Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआज राष्ट्रीय गणित दिन : रामानुजन यांचे अनेक सूत्र आजही कोडेच

आज राष्ट्रीय गणित दिन : रामानुजन यांचे अनेक सूत्र आजही कोडेच

भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर रोजी झाला. यामुळे २०१२ मध्ये माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

राष्ट्रीय गणित दिन

रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते. रामानुजन यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत होते. ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत. वयाच्या १० वर्षी ते जिल्ह्यात प्रथम आले. १५ व्या वर्षी ‘ए सिनॉपसिस ऑफ एलिमेंट्री रिजल्‍ट्स इन प्‍योर अँड एप्‍लाइट मॅथमेटिक्‍स’ नावाचे पुस्तक पाठ करुन टाकले. या पुस्तकात हजारो प्रमेय (थियोरम) होते. १९११ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला.

- Advertisement -

१७२९ ही संख्या रंजक

१९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली.रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी.एच .हार्डी एका मोटारीतून गेले. त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९ हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असे सांगितले. तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी ‘नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.’१२ चा घन+१ चा घन=१७२९ आणि १० चा घन+९ चा घन=१७२९. तेव्हापासून १७२९या संख्येला हार्डी -रामानुजन संख्या म्हटले जात .

रॉयल सोसायटीचे सदस्यत्व

१९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

पाटीवर गणित सोडवायचे

कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे. काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या तीन वह्या समोर आल्या. एका वहीमध्ये ३५१ पाने होती. त्यांत १६ धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते. मात्र काही मजकूर विस्कळीत,अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये २५६ पाने होती. त्यातील २१ स्पष्ट होती, तर१०० पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता .तिसऱ्या वहीमध्ये ३३ पाने अव्यवस्थित होती .

३२ वर्षी निधन

इंग्लडमध्ये प्रकृती बिघडल्यामुळे १९१९ साली रामानुजन मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. याकाळातही त्यांनी गणिताची संगत सोडली नाही. अंथरुनावर पडून ते अनेक प्रमेय सोडवायचे. त्यांना विचारल्यावर सांगयचे की, हा प्रमेय माझ्या स्वप्नात आला होता. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी ते जग सोडून गेले. १९७६ साली ट्रिनीटी कॉलेजच्या ग्रंथालयात त्यांची एक जुनी वही मिळाली. त्यातील अनेक सूत्र अजूनही सोडवता आली नाही. या रजिस्टरला रामानूजन नोट बुक असे म्हटले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या