
नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यात 8 ते 21 मार्चपर्यंत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीम, विशेष क्षयरोग तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
या कालावधीत जिल्ह्यातील सक्रिय क्षयरोग शोधमोहीम राबवली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करणार असून नागरिकांनी आजाराची माहिती न लपवता ती सर्वेक्षणासाठी येणार्या कर्मचार्यांना द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाधरन डी. व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
आरोग्य विभागाच्या राबविण्यात येणार्या या विशेष मोहिमेत ग्रामीण शहरी भागातील अतिजोखमीच्या घरांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्र व 592 उपकेंद्र येथून सर्वेक्षण पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या मोहिमेचे सह. नियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी करणार आहेत.
या मोहिमेत 4 लाख 59 हजार 492 नागरिकांचे घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे डॉ. रवींद्र चौधरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी सांगितले. क्षयरोग हा बरा होणारा रोग आहे. यासाठी दोन आठवड्यापेक्षा सतत ताप व खोकला असेल तर दोन वेळा धुंकी तपासून घ्यावी. नियमित औषधोपचार व संपूर्ण कालावधीचा सहा ते आठ महिने औषधी घेणे अत्यंत गरजेचे आहे.