राष्ट्रीय युवा दिन विशेष

राष्ट्रीय युवा दिन विशेष

डॉ. सुनील औंधकर

आधुनिक भारताचे निर्माते स्वामी विवेकानंद जयंती (Swami Vivekananda Jayanti )अर्थात राष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी 12 जानेवारी रोजी देशभरात उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनतो. युवाशक्ती योग्य दिशेने प्रवाहित झाल्यास देश प्रगतिपथावर अग्रेसर होतो. याची आठवण तसेच प्रत्येक युवक देशाप्रती अभिमानाने देशसेवा करण्यास प्रवृत्त व्हावा यासाठी भारतात या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस ( National Youth Day)साजरा करण्यात येतो.

युवक कोणाला म्हणायचे हे विशद करताना स्वामीजी म्हणतात की, आपल्या अंगातील ऊर्जेला सकारात्मक ध्येयाकडे खंबीरपणे नेण्याची मानसिकता असणारी व्यक्ती म्हणजे युवक. ते म्हणत, उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. युवकांमध्ये असणार्‍या प्रतिभाशाली ताकदीवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. युवकांमध्ये लोखंडाचे स्नायू आणि पोलादी नसा असल्या पाहिजेत.

आजचा युवक हा अतिशय संवेदनशील असून त्याला फक्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे. युवाशक्ती हे राष्ट्राचे प्राणतत्त्व असते. त्याच्यामध्ये गती, स्फूर्ती, चेतना, प्रतिभा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. त्याग हे राष्ट्रासाठी नेहमी अभिमानास्पद असतात. युवावर्गाचा संकल्प, मार्गक्रमण आणि कार्यास सिद्धीपर्यंत नेण्याचे कसब अतुलनीय आहे, असे प्रेरणादायी विचार व्यक्त करणारे स्वामी विवेकानंद हे भारतीय युवा वर्गाचे आयडॉल आहेत, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही.

विसाव्या शतकामधील अखेरची काही वर्षे आणि आता एकविसाव्या शतकात आश्चर्यकारक पद्धतीने आपली वाटचाल सुरू आहे. अर्थातच या वाटचालीत युवकांचे योगदान अतिशय मोलाचे आहे, हे नाकारून चालणार नाही. व्यसनाधीनता आणि आधुनिक जीवनशैलीच्या गर्तेत सापडलेला आजचा युवावर्ग दुसरीकडे व्यवसाय किंवा नोकर्‍यांमध्ये अनिश्चिततेचा तणावपूर्ण सामनादेखील करत आहे आणि यातून खंबीरपणे उभे राहायचे असेल तर स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रेरणादायी ठरणार आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन काळात मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी विविध उपक्रम असतात.

विशेषतः राष्ट्रीय सेवा योजना, गर्ल्स गाईड, एन.सी.सी.सारख्या उपक्रमांमध्ये सहजीवन आणि सामाजिक बंधुभावाचे उत्तम अनुभव दिले जातात. याच स्तरावरील आणखी एक उपक्रम युवकांच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावू शकेल. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेद्वारा संचलित केला जाणारा यूथ रेडक्रॉस आणि ज्युनिअर रेडक्रॉस हा उपक्रम सुरू झाला आहे.

युवा वर्ग आणि किशोरवयीन मुले यांच्यासाठी यूथ रेडक्रॉस आणि ज्युनिअर रेडक्रॉस या संकल्पना आणून रेडक्रॉसने आपला हेतू अधिक व्यापक बनवला. शाळा आणि महाविद्यालयातील कोणताही विद्यार्थी-विद्यार्थिनी याचा सदस्य होऊ शकतो. विश्वबंधुत्व, मानवता व सेवावृत्ती या मूल्यांचे संस्कार व्हावेत व या मूल्यांविषयीचा आदर वाढीस लागावा म्हणून संस्थेची स्थापना करण्यात आली. सर्वांना युवक दिनाच्या शुभेच्छा !!

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com