Wednesday, April 24, 2024
Homeजळगावनवरात्रौत्सव विशेष : आधुनिक व प्रगत समाजात महिलांवरील अत्याचाराचा अंत कधी होणार...

नवरात्रौत्सव विशेष : आधुनिक व प्रगत समाजात महिलांवरील अत्याचाराचा अंत कधी होणार ?

जळगाव : jalgaon

आपण विज्ञान व शैक्षणिक क्रांतीमुळे आधुनिक व प्रगत होत आहोत.पुरूषांसोबतच आता महिलाही उच्च शिक्षण घेत उच्च पदावर नोकरी करत आहेत. चुल आणि मूल या निसर्गनियमानुसार महिला घर सांभाळत नोकरीही सांभाळत आहेत. या दोन्ही आघाड्यांवर काम करतांना महिलांची चांगलीच दमछाक होत असली तरी माझा परिवार, माझे सदस्य या नुसार ती हे सारे मॅनेज करत असते. हे करत असतांना तीला अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. तीच्या या त्यागातूनच परिवाराचा गाडा सुखाचा होत असला तरी तीच्यावर अत्याचारही होत आहेत. मग आपण कसले प्रगत?शिक्षणाने शहाणपण येण्यापेक्षा रानटीपणाच अत्याचाराच्या घटनांतून दिसून येतो. त्यामुळे आधुनिक व प्रगत समाजात महिलांवरील अत्याचाराचा अंत कधी होणार असा यक्ष प्रश्न महिलांच्या आजच्या प्रतिक्रियांतून उपस्थित होत आहे.

- Advertisement -

अन्यायाविरुद्ध उठणारी आजची स्त्री

अफाट लोकसंख्या असलेल्या भारत देशात महिला व पुरुष दोघांना बरोबरीचे स्थान आहे. आजही स्त्रियांवर अत्याचार केला जातो. ते थांबविण्यासाठी स्रीने स्वतःच्या हक्कासाठी लढले पाहिजे. आजची स्री ही घरकाम व नोकरी अशी दोन्ही क्षेत्र सांभाळत आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेऊन आपले कर्तव्य जगभर पसरवले आहे. ती फक्त चूल आणि मूल सांभाळण्यापुरती मर्यादित राहिली नसून तिने औद्योगिक, शिक्षण आणि तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. शिक्षिका, डॉक्टर, इंजिनियर, अभिनेत्री, मंत्री, देशाच्या अनेक सर्वोच्च पदावर स्त्रियांनी स्थान मिळवले आहे. स्री ही या निसर्गाने दिलेली एक अनमोल भेटवस्तू आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये देवाने त्यांचे दिव्य गुण दिले आहेत. ती एक नाहीतर दोन दोन घरांच भाग्य उजळत असते. म्हणूनच तिला देवीचे स्थान देण्यात आले आहे. म्हणूनच सर्जनशीलतेची शक्ती प्राप्त असलेल्या या स्त्रीला समाजातील दुय्यम स्थान बदलणे आवश्यक आहे. सौ.करिष्मा भरत मोरे. न्हावी. यावल

आधुनिक काळातील स्त्री प्रगतीपथावर

लोकांना जागे करण्यासाठी सगळ्या महिला वर्गाला जागृत करणे गरजेचे आहे.जेव्हा महिला तिचे पाऊल पुढे टाकते तेव्हा संपूर्ण कुटुंब, संपूर्ण गाव पुढे जातो आणि देशाचा विकास घडतो. महिला जोपर्यंत त्यांचे अधिकार समजू शकत नाही तोपर्यंत समाजातील अनेक राक्षसी वृत्तींना त्यांना सामोरे जावे लागणार आहे. महिला आणि पुरुष हा लैंगिक भेदभाव देशाला सामाजिक सांस्कृतिक तसेच आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर सुद्धा देशाला पाठीमागे टाकतो. महिला शक्ती बद्दल काही लिहायला गेले तर मन कावरे बावरे होते याचे कारण देखील असेच आहे कारण पुरुषांच्या जोडीला एक महिला चालते तर दुसरी महिला या जगात तिचे अस्तित्व शोधत आहे तरीसुद्धा फक्त चूल आणि मूल या धोरणात असलेल्या महिलांनी आज आपल्या घराचा उंबरठा ओलांडलेला आहे. आजची महिलाही पूर्वीसारखी राहिलेली नाही तर ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने चाललेली आहे.

सौ. छाया अतुल पाटील. यावल

स्त्री: काल-आज-उद्या

सावित्रीच्या लेकींनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या नवदुर्गेची वेगवेगळी रूपं पाहत आहोत. पंतप्रधान, राष्ट्रपती,अवकाश विरांगणा,गान कोकिळा,लोकसभा अध्यक्षा ते आज राष्ट्रपती पद भूषविणार्‍या द्रौपदी मुर्मू अशी त्या- त्या क्षेत्रात सर्वोच्च पदी विराजमान झालेल्या महिलांची कितीतरी नावे सांगता येतील. ती शिकली, ती जिंकली, प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक कला, प्रत्येक मार्ग तिने व्यापला.इतकच काय प्रत्येक परिक्षेत, कसोटीवर अग्रभागी आहे. नवदुर्गेच्या नऊ रूपात तिचा वावर आहे. तिच्या जीवनातला अंधार पुरता निवळलेला नाही. अजूनही कुणीतरी दुर्दैवी निर्भया आहेतच. कायदा आणि समाज तिच्या पाठीशी आज उभा आहे.पण अजूनही हुंडा, कुंडली, षडाष्टक, उपासतापास अशा सामाजिक दृष्ट चक्रातून तिची पुरती सुटका झालेली नाही. ती लढवय्यी आहे. ही सारी जोखडं झुगारून ती पुढे चालत राहील. प्रत्येक दुर्गोत्सवात तिची क्रांतीज्योत अधिकाधिक तेजस्वी होत जातेय. समाज दीर्घ निद्रेतून जागा होत आहे. कायदा कायद्याचं काम करेल, समाज समाजाचं. पण सावित्रीच्या लेकी, तुझी तू समर्थपणे लढायला सिद्ध हो! तू खुद को बदल तब ही जमाना बदलेगा तू बोलेगी ,मुह खोलेगी,तब ही तो जमाना बदलेगा.

ललिता आनंदराव देशमुख. माध्यमिक शिक्षीका गणेशपूर ता. चाळीसगाव

मुलींना उच्चशिक्षित व स्वयंभू करावे

आजच्या काळातील स्त्री माँसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून सर्व जबाबदार्‍या पार पाडत कुटुंबासोबत समाजालाही पुढे नेण्याची मानसिकता ठेवणारी आहे. म्हणूनच मुलींना अधिकाधिक शिक्षित करून सामाजिक विकास साधला पाहिजे. ग्रामीण भागातील पालकांनीही मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन त्यांना आवडीचे व उच्च शिक्षण घेऊ दिले पाहिजे. सर्वच क्षेत्रात महिलांनी क्षमतेने व कुशलतेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे एखादे ठराविक क्षेत्र हे मुलींसाठी नाही अशा नकारात्मक भूमिकेतून पालकांनी व समाजाने बाहेर पडणे गरजेचे आहे. त्यांना मानसिक आधार देऊन पूर्ण क्षमतेने विकासाची संधी देणे गरजेचे आहे. त्यासोबतच मुलींना स्वरक्षणासाठी सक्षम करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे समाजात विकृत मानसिकता बाळगून वास्तव्यास असणार्‍यांना चाप बसेल व खर्‍या अर्थाने स्त्री शिक्षित व सुरक्षित होईल. स्त्री ही मुळातच कुटूंबवत्सल आहे. त्यामुळे ती शिक्षित होऊन नोकरी,व्यवसाय करून कुटुबांला प्रगतीपथावर नेईल. आजची स्थिती पाहता घरात एकटा पुरूष कमावणारा असेल तर महिलांनी नोकरी करणे गरजेचे होत असते.

प्रियंका रोहन पाटील, पाचोरा.

स्त्रियांना समान संधी देण्याची गरज

समाजपरत्वे, देशपरत्वे, स्त्रियांचे स्थान आणि भूमिका बदललेल्या दिसून येतात. याला त्या-त्या समाज व देशांच्या रूढी, परंपरा, मूल्ये, मानदंड जबाबदार असतात. स्त्रियांच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास आपल्याला लक्षात येते की, स्त्रियांच्या बाबतीत नाण्याच्या दोन बाजू आढळून येतात. एक म्हणजे स्त्रियांविषयी असणारा समाजाचा सकारात्मक, उदारमतवादी दृष्टिकोन तर दुसर्‍या बाजूस स्त्रियांविषयी असणारा समाजाचा कमालीचा नकारात्मक आणि उदासीन दृष्टिकोन होय. समाजरुपी रथ विकासाकडे न्यायचा असेल तर पुरुषरुपी चाकाबरोबर स्त्रीरूपी चाकालाही विकासाची चालना मिळणे गरजेचे आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, आपण आपल्या स्त्रियांच्या स्थितीकडे पाहून आपण आपल्या राष्ट्राची स्थिती सांगू शकतो. यावरून महिला सबलीकरणाची आवश्यकता लक्षात येते. महिला सबलीकरण, म्हणजे मानवी व्यवहारांच्या सर्वच पातळींवर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्तरातून समान संधी, स्थान व अधिकार द्यावे. स्त्री-पुरुष समानता, शिक्षण, आरोग्य, आर्थिक सुरक्षितता यांसारख्या मार्गांचा वापर करून महिला सबलीकरण शक्य आहे.

मानसी यजुर्वेंद्र महाजन, जळगाव.

संक़टांना सामोरे जात कुटुंब सांभाळणारी

कुटुंबव्यवस्था हा आपल्याकडील महत्त्वाचा सामाजिक घटक आहे आणि त्याबद्दल अनेक जण अभिमानाने बोलतही असतात. या व्यवस्थेचे फायदे-तोटे आहेत; परंतु या व्यवस्थेमुळे समाजाचा डोलारा उभा आहे, हे नाकारता येणार नाही. चंगळवादी संस्कृतीमुळे या व्यवस्थेला धक्के जरूर बसत आहेत. एकीकडे स्त्रीची पूजा, तर दुसरीकडे तिचा छळ असा दुटप्पीपणाही वाढत गेला. परंतु त्याची पाळेमुळे घट्ट असल्याने तडे गेलेले नाहीत. स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाके असल्याचे म्हटले जाते खरे; परंतु संसारथाचा तोल सावरला जातो, तो स्त्रीमुळेच. पुरुषसत्तेने स्त्रीला कायम कमकुवत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेवले. आताशा कुठे तिला कायद्याने हक्क मिळत आहे. त्यानुसार ती आपली प्रगती करीत आहे. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपण पुरुषांपेक्षा कमी नाही हे ती आज सिद्ध करीत आहे. स्त्री म्हणजे त्यागाची मूर्ती, परमेश्वराचे रूपच जणू. स्त्री म्हणजे सहनशीलतेचा कळस. संसारात तिचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते. ती नसेल तर कुटुंब कोमेजते. रात्रंदिवस कष्ट करून कुटुंबाचा डोलारा सांभाळते; पण आपल्या मुलांबाळांना त्याची झळ पोहोचू देत नाही.

सौ.वंदना भूषण फेंगडे, बेटी बचाव बेटी पढाव तालुका अध्यक्ष यावल.

तूच आहे तुझ्या जीवनाची शिल्पकार

ज्याप्रमाणे आपण घरातील सदस्यांची घराची काळजी घेत असतो त्याचप्रमाणे प्रत्येकीने स्वतःची आवड निवड तब्येतीलाही प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या आवडीचं क्षेत्रामध्ये अथवा ज्या स्त्रियांना नोकरी करायचे असते तर काही शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. या विचारधारेत नोकरी करतात. त्या स्त्रियांना घरांमध्ये नोकरीला विरोध असतो. पण तो विरोध योग्य कारणासाठी हवा. नाहीतर भांडण विकोपाला जाते. आपल्या समाजामध्ये काही बरेच असे उदाहरणे आहेत की स्त्रिया घरातील जबाबदारी सांभाळून सुद्धा व्यवसाय वाढवीत आहेत ब्युटी पार्लर असो घरगुती डबे असो क्लासेस असो. त्या कर्तव्य बजावून स्वतःच्या संसारासाठी मदतच करीत असतात. पण नोकरी करणार्‍या स्त्रियांना समाजामध्ये प्राधान्य, मान जास्त दिला जातो. नोकरी असो व्यवसाय पण दोघेही जबाबदार्‍या पार पाडताना लोक काय म्हणतील असा विचार न करता स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत आवडीनिवड जोपासत परिवारातील सदस्यांच्याही आवडी निवडी व छंदांना प्रोत्साहन दिल्यास चित्र काहीेसे वेगळे दिसेल. यामुळे ताणतणाव दूर होत सर्वांशी भावनिक नाते अधिक दृढ होईल. करा सन्मान तिच्या अस्तित्वाचा तिच्या बुद्धिमत्तेचा तिच्या कर्तृत्वाचा!

शिल्पा मांडे, क्रीडा शिक्षक काशिनाथ पलोड पब्लिक स्कुल जळगाव.

साडेअठरा वर्ष संपूनही स्त्रियांची स्थिती जैसे थे !

21 व्या शतकातली साडेअठरा वर्षे संपत आली असतानाही स्त्रियांच्या बाबतीत त्या काळात आणि आजच्या काळातील परिस्थितीत बदल झालेला नाही. पुरोगामित्वाचा डांगोरा पिटणारे आम्ही सुधरायला तयार नाही. म्हणून माझ्या भगिनींची पीडा थांबव हीच प्रार्थना मी आदिशक्तीला हात जोडून करते. माझ्या भगिनींना सुरक्षितता सोबतच प्रोत्साहनही मिळायलाच हवे. आज माझ्या स्वतःच्या घरात मला प्रोत्साहन मिळाले म्हणून मी राजकीय वर्तुळात बाहेर पडू शकले आणि समाजासाठी काहीतरी करू शकले. तसेच प्रोत्साहन राजकारणातच नव्हे तर शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा उद्योगासाठी मिळाले.त्यादिवशी माझा प्रत्येक समाज आणि संपूर्ण भारत देश आदिशक्ती प्रमाणेच बलवान झालेला असेल. तो दिवस पाहण्यासाठी मी नक्कीच आतुर आहे. परिवाराची साथ मिळाली तर महिलांही विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकतात. हे सिध्द होत असले तरी त्याचे प्रमाण हे मर्यादीत आहे. त्यामुळे या नवरात्रीत प्रत्येकाने मनात जागर करत आपल्या घरातील महिलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी द्यावी.

वर्षा महेंद्र बोरसे, माजी सरपंच सात्री. ता. अमळनेर

स्त्रियांना मान सन्मान मिळण्याची अपेक्षा

स्रीही परिवार व समाज घडविण्यासह समाजाला दिशा देण्याचे महत्वपुर्ण कार्ये करते. बहुतांश परिवार स्रीयांच्याच विचारावर मार्गक्रमण करतात व यशस्वीही होतात. कारण स्रीया कोणताही निर्णय घेण्यापुर्वी त्याचा होणारा लाभ व नुकसान या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतात. परिवारात मुलांना शिक्षणासह संस्काराचीही गोडी निर्माण करण्याचे महत्वपुर्ण कार्य स्रीया करतात.आजच्या युगात पुरूषांबरोबर महिलाही अगदी लहान पदापासून ते उच्च पदापर्यंत शासनाच्या विविध विभागात व राजकीय तसेच सामाजीक क्षेत्रातही आपले कुटुंब सांभाळत सेवा बजावत आहेत.तसेच पुरूषांच्या यशस्वीतेमध्येही स्रीयांचा सिंहाचा वाटा असतो. म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्री असते. अगदी तसेच सध्या देशभरात नवरात्र उत्सव आनंदात व उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवाचा सर्वात जास्त आनंद हा महिलांनाच असतो. बहुतांश स्रीया नवरात्रीचे उपवास करतात व मनोभावे माता राणीची पूजा व सेवा करतात साक्षात दुर्गेचे रूप असणार्‍या या स्रीला समाजात अधीक मान सन्मान मिळणेे अपेक्षीत आहे.तरच खर्‍या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर होईल. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सौ.भारती प्रशांत पाटील ग्रा.प.सदस्या किनगाव बुद्रूक ता.यावल.

अंबाबाईचा उदो उदो…

स्त्री मुक्ती व्हावी पण त्यात माझ्या घरातील स्त्री नसावी, अशा बोलघेवढ्या प्रवृत्तीचे लोक आजही समाजात वावरत आहेत ( काही उपवाद ) नवरात्र आली की सोशल मीडिया वर स्त्री सन्मान, स्त्री शक्ती वरील विविध स्त्री जन्मावरील लेख तुफान वायरल होत असतात. पण ते फक्त लिहिण्या आणि वाचनण्यापुरते.हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे चुल व मुलं याच्यापलीकडे जाऊन स्वकर्तृत्व सिद्ध करणार्‍या महिलांचा आहे आजही ती गृहलक्ष्मी, अन्नपूर्णा, दुर्गा, कालिका, चंडिका अशा रुपामध्ये घरात कानकोपर्‍यात वावरत असते अन दुसरीकडे अत्याचाराला बळीही पडत असते.देव्हार्‍यातल्या देवीसारखी पूजा नकोय तिला. फक्त सन्मान तेवढा हवाय. तिचा जन्म अजूनही काही घरात नाकारला जातो. जन्माला येण्याआधीपासून जन्मानंतरही तीच्यावर अत्याचार होत आहेत. एवढं सार घडत असतानाही देवी माते तू डोळ्यावर पट्टी बांधून गप्प असतेस आणि तो नराधम पुन्हा दुसरा जीव चुरगळन्याच्या तयारीत असतो निदान यावेळी तरी तू अवतार घ्यायला हवास.मंदिरातील देवी म्हणून तुला पुजल जात आणि तुझाच अंश असणार्‍या तिला का बरे पायाखाली तुडवलं जात. हे महिषासूर मर्दीनी तुला कळतात. आता तरी तू यायला हवंस….

सौ. अनीताताईं संजय अग्रवाल, बोदवड़

दुर्गोत्सवात भाग घ्यावा

दुर्गा उत्सवात स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा. स्त्रीने नवरात्र उत्सवात गावातील व परिसरातील देवीचे मंदिर किंवा आपल्या सार्वजनिक मंडळामध्ये स्वतः हिरीरीने भाग घेतला पाहिजे. देवीची विधीवत पूजा अर्चा, उपवास, उपासना, पाठ आराधना करणे या पलीकडे प्रत्येक स्त्रीला देवीचे माहात्म्य, कथा बरोबर साडेतीन शक्तीपीठे कोठे आहेत देवींनी तेथेच वास्तव्य का केले असावे ? देवींची स्वयंभू मुर्ती ची सखोल माहिती असली पाहिजे. देवी विषयीचे भारुडे, देवीची गाणे, जोगवा असे धार्मिक, सांस्कृतिक मनोरंजनाच्या अनेक कार्यक्रमात स्त्रियांनी स्वतः:हुन सहभाग घेऊन इतर स्त्रीयांना देखील आग्रहाने सहभागी करून घेतले पाहिजे. आपण वर्षभर घर संसार यांच्यात गुरफटून गेलो असतो. यामुळे मनावर ताण तणाव निर्माण होऊ मन व स्वभाव चिडचिड होतो. म्हणून आपले दैनंदिन जीवन नकोसे कंटाळवाणे होऊन जाते म्हणून आपल्या महान भारतीय संस्कृती सण, उत्सव, वत, वैकल्य उपवास आदी निमित्त या उत्सवाची आखणी केली आहे. म्हणूनच सण उत्सवात आनंद व सुख मिळावे यासाठी दुर्गोत्सवात एकत्र येऊन एक आगळा वेगळा आनंद मिळतो. यातून घर परिसरातील मंडळामध्ये सहभागी होऊन आपल्यात असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळेल.

सौ. आशा नामदेव बागुल (गृहिणी) चाळीसगाव

तणावमुक्त जगावे

महिलांवर कुटुंबाची मुख्य जबाबदारी असते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना त्या अनेक जबाबदार्‍याही पार पाडत असतात. त्यामुळे महिलांनी ताणतणावापासून मुक्त राहून स्वत:चे आरोग्य सांभाळणे तितकेच गरजेचें आहे. कारण ताणतणावमुक्त व सशक्त महिलाच आपली जबाबदारी खंबीरपणे पार पाडू शकतात. म्हणून महिलांमध्ये ताणतणावापासून मुक्त राहात आरोग्याची काळजी घेण्याविषयी जनजागृती होणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी कुटूंबापासून सामाजिक स्तरापर्यंत प्रयत्न होणे गरजेचे आहे. तणावामुळे. आरोग्यासह मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे तणावमुक्त व आनंदी राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. आयुष्य जगतांना अनेक अडचणी येत असतात. त्यांना एकजुटीने सामोरे जावे. तरच तणाव मुक्त जीवन जगता येईल. तणावमुक्त जीवनासाठी घरातील सर्व सदस्यांमध्ये सुसंवाद असावा. आठवड्यातील किमान एक दिवस सर्वांनी एकत्रित बसून भोजन करणे, गप्पा करणे, चित्रपट पाहणे किंवा शक्य झाले तर खेळणे. होय खेळणे. कारण शाळा महाविद्यालये सोडल्यानंतर खेळांचा तसा सबंध नसतो. म्हणून खेळ खेळावा. यामुळे मन प्रसन्न होण्यासह परिवारातील सर्व सदस्यांमध्ये भावनिक जवळीकता दृढ होईल. मीनाक्षी चौधरी, जळगाव

स्त्रियांनी आपले सामर्थ्य ओळखावे.

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्सव धामधुमीत साजरा केला जात असून देवी आदीमायेच्या सर्व रूपांचे पूजन केले जाते.या निमित्ताने तिच्या अफाट शक्तीचे व सामर्थ्याचे सुद्धा स्मरण केले जाते. आदीमायेची रूप म्हणून अनादी काळापासून स्त्रीची निर्मिती झाली. मात्र तेव्हापासूनच या स्त्रीला आपल्या सामर्थ्याची- शक्तीची जाणीव नसल्याने ती एक अबला म्हणून गणली जात होती. तिच्याकडे फक्त उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जात होते. स्त्री शिक्षणाची जननी म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी व महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी स्त्री शिक्षणाची द्वारे खुली केली व त्यानंतरच्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला त्यानंतर स्त्रियांनी आपले आपले सामर्थ्य दाखवायला सुरुवात केली.आम्ही पुरुषांच्या बरोबर गगन भरारी घेऊ शकतो हे स्त्रियांनी दाखवून दिले. मात्र आजही बर्‍याच स्त्रिया आपल्या परिस्थितीने उपेक्षित राहिल्याने शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या अशिक्षित फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले जातात व तिची विटंबना केली जाते व स्त्री जातीला अपमानित केले जाते. त्यामुळे शेवटी सांगावेसे वाटते की, सर्व स्त्री वर्गाने शिक्षण घेऊन सामर्थ्यवान बनले पाहिजे.

सौ. सुनिता सुनील पाटील साकळी ता. यावल

- Advertisment -

ताज्या बातम्या