राष्ट्रीय धावपटू तब्बल चौदा वर्षांनी झाला 'दहावी पास'
मुख्य बातम्या

राष्ट्रीय धावपटू तब्बल चौदा वर्षांनी झाला 'दहावी पास'

लष्करात नोकरीचा मार्ग मोकळा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

जाकीर शेख | घोटी

चिकाटी, जिद्द व परिश्रम घेण्याची तयारी असली की अशक्यही गोष्ट शक्य होते याचा प्रत्यय घोटीतील ३० वर्षीय युवकाला आला.

राष्ट्रीय दर्जाचा धावपटू असूनही केवळ दहावी उत्तीर्ण नसल्याने त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.

घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणही घेता आले नाही. शिक्षण नसल्याने उदरनिर्वाहाचे साधन नाही. मात्र, दररोज तीस किमी धावणे व त्यात रोज पाच किमी उलटे धावणे यात पारंगत असलेल्या घोटीतील निलेश भास्कर बोराडे या धावपटूने वयाच्या तिसाव्या वर्षी दहावीची परीक्षा दिली.

या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने त्याचा आनंद गगनात मावेना. या निकालाने त्याचा लष्करात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

घोटी येथील तीस वर्षीय युवक धावपटू निलेश भास्कर बोराडे हा याच संधीची गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होता.

घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल व बेटाची असल्याने त्याने १४ वर्षांपूर्वीच सातवीच्या परिक्षा दिल्यानंतर शिक्षण थांबवावे लागले.

मात्र, त्याला अल्पवयातच धावण्याची आवड निर्माण झाल्याने या प्रत्युकुल परिस्थितीतही मात करीत त्याने आपला सराव कायम ठेवला विशेष म्हणजे ऊन, पाऊस, वारा याची चिंता न बाळगता त्याने अखंडित पणे हा धावण्याचा सराव कायम ठेवला.

दररोज ३० किमी धावणे हा त्याचा छंद तर त्यात रोज पाच किमी उलटे चालणे हा त्याचा आजवरचा विक्रम. अशा स्थितीत आज निलेशचे वय ३०वर्षाच्या उंबरठ्यावर असल्याने त्याला नोकरीची भ्रांत आहे.

राष्ट्रीय स्तरावर अनेक यश मिळवूनही केवळ शिक्षण दहावी नसल्याने त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रसंगी राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी त्याला मजुरी करावी लागते, अनेक दिवस त्याने बांधकाम क्षेत्रात बिगारी म्हणून काम केले.

आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर निलेशने आजपर्यंत दिल्ली, हैदराबाद, गोवाहाटी, कारगिल येथेही धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेऊन नेत्रदीपक कामगिरी केली होती. राज्य जिल्हास्तरावर तर त्याने धावण्याच्या स्पर्धेत कोणाला पुढे जाऊ दिले नाही, मात्र शिक्षणाच्या अभावाने त्याला नोकरीच्या क्षेत्रात घौडदौड करता आली नाही.

सन २००६ मध्ये निलेशचे सातवीची परीक्षा दिली होती. त्यानंतर मात्र परिस्थितीमुळे त्याच्या शिक्षणाला ब्रेक लागला. तब्बल १४ वर्षांनंतर त्याने थेट दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला, यावर्षी परीक्षा दिली त्यात त्याने ६५ टक्के गुण मिळवून आपल्या पदरात यश पाडून घेतले.

त्याची लष्करात जाण्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती केवळ दहावी उत्तीर्ण ही अट असल्याने तो निकालाच्या प्रतीक्षेत होता . मात्र आजच्या निकालाने लष्करात जाण्याच्या त्याचा मार्ग मोकळा झाल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता.

दिवसातून तीन वेळा कळसुबाई शिखरावर जाण्याचा फक्त निलेशचाच विक्रम कळसुबाईचे शिखर सर करणे हे अनेकांचे स्वप्न आहे.

मात्र आपल्या धावण्याच्या सरावामुळे या निलेशने नवरात्रात दिवसातून तीन वेळा कळसुबाई शिखर सर करण्याचा विक्रम केला त्याच्या या धाडसाचे, व इच्छा शक्तीचे सर्वत्र कौतुक केले गेले.रोज एक वेळा कळसूबाई शिखर चढणे हे अनेकांनी शक्य केले मात्र एकाच दिवसात तीन वेळा शिखर सर करणे हे निलेशनेच शक्य करून दाखवले.

Deshdoot
www.deshdoot.com