Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रनवी मुंबई विमानतळ : दि. बा. पाटील यांच्या नावासाठी हजारो लोक रस्त्यावर

नवी मुंबई विमानतळ : दि. बा. पाटील यांच्या नावासाठी हजारो लोक रस्त्यावर

मुंबई:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला असताना नवी मुंबईतील स्थानिक दि. बा. पाटील यांच्या नावावर ठाम आहे. त्यांच्यांसाठी आज हजारो लोक रस्त्यावर उतरले आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून नवी मुंबईला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाचा ‘सस्पेन्स’ कायम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक आणि भूमीपूत्र करत आहेत. या मागणीने आता हळूहळू आंदोलनाचे स्वरुप धारण केले आहे आणि आता हे आंदोलन काही प्रमाणात राजकीय वळणावर येऊन ठेपले आहे. मनसेचे कल्याण (ग्रामीण)चे आमदार राजू पाटील हेही आंदोलनात सहभागी झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नामकरणावरून भूमिका मांडल्यानंतरही राजू पाटील आंदोलनात सहभागी झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

बाळासाहेबांचं नाव आमच्या हृदयात आहे पण नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे. आज भूमिपुत्र म्हणून आलो आहे, पक्ष भावना बाजूला आहे. मी बाळासाहेबांच्या रोज पाया पडतो पण दि बा पाटील यांचं योगदान नवी मुंबईत मोठं आहे. त्यामुळे त्यांचं नाव दिलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी दिली.

कोण होते दि. बा. पाटील

रायगड तालुक्यातील लोकनेते अशी ओळख दि. बा. पाटील यांची होती. त्यांचं मूळ नाव दिनकर बाळू पाटील असं आहे. १३ जानेवारी १९२६ रोजी त्यांचा जन्म नवी मुंबईतील उरणजवळील जासई या गावी झाला होता. ते पेशाने वकील होते. तर त्यांचे वडील शेतकरी आणि शिक्षक होते. दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणारे हे नेते होते.

दि. बा. पाटलांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. “दिबा” उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरवी. शेतकरी कामकरी पक्षाला दि. बा. पाटील यांनी मोठे केले होते. जोपर्यंत पाटील शेतकरी कामकरी पक्षात होते, तोपर्यंत शेतकरी कामकरी पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता. पण त्यांच्यानंतर रायगड जिल्हा सोडता या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही.रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते शेवटपर्यंत कष्टकऱ्यांसाठी लढले. दि. बा. पाटील पुढे शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि १६ ऑगस्ट १९९९ रोजी शिवसेना पक्षात आले. मात्र, नंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या