नवरात्रौत्सव विशेष : बंधनातुन संरक्षण अन् सोशल मीडियाचा वापर जपून

नवरात्रौत्सव विशेष : बंधनातुन संरक्षण अन् सोशल मीडियाचा वापर जपून

जळगाव : jalgaon

अस म्हटले जाते की पुर्वीच्या काळात महिलांवर रुढी पंरपरेनुसार खुप सारी बंधने होती. त्यामुळे त्या काळात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी होते. मात्र जसा काळ बदलत गेला तशी ही बंधणे कमी होत गेली. आज महिलांना अपवाद वगळता अनेक बंधनातून मुक्तता मिळाली आहे. जुन्या रुढी पंरपरांच्या जोखाडातून महिला मुक्त झाल्या आहेत. त्या समाजधुरींधरांनी केलेल्या प्रयत्नांतून. पण बंधने किंवा रूढीतून मुक्तता म्हजणे स्वैराचार नव्हे. त्यातही महिलांचे एक प्रकारची सुरक्षितता होती. त्यामुळे काही बंधने अर्थात मर्यांदा या स्त्री आणि पुरूषांना आजही लागू आहेत. आणि त्या हव्याच. असा एक मतप्रवाह तर दुसरीकडे सोशल मीडियाचा वाढता वापराबाबतही सजगता आणि जागृक असणे कसे गरजेचे आहे हे आजच्या महिलांच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट होत आहे.

प्रत्येक स्त्री शक्तीस्वरुपच...

जीवनातल्या सुप्त दैवी शक्ती असलेल्या, वास्तव रूपातल्या विविध नात्यातून रोजच भेटणार्‍या स्त्री या शक्ती स्वरूपच आहेत. पौगंडावस्था: मुलींनी देवी शैलपुत्रीच्या रूपाप्रमाणे अन्यायाविरूध्द लढा देणे. युवा अवस्थेतील मुलींनी ब्रह्मचारिणीकडून हिंमत व प्रेरणा घ्यावी. स्वता:च्या पायावर उभे रहावे. शिक्षण,करियर याकडे लक्ष द्यावे. मोबाईल, इंटरनेट व इतर व्यसनापासून दूर रहावे. स्वाभिमान हे गुणधर्म स्त्रीमध्ये आहेतच. कुणत्याही स्त्रीमधे स्वाभिमान असावा अहंकार नसावा. विविध गटातील तरुणी कात्यायनी आपल्याला सजग व्हायला शिकवते. प्रत्येक गोष्ट पारखून घ्यायला शिकवते. चंद्रघंटे सारखी वीरता अंगी बाणवावी. प्रजननशील गट स्त्रीला आदिशक्ती म्हणतात. स्वतःचे आरोग्य चांगले ठेवणे. प्रौढ अवस्थेतील स्त्री महागौरीसारखी शांत वाटते. आयुष्यातील चढउतारामुळे प्रकल्भता आलेली असते .या गुणाचा उपयोग मार्गदर्शन म्हणून करावा. देवीचे एक विशेष रूप होममेकर स्त्रियांसाठी ते म्हणजे देवी सिद्धी दात्री ही स्त्री स्वतःकडे दुर्लक्ष करून कुटुंब समाजाला फक्त देतच असते. स्रीने स्त्री ला पाठिंबा दिला तर प्रत्येक स्त्री कतृत्वान होऊ शकेल. हाच खरा स्त्री शक्तीचा जागर होईल.

सौ.आरती राजेश धर्माधिकारी

अनादी काळापासून स्त्री सशक्तच

स्त्री शक्ती हा शब्द सध्या खूप कानावर येतो. खरं तर अनादि काळापासून स्त्री सशक्त आहेच. भक्ती आणि शक्ती चा सुंदर संगम तिच्यामध्ये दिसतो. मध्यंतरीच्या काळात भारतीय संस्कृतीवर झालेल्या अनेक आक्रमणांमुळे या संस्कृतीच्या मूळ गाभ्याला अनेक धक्के बसले. त्यामुळेच आज अशी परिस्थिती आहे की एकीकडे, संस्कृती चा चुकीचा अर्थ घेऊन स्त्रीयांवर अक्षम्य अन्याय होत आहेत. दुसरीकडे स्त्रीशक्तीचा अर्थ चुकीचा घेतल्यामुळे समाजाची घडी विस्कटते आहे. स्त्री शक्तीचा जागर हा पुरुषांच्या विरोधात नाही. आपापल्या नैसर्गिक गुणांचा आणि क्षमतांचा वापर करून एकमेकांना अनुरुप ठरणे आणि एकमेकांचा आदर करणे यातूनच एका निरोगी समाजाची निर्मिती होईल. स्त्रीचा आदर करण्याचं शिक्षण पुरुषांना तर द्यायलाच हवं त्याबरोबर एका स्त्री ने सुद्धा दुसर्‍या स्त्री चा आदर करायला हवा. ज्यातून, स्त्री हीच स्त्रीची शत्रू, हे विधान खोटं ठरेल. नवरात्री च्या पर्वात स्वतःच्या सामर्थ्याची, तेजाची जाणीव करुन घेऊ या आणि स्त्रीशक्ती चा हा जागर अखंड ठेवुया. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

डॉ. संगिता म्हसकर.

नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा जागर

नवरात्रोत्सव म्हणजे आदीशक्तीचा जागर करून वाईट प्रवृत्तीचा महिषासुराचा नाश करण्यासाठी अठरा भुजी रूप धारण केलेल्या आदीमाया महिषासुर मर्दिनीला सर्व मंगल मांगल्ये म्हणून पूजाविधी, पावित्र्य व आनंदी आनंद प्रसन्न वातावरणात कुलाचार पाळून देविमातेचा उत्सव साजरा केला जातो. त्याच परंपरेने स्त्रीचा आदर केला जातो. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे स्त्रियांसाठी खुली केली. तर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी कायद्याने महिलांना विविध क्षेत्रात आपली जबाबदारी स्वीकारून नेतृत्व करत गावगाडा हाकण्यात संधी उपलब्ध करून दिली. यात नवरात्रीच्या नऊ दिवस स्त्रीचा जागर करीत सगळ्यांचे कल्याण कर व सुख,शांती, समृद्धी व पशुपालकांचा जिवाभावाच्या पशुधनावर आलेल्या लंपीचा कायमचा नाश करून पशुधनासह पशुपालक, शेतकरी राजाला सुगीचे दिवस मिळू दे म्हणून प्रार्थना करते. यासोबत महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत जागृक होण्याची गरज आहे. आपल्या माताभगिनींवर जर कोणी अत्याचार केला तर तो जसा सहन होत नाही तसाच अत्याचार आपण इतरांवर करता कामा नये. तरच महिला सुरक्षित राहतील. याबाबतही जागर होणे गरजेचे आहे. तरच स्त्री शक्तीचा खर्‍या अर्थाने जागर केल्यासारखे होईल.

आशाबाई वसंतराव पाटील, अध्यक्ष-अंबिका माता महिला बचतगट ,पाडळसरे ता अमळनेर

प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे

सर्व महिलांनी व युवतीने आयुष्य टिकवण्यासाठी व आरोग्य टिकवण्यासाठी वेळोवेळी आरोग्याची काळजी घ्यावी. प्रत्येक महिलांनी व युवतींनी आपल्या परीवारातील सदस्यांपासून व डॉक्टरांपासून तसेच आरोग्य केंद्राच्या आशा वर्कर यांच्याकडे माहिती न लपवता बिनधास्त आजारासंदर्भात माहिती द्यावी. जेणेेकरून निदान होऊन आपल्या प्रकृतीची काळजी घेता येईल. कामात व्यस्त असताना सुद्धा दररोज सकाळी व्यायाम करावा, चालावे व योगा प्राणायाम करावा जेणेकरून आपले प्रकृती चांगली राहील. यासाठी लक्ष घालावे. तसेच मानसिक संतुलन टिकून राहण्यासाठी वेळेवर काम, वेळेवर जेवण व घरातील समस्यांसोबत सुसंवाद करावा, वाचन, अभ्यास करणे, आवडीचा छंद जोपासने शक्यतो मोबाईलचा अतिवापर टाळणे. जेणेकरून आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. याची काळजी घ्यावी युवतींनी अभ्यास करून शैक्षणिक प्रगती साधावी. त्याचबरोबर युवतीनी निर्भीडपणे राहून कोठे अन्याय अत्याचार होत असेल तिथे सक्षमपणे संघटन करून सामना करावा. त्याचबरोबर परिवारातील व परिसरातील पुरुषांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येक महिलांनी विशेष उपक्रम राबवावा हीच अपेक्षा.

सौ सुनंदा मधुकर बिर्‍हाडे (ग्रा पं सदस्या) निंभोरा बु॥तालुका रावेर.

लेकींनों, सक्षम बना सुरक्षित राहा..

दु:ख जाणिवे पलिकडले ,होतो लिलाव आहे, तेजीत या फुलांचा,आक्रोश नित्य येथे निष्पाप पाकळ्यांचा !

आमच्या वेळी जेवढी महिला सुरक्षित होती ती आज नाही. आमचे वेळेस फोन, मोबाईल कुठलंही साधन नव्हतं. मुलीला यायला उशीर झाला तरी घरच्यांनी कधीही चिंता केली नाही.पण आज मुलगी लहान असो की तरुण आई वडील घाबरलेले आहेत. मुलगी सुरक्षित घरी येईल कां या चिंतेने. याला कारण नको तेवढं स्वातंत्र्य आणि नको तेवढे लाड. पैसा..हो पैसाच...पुर्वी लोक श्रीमंत नव्हते कां? पण खर्च किती, कसा आणि कशासाठी यावर बंधने होती. बंधन हा संस्कार आहे, अहो आम्हीं शेजार्‍यांचाही धाक बाळगायचो. पण सतत महिलांवरील अन्यायाने तिला बरोबरीचे स्थान न मिळाल्याने साहजिकच एक बंडखोरी उफाळून येणारच आणि आज चित्रे जरी बदललेली असलीत तरी परिस्थिती मात्र तिच आहे. सापत्न वागणूकीची. शोधा तिच्यात. बघा दिसेल तुमची आई, तुमची बहीण .घ्या शोध आपल्याच अंतरीचा. माझ्या सर्व भगिनींनो एकच विनंती...तुमच्यातल्या नवदुर्गा शोधा. स्वतः चे तेज शोधा.म्हणजे तुम्ही कधीही कुणाला बळी पडणार नाहीत,कुणाची शिकार होणार नाहीत.

आमिष लांडग्यांचे, पडता बळी कशाला

ऐकेल कोण तुमचा.. चित्कार वेदनांचा!!

कवियत्री लिला पुजारी डोहळे. जामनेर.

पुरुषसत्ताक विचारसरणीला झुगारावे...

अनेक वर्षांपासून स्त्री ही पुरुष केंद्री संस्कृतीने वेढली गेली आहे. पुरुष प्रधान संस्कृतीने स्त्री चे स्वतंत्र अस्तित्व नाकारलेले आहे. स्त्री ही चंद्रासारखी परप्रकाशीत तर पुरुष हा सुर्यासारखा स्वयंप्रकाशीत असे पुरूष प्रधान संस्कृतीत मानले गेले. स्त्री ही पांगळी तर पुरुष मात्र प्रगतीची घौड दौड करणारा उत्साही, निर्मिती करणारा असे मानण्यात आले. पुरुषाने स्त्रीची जशी प्रतिमा रंगवली तशीच ती संस्कृतीच्या इतिहासात रुढ झाली. स्त्री प्रतिमेचे उदात्तिकरण म्हणजे पुरुषसत्ताक संस्कृतीने स्त्रीचे केलेले निर्बलीकरण असते. स्त्रीला दुय्यम मानण्यासाठी तिचे उदात्तीकरण केले जाते. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री ही अनंत असे मानले जाते. तेव्हा वास्तविक स्त्रीला स्वतः चे अस्तित्वच नाही. ही गोष्टच समाज मनावर बिंबवण्याचा प्रयत्न पुरुषप्रधान पध्द्तीत होत असतो. तिला जी परिमाणे दिली जातात तशी ती नसतेही तरीही तीला असण्यासाठी, तसेच दिसण्यासाठी ती स्वतः वर लादून घ्यावी लागतात म्हणूनच संस्कृतीच्या इतिहासात स्त्रीची तथाकथित उदात्त प्रतिमा खर्‍या अर्थाने फसवी आहे. स्त्री चे अस्तित्व, स्वत्व नाकारणारी आहेत. उदात्तिकरणाच्या पुरुषसत्ताक विचार सरणीला समस्त स्त्रियांनी विरोध केला पाहीजे. पुरुषसत्ताक विचार सरणीला झुगारून देण्यासाठी नवरात्रीच्या या शुभ पर्वापासून समस्त स्त्री वर्गाने सुरुवात करण्याची गरज आहे. स्त्रीने स्वतःला ओळखले पाहजे.

सौ कविता गिरीष नारखेडे. नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिनावल.

विवाहानंतरही व्यक्तिमत्त्व विकसित करण्याची संधी हवी

आजची स्त्री ही डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी वा आमदार अश्या महत्वाच्या पदांवर काम करीत असली तरी ह्या कर्तबगारीपेक्षा ती घरकाम किती करते यावरून समाज तिचे मोठेपण व कर्तुत्व आजही ठरवितो. विवाहापूर्वी जोपासलेल्या कला, छंद, शिक्षण याकडे विवाहानंतर दुर्लक्ष केले जाते. संसारातील जबाबदार्‍यांमुळे वेळेअभावी विवाहापुर्वीची अष्टपैलू स्त्री विवाहानंतर केवळ चोवीस तासाची बांधील अशी चाकरमानी ठरते. संपूर्ण जबाबदारीचे एकटीवर पडणारे ओझे आणि सामाजिक दृष्टीकोन यांमुळे जबाबदारीची व मोठ्या अधिकाराची पदे बहुसंख्य स्त्रियांना कुवत व पात्रता असून सुद्धा नाकारावी लागतात. कारण त्या पदासाठी लागणारा वेळ त्या देवू शकत नाही. म्हणून विवाहानंतर सुद्धा स्त्रीला स्वताचे व्यक्तिमत्व विकसित करण्याजोगी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. आज काही प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रात स्त्रियांच्या नैसर्गिक शक्तींना व गुणांना मिळत आहे. पण अश्या स्त्रियांची संख्या खूप कमी आहे. आधुनिक समाजरचणनेमध्ये स्त्रीला घराबाहेर पडून पुरुष्याच्या बरोबरीने अर्थार्जन करणे अपरिहार्य झाले आहे.. घरची व बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागत असल्याने तिची तारेवरची कसरत मात्र चालू असते.

डॉ. संगीता गावीत, जळगाव

नारीशक्तीचा सन्मान हाच तिचा खरा अलंकार

नारी शक्तीचा सन्मान करा म्हणजे त्यांचे रोज पूजन करा असे नाही तर तिलाही घरात व समाजात बरोबरची वागणुक द्या तिला घरात आणि समाजात वावरताना सुरक्षित असे वातावरण तयार करण्याबाबत प्रयत्न करा. महिलांचा जागर मनामनात होणे गरजेचे आहे त्यासाठी आता महिलांनी पुढे यावे. महिला सबलीकरणाच्या पाया महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,ताराबाई शिंदे यासारख्या पूजनी विचारवंतांनी घातला. एकविसाव्या शतकात महिलांनी सशक्तिकरणाने शिखर गाठायला हवे, स्त्रियांनी राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक व धार्मिक क्षेत्रात नेतृत्व विकसित करून सर्व सामाजिक संस्थांवर सत्ता निर्माण करून 21व्या शतकात महिला सक्षमीकरणाचा सुवर्णकाळ निर्माण करावा. तोच स्त्रियांचा मुक्तीचा मार्ग आहे. हा जागर प्रत्येकाच्या मनात रुजवण्याची गरज आहे. आजच्या आधुनिक युगात महिला खर्‍या अर्थाने सक्षम होतील. समाजात व परिवारात आजही महिलांना अनेक ठिकाणी असुरक्षितता जाणवत असते. परंतु संस्कार अप्रत्यक्ष असलेला सामाजिक दबाव यामुळे त्या अन्याय सहन करत असतात. याबाबत आता जागर व्हावा. कतीही संकटे येवोत ती मनाने खचत असली तरी मात्र पुन्हा नव्याने उभारी घेत जीवन गाणे गात राहते ,हे सारे दैवी शक्तीमुळेच आहे म्हणूनच स्त्रीला दुर्गेचे रूप मानले जाते ते या अर्थाने.

सौ.प्रणिता विजय पाटील (गृहणी) घोडगाव ता.चोपडा जि. जळगाव

स्त्रियांनी स्व:मधील अस्मिता जागृत करावी

नवरात्रीचा उत्सव सुरु झाला आहे. संपूर्ण भारतात स्त्री शक्तीचा उत्साह बघून, नवचेतना बघून एक स्री या नात्याने अंतर्मनात आनंद होतोच. अंतरिच्या कळकळीने प्रेमाने मागितलेले मागणे कोणी नाकारत नाही. कारणं या जगात निर्मळ प्रेमच दुर्मिळ झालय. आणि तेच स्रीच मोठं वैभव आहे. प्रेम वात्सल्यासारखी, आपल्यापाशी असलेली माणुसकीची भावना. हिच स्री शक्ती म्हणजे स्त्रीची माणुसकी जागवण्यासाठीची शक्ती. आत्मविश्वासाची शक्ती. आपल्या पाशी असलेली ही शक्ती स्री नेच जागवायला हवी. तिने सौदर्यांचे, लाचारीचे पांघरुण घेऊन संरक्षण शोधणे सोडून देऊन आत्मविश्वासाने, निर्भयपणे स्वतः ला व स्वतःच्या मुलांना जसे जग हवे असेल तसे निर्माण करण्यासाठी पुढे येण्याची जरूरी आहे. आत्मविश्वासाने नव्या संकल्पनांना आत्मसात करून त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करायचाय. स्रीला माणूस म्हणून जगायची अस्मिता जोपासायचीय. त्यासाठी सद्यस्थिती काय?आजचे जागतिक प्रश्न काय?ते सोडवण्याचे संभाव्य मार्ग कोणते असू शकतील याचा अभ्यास व्हावा. जागृत स्रिया सर्व थरांत निर्भयतेने संचार करू लागल्या तर बहुसंख्य स्त्रियांची वास्तव स्थिती त्यांना अनुभवाने उमजेल. स्रियांच्या अन्यायाला आत्मविश्वासाने संघटितपणे तोंड देण्याचे आत्मभान जागृत होईल. एवढं सशक्त मन आत्मबल.स्रीत आहे.या शक्तीची तिला जाणीव करून देणे व त्यासंबंधी तिला जागृत करणे हेच ‘स्री -शक्ती जागरण’ ठरेल.

श्रीमती सोनाली श्रावण विसाळे (ठाकूर) चाळीसगाव.

स्त्री शिक्षण काळाची गरज

स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व परिपोषण करणारे महत्त्वाचे साधन म्हणजे स्त्रीशिक्षण होय. स्त्री शिक्षण हा कोणत्याही समाजजीवनाच्या समृद्धीचा आणि प्रगतीचा मापदंड आहे. मागील काही दशकात देशात जी काही महिलांची स्थिती सुधारली आहे ती फक्त आणि फक्त स्त्री शिक्षणामुळेच शक्य झाली आहे. देशातील महिलांना शिक्षित केल्याशिवाय आपण विकसित देशाची अपेक्षा करू शकत नाही. एक स्त्री शिकली तर अख्या कुटुंबाचा विकास होतो स्त्री शिक्षणाचे अनेक फायदे आहेत. घरातील चुलीपासून बाहेर निघून व्यवसाय,साहित्य, प्रशासन, पोलीस ,सैन्य, खेळ व अवकाश इत्यादी क्षेत्रांमध्ये महिला पुढे आल्या आहेत. देशाच्या उज्वल भवितव्यासाठी स्त्रियांचे शिक्षण अति महत्त्वाची बाब आहे म्हणून आपण सर्वांनी त्यांना अतिशय उत्साहाने पुढे करायला हवे. शिक्षित महिला तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जबाबदार बनवते ती तिच्या मुलांमध्ये चांगल्या गुणांचा संचार करते. एक शिक्षित महिला संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला शिक्षित करते मी स्वतः देखील एका खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील पहिली स्त्री शिक्षिका आहे त्यामुळे शिक्षित महिला नोकरी करून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात. शिकलेली स्त्री आपल्या मुलांना कधीही अशिक्षित राहू देत नाही. म्हणूनच स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे.

श्रीमती शितल अशोक पाटील. उपशिक्षिका, जि. प. प्राथमिक शाळा,खडके बुद्रुक. ता. एरंडोल.

सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक व्हावा

करलो दुनिया मुठी मे ! हे वाक्य शंभर टक्के खरे आहे कारण एका छोट्याशा मोबाईलमुळे आपण स्वतः पासून ते गाव परिसर देश, विदेशातील कानाकोपर्‍यातील व्यक्तींपर्यंत आपण एकमेकांना जोडलो गेलोत. या माध्यमातून दररोज संदेश वेगवेगळी माहिती आपल्याला आवश्यक असलेली माहिती घरबसल्या जागी काही क्षणात मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होते. म्हणून आज मुठीत मावणारा मोबाईल एक खरा सोबती सखा ठरला आहे. त्याचा वापर व गरज फार मोठी आवश्यक गोष्ट झाली आहे. ही बाब निश्चितच मोठी प्रगतीची असली तर दुसरी बाजू मात्र तेवढीच धोक्याची देखील घंटा आहे. म्हणून महिलांनी मोबाईल वापरताना हाताळताना घाई न करता सावधगिरी बाळगून वापर करावा. दिवसभराच्या कामासाठी होणारी धावपळ वेळ यामुळे वाचतो हा चांगला अनुभव आहे . पण व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जगाशी एकमेकांना जोडले गेलो आहोत. म्हणून यांचा वापर करतांना त्याची पूर्ण माहिती असावी. या माध्यमातून सावधगिरी बाळगली गेली नाही तर आपली फसवणूक, मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोशल मीडियासह मोबाईलचा वापर काळजीपूर्वक करावा.

सौ. सुरेखा रमेश पाटील (गृहिणी)जोगलखेडे ता.पारोळा

स्त्रियांचा सन्मान करण्यात काटकसर का?

स्त्री ही कर्तबगार असून संस्कारक्षम आहे. त्यामुळे तीने सामाजिक व पारिवारीक मर्यादा ओलांडून संसार उध्वस्त करू नये. स्त्री किंवा पुरूष कर्तबगार होण्यासाठी ईश्वराने एक सिध्दांत, नियम बनवला आहे. तो असा की एका यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते आणि एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरूष असतो. हे दोघे एकाच रथाची चाके आहेत. एका चाकाने गाडी चालत नाही. पती पत्नीही रथाची चाके आहेत. प्रत्येक स्त्रीला वाटते की घरात आपला सन्मान व्हावा आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा झालाच पाहिजे. कारण स्त्रीमुळेच आपण सर्व आहोत. मग स्त्री सन्मान करण्यासाठी काटकसर कशाला? मुलांना लहाणपणापासून आईचा सहवास जास्त लागतो. एक स्त्री आपल्या मुलांना घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करते. मग ते शिक्षण असो वा आरोग्य असो, वा संस्कार. यासाठी आई सर्व कष्ट पणाला लावून प्रयत्न करत असते. स्त्री म्हणजे सर्वांचे जीवन घडविणारी एक मुर्तीच आहे. एका स्त्रीने आपल्या मुलींना संस्कारक्षम बनविण्यासाठी प्रयत्न केले तर ती दोन कुटुंबांची प्रगती करू शकते. जीवनात स्वत:च्या मुलांवर संस्कार करणे हे एका स्त्रीचे आद्य कर्तव्य आहे. मुलींना कर्तबगार बनवा पण मर्यादा ओलांडुन नव्हे. कारण जीवनात पंरपरेनुसार काही मर्यादा आहेत. त्यांचे पालन करणे गरजेचे आहे.

श्रीमती पी. एन. पाटील. अ. भा. गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी,ता.जामनेर

कारण...ती परिपूर्ण आहे...

ती अन्नपूर्णा, ती सौम्य, ती रूद्र, ती मोहक, ती जगतजन्ननी, ती जीवन, ती काळ, ती सर्वकाही असले तरी ती एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. तिने तिच्या भावनांना का आवर घालावा ? कधीतरी तीने अल्लड व्हायला हवं ! सतत समजूतदार होण्याची काय गरज आहे ? जरी ती घराच्या नात्यातील घट्ट गाठ असली तरी कधीतरी मुक्तपणे हवेत लहरींची गती घेत लहरत , बागडण्यात काय वाईट आहे ? ती सशक्त आहे , साकार आहे, ती एक स्त्री आहे. जरी साधी असली, तरी मात्र दुबळी नाही. स्वतःच तिचं एक वेगळं विश्व आहे. तिचे प्रतिबिंब लख्ख करणारे आहे. तिची पारदर्शकता त्या दर्पणाला देखील लाजवेल अशी आहे. स्त्रीच ती जी लढण्यासोबत मिटण्याची देखील हिम्मत ठेवते. ती 21 व्या शतकातील सशक्त अशी नारी आहे कि, जी काळानूसार बदलत आहे.विज्ञानाची गोडी तिला आहे. ती स्वतःला सिध्द करत बसणारी नव्हे, तर इतरांना पारखणारी आहे. कारण तिला ठाऊक आहे की, तिच्या पासूनच हे जग आहे. ती अतिशय उत्तम अशी व्यवस्थापक आहे. जी तिचे अस्तित्व आणि त्याचबरोबर इतरांचे भावनिक बंध जुळवून आणते . उत्तमरित्या तिचे काम चोखपणे पार पाडते तीच एक सशक्त, चतुर आणि साकार स्त्री आहे, कारण ती परिपूर्ण आहे. ती परिपूर्ण आहे !

सौ.अश्विनी विकास अहिरे. गृहिणी तळेगाव ता. जामनेर

नारीशक्तीच्या विकासासाठी कार्य करावे

आजची स्त्री सर्वच क्षेत्रात सक्रिय असून आत्मनिर्भर व स्वावलंबी आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रासह शासकीय स्तरावरही स्त्रिया आपली जबाबदारी निभावत आहेत. समाजात स्त्रियांचे उंचावलेले स्थान यामुळे लक्षात येते. ही वस्तुस्थिती असली तरी आजही ग्रामिण भागातील बर्‍याचशा स्त्रिया चूल आणि मूल यात गुंतलेल्या आहेत. समाजाकडे डोळसपणे पाहून नावीन्यपूर्ण गोष्टीत भाग घ्यावा या विचारापासून त्या खूप दूर आहेत. त्यामुळे स्त्रियांना आत्मनिर्भर करून नावीन्यपूर्ण गोष्टींमध्ये भाग घेण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी इतर शिक्षित स्त्रियांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. अशा स्त्रियांनी पुढाकार घेत ग्रामीण भागामध्ये उद्बोधनपर उपक्रम घडविणे गरजेचे आहे. जेणेकरून समाजामध्ये स्वत: चं स्थान निर्माण केलेल्या स्त्रियांकडे बघून इतरही स्त्रियांना प्रेरणा मिळेल व त्याही आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून स्वत: सह कुटुंबाचा विकास घडवतील. यासाठी महिला बचत गटांचा एक मार्ग आहे. बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग सुरू करून अर्थाजन करता येईल. बदलत्या वातावरणामुळे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेती व्यवसायात बर्‍याचदा खूप मोठे नुकसान सोसावे लागते. अशावेळी बचत गट मोठा आधार ठरतो. म्हणून स्त्रियांनी स्त्रियांच्या विकासासाठी कार्य करावे.

सौ. शकुंतला रामदास पाटील,गोराडखेडा बु. ता. पाचोरा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com