी असतांना तिला माहेरची देखील सतत चिंता असते. जितकी काळजी सासरी असते, तेवढी आस्था माहेराबाबत पण असते. नात्यांची गुंफण करून त्यांना जिवंत ठेवण्याचे काम स्त्री करत असते. आज अनेक महिला नोकरी करून घराची जबाबदारी सक्षमपणे उचलत आहे. त्याच बरोबर नोकरी न करणार्‍या देखील परिवाराला समर्पित कार्यमग्न असतात. मुलांवर संस्कार व त्यांची जडणघडण करण्यात तिचा मोठा वाटा असतो. समाजाच्या उत्थानात महिलांचे मोठे योगदान राहिले आहे. मात्र काही ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार मनाला सुन्न करतात. समाजात जे घडते, त्याचे खोलवर परिणाम होतात. यासाठी सासर व माहेर प्रकाशित करणार्‍या पणतीचा सन्मान करावा. याबाबत आजच्या आधुनिक युगात जागर करण्याची गरज येते आहे ही मोठी शोकांतिका आहे. असे असले तरी देर आए दुरूस्त आए यानुसार नव्या पिढीत हा जागर करणे गरजेचे आहे.

सौ कल्याणी वैभव पाटील, तांदलवाडी ता.रावेर

स्त्रियांना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले आहे का ?

जुना काळ व आजचा काळ यांच्यामध्ये तुलना केली तर खूप फरक आहे. आज स्त्रियांनी खूप प्रगती केली शिक्षणाच्याच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आज त्या पुढे आहेत. आज त्यांना त्यांचा हक्क मिळतो. आज त्यांना त्यांच्या इच्छा माराव्या लागत नाही. त्यांना हवं ते त्या मिळवू शकतात. त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवितात. हे आजच्या जगाचे सत्य आहे.परंतु ही सत्याची एकच बाजू आहे. सत्याची दुसरी बाजू एक तर कोणाला दिसत नाही किंवा दिसून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. सत्याची दुसरी बाजू म्हणजे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले आहे, पण पूर्णपणे नाही. आपण आपल्या देशाच्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात पहिले तर स्त्रियांना तो सन्मान,तो हक्क आजही मिळत नाही. देशातील काही भाग आजही असे आहेत जेथे स्त्रियांचे शिक्षण पूर्ण होत नाही व कमी वयात लग्न होते. त्यांना अन्याय सहन करावा लागतो. त्यांना घरेलू हिंसाचाराला सामोरे जावे लागते. आज आपण म्हणतो की स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालेले आहे पण ते अपूर्ण आहे आणि ते पूर्ण तेव्हाच होईल जेव्हा देशाचा प्रत्येक नागरिक यावर मनापासून विचार करेल व या कामाची स्वतःपासून सुरुवात करेल. देशाचा नागरिक म्हणून हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

सौ.चंचला काशिनाथ पाटील. न्हावी, ता. यावल.

जगाची निर्माती अद्यापही वंचिंतच

प्रथमतः दै. देशदूत परिवाराचे हार्दिक अभिनंदन! स्त्रीयांच्या भावनांना विचारांना वाट करून देणारे व्यासपीठ स्त्रियांसाठी उपलब्ध करून दिले धन्यवाद! या जगात या सजीवसृष्टीत आजही सर्वात महत्वाचे पात्र आहे ते स्त्रीचे. तिला जगाची निर्माती पालन करणारी असेच म्हणतात. ती लेकराची माय, कुणाची अर्धांगिनी, कुणाची बहीण, असते. अगदी बाळाच्या जन्मापासून तर त्याला कणखर नागरिक बनवण्यापर्यंत तिची भूमिका निर्मात्याचीच असते. घराला घरपण तीच देते प्रचंड सहनशीलता, सृजनशीलता, मृदुपणा, कठोरता, आणि त्यागाची मूर्ती या सर्व गुणांनी युक्त असलेली भारतीय समाजातील स्त्री मात्र आजही उपेक्षितच दिसते. समाजातील स्त्री मात्र आजही उपेक्षितच दिसते. सामाजिक बंधनांमुळे ती आपल्या बर्‍याच आशाआकांक्षावर पाणी सोडते. पात्रता, असताना देखिल ती पुरुष प्रधान संस्कृतीपुढे नतमस्तक होताना दिसते, हे असे का? तीने कुठपर्यंत भावना माराव्या.?काळासोबत सर्वांना बदलावे लागतेच पण हे एका स्त्रीच्या बाबतीत का नाही? संसार रथातील या दुसर्‍या चाकाला समाज कमजोर का समजतो? दुसर्‍या चाकाशिवाय संसार रथ चालेल का? हा समाजाने विचार करावा.

सौ.शितल राहुल चोरडिया, गृहिणी तळेगाव ता.जामनेर

स्त्री जन्मा तुझी कहाणी

स्त्रीची अनेक रूपे आहेत. आई, मुलगी, बहीण, पत्नी, मावशी, काकी, आत्या, आजी, मैत्रीण या नवशक्ती (नवरात्र) रुपात संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेली स्त्री सर्वच पवित्र नात्यांना कुटुंबाला मित्र परिवाराला एक माळेत गुंफून ठेवणारी शक्ती म्हणजे स्त्री. स्त्री म्हणजे ईश्वर व आत्मा यांचे मिलन. स्त्री म्हणजे विश्वनिर्मितीचे मुख्य स्त्रोत. स्त्री शिवाय आपण समाजाची कल्पना देखील करू शकत नाही. स्त्रीया मध्ये सहनशीलता,धैर्य,प्रेम,ममता आणि सोबतच मधुर वाणी हे स्त्रीयांचे मुख्य गुण आहेत. स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण तिचे आयुष्य असते. तूडवली तर नागिन असते, डिवचली तर वाघिण असते. म्हणून एका स्त्रीला एवढे पण कमजोर समजू नका. कमजोर औरत को नही समजना साथ दिया तो भिकारी को भि राजा बना देगी.

अगर बगावत पर उतर आयी तो महलो को भी राख बना देगी…!!

दूर्गा, सरस्वती, लक्ष्मी, कालिका अशे अनेक रुप एका स्त्री मध्ये आहे तर गरज पडली तर एक स्त्री कुठलेही रुप धारण करू शकते. म्हणून स्त्री चा आदर करा तिला मानसन्मान द्या. उपवास करून अनवाणी फिरून देवी प्रसन्न होत नाही तर ती स्त्री शक्तीचा आदर सन्मान केल्याने होते. अशा या स्त्री शक्ती ला त्रिवार वंदन.

सौ. सुचित्राताई पाटील, अध्यक्ष- हिरकणी महिला मंडळ. चाळीसगाव

महिलांचे योगदान महत्त्वाचे

आजच्या युगात पुरुषां बरोबर महिलांनी ही प्रत्येक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. आज महिला भगिनी शासकीय सेवेत, लष्करी दलात, पोलीस प्रशासनासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर जबाबदार्‍या पार पाडत आहेत. महिला भगिनींनी कुटुंब सांभाळुन या महत्त्वाच्या पदावर सेवेत सामाजिक ,राजकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावून देशात राज्यात मोठे योगदान आहे. घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदार्‍या त्या योग्य रितीने पार पाडत आहेत. यात त्यांना उडचणी येत असल्या तरी त्यावर उपाय शोधून त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न त्या करत असतात. घर आणि नोकरी या दोन्ही ठिकाणी त्यांचा कामाचा उत्साह चांगला असतो. घरातली सर्व कामे आवरून ती तेवढ्याच उत्साहाने नोकरीच्या ठिकाणीची कामे करत असते. नोकरी करून ती जेव्हा घरी परत येते तेव्हा खुप थकली आहे असे न म्हणतात ती पटकन पदर खोचून कामे करून परिवारातील सदस्यांच्या आवडीनिवडी जोपसत असते. याच्या उलट पुरूषांचे असते. त्यामुळे महिला भगिनींचा सन्मान हा आवश्यक आहे. सन्मान म्हणजे त्यांना हारतुरे देणे नव्हे. तर त्यांना त्याच्या घरात आणि समाजात आदराची, समानतेची वागणूक देत सुरक्षितता प्रदान करणे होय.

सुचिता चव्हाण. तहसीलदार एरंडोल.

- Advertisment -

ताज्या बातम्या