Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रीय डॉक्टर दिन विशेष : डॉक्टर दुर्गम भागात बजावतायेत ‘कर्तव्य’

राष्ट्रीय डॉक्टर दिन विशेष : डॉक्टर दुर्गम भागात बजावतायेत ‘कर्तव्य’

नाशिक । दिनेश सोनवणे Nashik

महाराष्ट्र राज्याचा एक भाग असूनही मराठीचा जिथे थांगपत्ता नाही. डांगी भाषेत समजवले नाही, तर अनेक रुग्णांना डॉक्टरांचे ( Doctors ) म्हणणे देखील समजत नाही. अशा परिस्थितीत आदिवासी ( Tribal)दूर्गत अनेक किलोमीटर चालत जाऊनदर्‍या-खोर्‍यात रस्ता पार करून सुरगाणा तालुक्यातील पांगारने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे, येथील गरोदर माता मृत्यू प्रमाण शून्यावर आले आहेत. तर करोना प्रतिबंधक लसीकरणदेखील 95 टक्क्यांपर्यंत झाले आहे.

- Advertisement -

आजच्या (दि 01) राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या (National Doctor’s Day)निमित्ताने अतिदुर्गम भागात चोखपणे आपले कर्तव्य बजावणार्‍या सुरगाणा तालुक्यातील पांगारने येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य देविदास बैरागी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या सीमेवरील शेवटचे आरोग्य केंद्र पांगारने हे आहे. गुजरात सीमा येथील अवघ्या पाचशे मीटरवर आहे. तर तालुक्याचे ठिकाण येथील 45 किलोमीटरवर आहे.

या भागाचे कार्यक्षेत्र दहा किलोमीटरचे आहे. एकूण 19 हजार लोकसंख्या या भागात वास्तव्यास आहे. वाड्या, वस्त्या, पाडे अशा विखुरलेल्या भागात रहिवासी राहतात. या भागात एकूण पाच उपकेंद्र असून याठिकाणी नर्सेसची नियुक्ती करण्यात आली आहे. या भागाला डांग परिसर संबोधले जाते. मराठी किंचीतशी समजते, त्यामुळे येथील आरोग्य सेवकांनी डांगी भाषा शिकून घेतली आहे.

ओपीडीला वैद्यकीय अधिकारी बसले तर त्यांना डांगी भाषेत समजवावे लागते. उन्हाळ्यात येथील गावातील नागरिक स्थलांतरीत होतात, त्यामुळे गावांत 50 टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या वास्तव्यास असते. पावसाळयात येथील वस्त्यांवर पोहोचणे म्हणजे एक मोठे आव्हान असते. डॉ. बैरागी गेल्या तीन वर्षांपासून या आरोग्य केंद्रात सेवा बजावत आहेत. साप, बिबटे दर्शन या परिसरात नित्याचे आहे.त्यामुळे भिती वाटत नाही.

करोना काळात ग्रामीण भागात अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र, नागरिकांचा विश्वास संपादन करून लसीकरणासाठी कंबर कसली. पायी जाऊन बरडा, चिंचमाळ परिसरात लसीकरण केले. विखुरलेल्या वस्त्या व डोंगर कपार्‍यात असलेली घरे शोधून याठिकाणी लसीकरण केले.

जिथे 20 ते 25 बालमृत्यू असायचे तिथे बालमृत्यू दर शून्यावर आणण्यात यश आले आहे. सात आठ वर्षांत गरोदर माता एकही मृत्यू झालेल्या नाहीत. गावात मोबाईल नेटवर्क नाही. जर कुणी टोल फ्री नंबरवर संपर्क केला तर तो फोन शेजारील गुजरात राज्यात लागतो. डोंगरावर जाऊन संपर्क साधावा लागतो अशी परिस्थिती येथील गावांत आहे. गावांत सर्पदंशामुळे एकही मृत्यू नाही.

सर्पदंश झालेल्या रुग्णांसाठी तात्काळ लस किंवा इंजक्शन उपलब्ध आहे. रेबीजदेखील उपलब्ध असून लहान बाळांचे लसीकरणदेखील वेळोवेळी केले जात आहे. एखादे काम करावयाचे असेल तर तिथे एकटया दुकट्याचे काम नाही. त्यामुळे गावकर्‍यांचा सहभाग आणि भूमिका प्रामुख्याने महत्वाची असते. म्हणूनच वेळोवेळी गावकर्‍यांचे पाठबळ मिळाल्यामुळे आरोग्य सेवकांना काम करणे सोपे झाले आहे. गावकर्‍यांना जनआरोग्य अभियान, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना समजावून सांगत उपचार कसे होऊ शकतात याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

करोना काळात 95 टक्के लसीकरण

करोना काळात जिथे गावांत जायला बंदी होती त्याच परिसरात आज 95 टक्के लसीकरण करण्यात यश आले आहे. शासनाची हर घर दस्तक योजना प्रभावीपणे राबविली आहे. जी घरे होती तिथे जाऊन लसीकरण केले. लसीकरणाची जनजागृती करून ते किती फायद्याचे आहे हे समजावून सांगितले. त्यातूनच लसीकरणाचा टक्का गाठला आहे.

अर्ली एज मॅरेजवर काम

आरोग्य सेवक जरी असलो तरीदेखील सध्या या भागात अल्पवयीन मुलींच्या लग्नांची संख्या मोठी आहे. कमी वयात माता गरोदर राहिल्यास होणार्‍या बाळास कसा धोका उद्भवू शकतो यावर जनजागृती करण्याचे सध्या प्रयत्न सुरु आहेत.

– डॉ चैतन्य बैरागी,वैद्यकीय अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या